04-07-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो , ज्ञानसागर बाबा तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र देण्याकरिता आले आहेत, ज्याद्वारे आत्म्याची ज्योत प्रज्वलित होते”

प्रश्न:-
बाबांना करनकरावनहार का म्हटले गेले आहे? ते काय करतात आणि काय करवून घेतात?

उत्तर:-
बाबा म्हणतात - मी तुम्हा मुलांना मुरली ऐकवण्याचे कार्य करतो. मुरली ऐकवतो, मंत्र देतो, तुम्हाला लायक बनवतो आणि मग तुमच्याद्वारे स्वर्गाचे उद्घाटन करवतो. तुम्ही पैगंबर बनून सर्वांना पैगाम देता (संदेश देता). मी तुम्हा मुलांना डायरेक्शन देतो. हीच माझी कृपा अथवा आशीर्वाद आहे.

गीत:-
कौन आज आया सवेरे-सवेरे...

ओम शांती।
मुलांनी गाणे ऐकले. आम्हा मुलांना सकाळी-सकाळी जागे करण्यासाठी कोण आले आहेत, ज्यामुळे आमचा ज्ञानाचा तिसरा नेत्र एकदम उघडला आहे? ज्ञान सागर, परमपिता परमात्म्याद्वारे आमचा ज्ञानाचा तिसरा नेत्र उघडला आहे. म्हणतात देखील - बाबा, ज्योत प्रज्वलित करणारे आहेत; परंतु ते आपले पिता आहेत हे मात्र कोणीही जाणत नाहीत. ब्राह्मो समाजाचे अनुयायी म्हणतात - ते प्रकाश आहेत, ज्योत आहेत. मंदिरात नेहमी ते ज्योतच पेटवतात कारण ते परमात्म्याला ज्योती स्वरूप मानतात, म्हणून तिथे मंदिरामध्ये दिवा पेटवतच राहतात. आता हे बाबा काही काड्यापेटीने दिवा पेटवत नाहीत. ही तर गोष्टच न्यारी आहे. गायले अर्थात जाते ईश्वराची गती-मती न्यारी आहे. गायले देखील जाते - ‘ईश्वराची गत-मत न्यारी आहे’. तुम्ही मुले आता समजता - बाबा सद्गतीकरिता येऊन ज्ञान-योग शिकवत आहेत. शिकवणारा तर जरूर पाहिजे ना. शरीर तर शिकवणार नाही. आत्माच सर्व काही करते. आत्म्यामध्येच चांगले-वाईट संस्कार असतात. यावेळी रावणाच्या प्रवेशतेमुळे मनुष्यांचे संस्कार देखील वाईट आहेत अर्थात पाच विकारांची प्रवेशता आहे. देवतांमध्ये हे ५ विकार असत नाहीत. भारतात जेव्हा दैवी स्वराज्य होते तेव्हा हे वाईट संस्कार नव्हते. सर्वगुण संपन्न होते, देवी-देवतांचे किती उत्तम संस्कार होते, जे आता तुम्ही धारण करत आहात. बाबाच येऊन एका सेकंदामध्ये सर्वांना सद्गती देतात. बाकी गुरु-गोसावी इत्यादी तर भक्तिमार्गामध्येच चालत आले आहेत, जे एकाचीही गती-सद्गती करू शकत नाहीत. बाबांच्या येण्यानेच सर्वांची सद्गती होते. परमपिता परमात्म्याला बोलवतातच याच्यासाठी की येऊन पतित दुनियेचा विनाश करून पावन दुनियेचे उद्घाटन करा अथवा दरवाजा उघडा. बाबा येऊन शिव-शक्ती मातांच्या माध्यमातून ते गेट उघडतात. ‘वंदे मातरम्’ म्हणून गायल्या गेल्या आहेत. यावेळच्या कोणत्याही मातेला वंदन केले जात नाही, कारण कोणीही माता श्रेष्ठाचारी नाहीये. श्रेष्ठाचारी त्यांना म्हटले जाते जे योगबलाने जन्म घेतात. लक्ष्मी-नारायणाला श्रेष्ठाचारी म्हटले जाते. भारतामध्ये जेव्हा देवी-देवता होते तेव्हा भारत श्रेष्ठाचारी होता. या गोष्टींना तर मनुष्य जाणतही नाहीत. ते आपलेच प्लॅन बनवत आहेत. गांधीजींना देखील रामराज्य हवे होते, यावरून हे सिद्ध होते की रावण राज्य आहे. भारत पतित आहे. परंतु रामराज्य स्थापन करण्यासाठी तर बेहदचे बापूजी पाहिजेत, जे रामराज्याची स्थापना आणि रावणराज्याचा विनाश करतील. मुले जाणतात - रावणराज्याला आता आग लागणार आहे. सर्व आत्मे अज्ञानरुपी अंधारात झोपी गेले आहेत. तुम्ही जाणता - आपणही झोपलो होतो, बाबांनी येऊन जागे केले आहे. भक्तीची रात्र संपली आहे, दिवस सुरू होत आहे. रात्र संपून आता दिवस उगवत आहे. बाबा संगमावर आलेले आहेत. मुलांना दिव्यदृष्टी आणि ज्ञानाचा तिसरा नेत्र देत आहेत, ज्याद्वारे तुम्ही साऱ्या विश्वाला ओळखले आहे. तुमच्या बुद्धीमध्ये हे पक्के झाले आहे की हा पूर्वनियोजित अविनाशी ड्रामा आहे, जो फिरतच राहतो. आता तुम्ही किती जागे झाले आहात, सारी दुनिया मात्र झोपलेली आहे.

आता तुम्हा मुलांना संपूर्ण विश्वाच्या आदि-मध्य-अंत, मूलवतन सूक्ष्मवतन, स्थूलवतन विषयी सर्व काही ठाऊक झाले आहे. बाकीची सारी दुनिया कुंभकर्णाच्या अज्ञानरुपी झोपेमध्ये झोपलेली आहे. हे कोणालाच ठाऊक नाहीये की, पतित-पावन कोण आहेत. बोलावतात - ‘हे पतित-पावन या’. परंतु असे म्हणत नाहीत की, येऊन सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून सांगा. बाबा म्हणतात - तुम्ही या सृष्टीचक्राला जाणल्यामुळेच चक्रवर्ती राजा बनता. आठवणीद्वारेच पावन बनता. हे देखील जाणता की, विनाश समोर उभा आहे, युद्ध देखील होणार आहे. बाकी कौरव-पांडवांचे काही युद्ध झालेले नाही. पांडव कोण होते! हे देखील कोणाला माहीत नाही. सेना, इत्यादीची काही गोष्टच नाही. तुमच्या बाजूने आहेत साक्षात पारलौकिक परमपिता. त्या बाबांकडूनच वारसा मिळत आहे. तुम्हाला हे समजले आहे की, श्रीकृष्णाची आत्मा ८४ जन्म भोगून आता पुन्हा बाबांकडून वारसा घेत आहे. जगाचा इतिहास-भूगोल रिपीट होत आहे. आता तुम्हा मुलांना विनाशा पूर्वी सतोप्रधान जरूर बनायचे आहे. गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमलपुष्प समान पवित्र रहायचे आहे. गायले देखील आहे - भगवानुवाच, गृहस्थ व्यवहारामध्ये राहून हा एक जन्म पवित्र बना. पास्ट इज पास्ट (जे होऊन गेले ते होऊन गेले). हे तर ड्रामामध्ये नोंदलेले आहे. सृष्टीला सतोप्रधान बनायचेच आहे, ही ड्रामाची भावी आहे. ईश्वराची भावी नाही, ड्रामाची भावी अशी बनलेली आहे. ती बाबा बसून समजावून सांगतात. अर्धे कल्प जेव्हा संपत येते तेव्हा बाबा येतात. बाबा म्हणतात - जेव्हा रात्र संपून दिवस सुरू होतो तेव्हाच मी येतो. शिवरात्री देखील म्हणतात ना. शिवाचे पुजारी शिवरात्रीला मानतात. गव्हर्नमेंटने तर सुट्टी देखील बंद केली आहे. नाहीतर कमीत-कमी एक महिना सुट्टी दिली पाहिजे. कोणालाच हे ठाऊक नाहीये की, शिवबाबा सर्वांची सद्गती करणारे आहेत. तेच सर्वांचे दुःख हर्ता, सुखकर्ता आहेत. त्यांची जयंती तर सर्व धर्मियांनी एक महिना खूप धूमधडाक्यात साजरी करायला हवी. खास भारताला बाबा डायरेक्ट येऊन (प्रत्यक्ष येऊन) सद्गती देतात. जेव्हा भारत स्वर्ग होता तेव्हा देवी-देवतांचे राज्य होते, त्यावेळी इतर कोणताही धर्म अस्तित्वातच नव्हता, देवता विश्वाचे मालक होते. कोणतेही विभाजन (फाळणी) इत्यादी नव्हते म्हणून म्हटले जाते - अटल, अखंड सुख-शांती, संपत्तीचे दैवी राज्य पुन्हा आम्ही प्राप्त करत आहोत. बेहदच्या बाबांकडून बेहदचा वारसा ५००० वर्षांपूर्वी देखील मिळाला होता. सूर्यवंशी, चंद्रवंशी राज्यामध्ये दुःखाचे नाव सुद्धा नव्हते. गायले देखील जाते - ‘राम राजा, राम प्रजा, राम…’ तिथे अधर्माची कोणती गोष्टच नसते.

बाबांनी तुम्हाला ब्रह्मा आणि विष्णूच्या बाबतीत देखील सांगितले आहे की, या दोघांचा आपसामध्ये काय संबंध आहे. ब्रह्माच्या नाभीतून विष्णू निघाला - हे कसे वंडरफुल चित्र बनवले आहे. बाबा समजावून सांगत आहेत - हे लक्ष्मी-नारायणच शेवटी येऊन ब्रह्मा-सरस्वती, जगत-अंबा, जगत-पिता बनतात, जे नंतर मग दोघेही विष्णू अर्थात लक्ष्मी-नारायण बनतात. बाबा बसून समजावून सांगत आहेत की, जी काही चित्रे बघता - त्यामध्ये एकही यथार्थ नाहीये. शिवाचे भलेमोठे चित्र बनवतात, परंतु ते देखील अयथार्थ आहे. भक्तीसाठी मोठे बनवले आहे, नाहीतर बिंदूची पूजा कशी होऊ शकेल? अच्छा, आणि मग ब्रह्मा, विष्णू, शंकराविषयी देखील काहीच समजू शकत नाहीत. ‘त्रिमूर्ती ब्रह्मा’ असे म्हणतात. ब्रह्मा द्वारे स्थापना, विष्णू द्वारे पालना… असे देखील म्हणतात; परंतु ब्रह्मा काही स्थापना तर करत नाही. स्वर्गाची स्थापना ब्रह्मा करतील काय? नाही. स्वर्गाची स्थापना तर परमपिता परमात्माच करतात. ही आत्मा तर पतित आहे, यांना ‘व्यक्त ब्रह्मा’ म्हटले जाते. हीच आत्मा पावन बनेल आणि निघून जाईल. मग सतयुगामध्ये जाऊन नारायण बनतात. तर प्रजापिता ब्रह्मा जरूर इथेच (साकार वतनमध्येच) पाहिजे ना. चित्र मग तिथे दाखवली आहेत. जसे हे ज्ञानाचे अलंकार खरेतर तुमचे आहेत परंतु विष्णुला दिले आहेत. नवधा भक्तीमध्ये साक्षात्कार होतो. मीरेचे नाव देखील गायले गेले आहे. पुरुषांमध्ये नंबरवन भक्त आहे - नारद. मातांमध्ये मीरा गायली गेली आहे. तुम्ही आत्ता नारायण अथवा लक्ष्मीला वरण्यासाठी हे ज्ञान ऐकत आहात. तुमचेच स्वयंवर होते. नारदासाठी देखील दाखवतात - सभेमध्ये येऊन म्हटले, ‘मी लक्ष्मीला वरू शकतो!’ आता लक्ष्मीला वरण्यालायक तुम्ही बनत आहात. बाकी त्या तर सर्व आहेत भक्तीमार्गातील कथा. बाप बसून सत्य गोष्ट सांगत आहेत. लक्ष्मी सतयुगामध्ये, नारद भक्त द्वापरमध्ये. सतयुगामध्ये मग नारद कुठून आला? राधे-कृष्णाचेच स्वयंवरा नंतर नाव लक्ष्मी-नारायण होते. हे सुद्धा भारतवासी जाणत नाहीत. किती अज्ञान अंध:कार आहे! बाबा आहेत कल्याणकारी. तुम्हाला देखील कल्याणकारी बनवत आहेत. आता विचार-सागर मंथन केले पाहिजे की, इतरांना देखील हे ज्ञान कसे समजावून सांगावे. तर बाबा समजावून सांगतात की, चित्रे इत्यादी बसून कशी बनवली आहेत! गांधीजींच्या नाभीतून नेहरू निघाला, आता कुठे ते विष्णू देवता, कुठे हा मनुष्य… या सर्व गोष्टींना तुम्ही मुले आता समजत आहात. तुम्हाला नंबरवार आनंदाचा अनुभव होतो. बेहदचे बाबा आम्हाला शिकवत आहेत. हे तर कधी ऐकले नव्हते कारण गीतेमध्ये तर ‘श्रीकृष्ण भगवानुवाच’ लिहिले आहे. भगवान केव्हा आले, कधी येऊन गीता ऐकवली! तिथी-तारीख काहीच नाही. कल्पाचे आयुष्यच लाखो वर्षांचे आहे असे म्हणतात. कोणाच्याच डोक्यात येत नाही. आता बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत. ब्राह्मणांचे झाड वृद्धीला प्राप्त होत राहते. वृद्धी होत-होत अगणित होतील. तुम्ही मुले जाणता की, वर्ण कसे फिरतात. आम्हा ब्राह्मणांचा वर्ण सर्वात श्रेष्ठ वर्ण आहे. आपण भारताचे गुप्त खरे रुहानी सोशल वर्कर आहोत. परमपिता परमात्मा आमच्याकडून सेवा करून घेत आहेत. आम्ही रूहानी (आत्मिक) सेवा करतो. ते (दुनियेतील सोशल वर्कर) भौतिक सेवा करतात. तुम्हाला विचारतात - ‘तुम्ही भारताची काय सेवा करता?’ तुम्ही बोला - ‘आम्ही रूहानी सेवाधारी आहोत’. स्वर्गाचे उद्घाटन करून घेत आहेत, स्थापना करून घेत आहेत. शिवबाबा आहेत करनकरावनहार, जे करून घेत आहेत. ते करतात देखील. मुरली कोण चालवतो? म्हणजे बाबा कर्म करतात! तुम्हाला देखील शिकवतात की, अशी मुरली चालवा. महामंत्र देतात - मनमनाभव. कर्म शिकवले ना. आणि मग तुम्हाला म्हणतात - इतरांना शिकवा, म्हणून त्यांना करनकरावनहार म्हटले जाते. तुम्ही मुले देखील हीच शिकवण देता. बाबांची आठवण करा आणि वारशाची आठवण करा. हाच संदेश सर्वांपर्यत तुम्हा मुलांना पोहोचवायचा आहे. असे नाही की, दुसऱ्यांना संदेश द्यायचा आणि स्वतः आठवणीत रहायचे नाही; तर मग काय होईल. दुसरे पुरुषार्थ करून पुढे निघून जातील आणि संदेश देणारे मागेच राहतील. आठवणीचा पुरुषार्थ न केल्यामुळे तितकेसे उच्च पद प्राप्त होत नाही. दुसरे म्हणजे, आठवणीच्या यात्रेनेच पावन बनतात. जसे बाबा बंधनात असलेल्यांचे उदाहरण देतात. त्या जास्त आठवणीत राहतात, बघितलेले नसताना सुद्धा पत्र लिहितात - ‘बाबा, आम्ही तुमचे बनलो आहोत, आम्ही पवित्र नक्की राहू. तुम्हा मुलांची बाबांशी आहे प्रीत-बुद्धी. तुमचीच माळा बनलेली आहे. विष्णूच्या माळेमध्ये आणि रुद्राक्षाच्या माळेमध्ये वरती मेरू मणी आहे. माळा हाती घेताच पहिले फूल आणि दोन मणी हातात येतात, त्यांना नमस्कार करतात. त्यानंतर आहे माळा. तुम्ही भारताला स्वर्ग बनवत आहात तर ही माळा तुमचेच यादगार (स्मृतीचिन्ह) आहे. बाबांनी हा गीता ज्ञान यज्ञ रचला आहे, याच्यामध्ये सारी जुनी दुनिया स्वाहा होईल. बाबा आहेत मोस्ट बिलवेड फादर (सर्वात प्रिय बाबा). तुम्हाला भविष्यासाठी २१ जन्मांकरिता कायमचा सुखाचा वारसा देतात. ज्यांनी कल्पापूर्वी वारसा घेतला आहे ते ड्रामा प्लॅन अनुसार जरूर येतील. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, सुखधामला यायचे असेल तर पवित्र बनायचे आहे’. माझी आठवण करा, काहीही मागायचे नाही की, कृपा करा किंवा मदत करा. नाही. मी तर सर्वांना मदत करतो. पुरुषार्थ तर तुम्हाला करायचा आहे. आशीर्वादाचा प्रश्नच नाही. बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. आठवण करणे तुमचे काम आहे. डायरेक्शन देणे ही कृपा आहे. बाकी तर भले खा, प्या, हिंडा, फिरा… तुम्ही पवित्र भोजनच खायचे आहे. आम्ही देवी-देवता बनत आहोत. तिथे कांदा इत्यादी थोडेच असेल? हे सर्व इथे सोडायचे आहे. या गोष्टी तिथे असत नाहीत. बीजच नसते. जसे सतयुगामध्ये रोग इत्यादी असत नाहीत. आता बघा किती प्रकारचे रोग निघाले आहेत. तिथे तमोगुणी कोणतीही गोष्ट असत नाही. प्रत्येक गोष्ट सतोप्रधान असते. इथे बघा मनुष्य काय-काय खातात. आता बाबा मुलांना म्हणतात - माझी आठवण करा, बाकी सर्व संग तोडून माझ्याशी संग जोडा तर तुम्ही पावन बनाल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) भूतकाळ हा भूतकाळ आहे, जे घडून गेले ते विसरून गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना सतोप्रधान बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. विनाशाच्या अगोदर पावन जरूर बनायचे आहे.

२) भारताला स्वर्ग बनविण्याच्या खऱ्या-खऱ्या सेवेमध्ये तत्पर रहायचे आहे. खाणे-पिणे अतिशय शुद्ध ठेवायचे आहे. पवित्र भोजनच खायचे आहे.

वरदान:-
स्थूल कार्य करतानासुद्धा मन्सा द्वारे विश्व परिवर्तनाची सेवा करणारी जबाबदार आत्मा भव

कोणतेही स्थूल कार्य करत असताना नेहमी हे लक्षात राहावे की, मी विश्वाच्या स्टेजवर विश्वकल्याणाच्या सेवेसाठी निमित्त आहे. मला माझ्या श्रेष्ठ मन्साद्वारे विश्व-परिवर्तनाच्या कार्याची खूप मोठी जबाबदारी मिळालेली आहे. या स्मृतीमुळे निष्काळजीपणा संपुष्टात येईल आणि वेळ सुद्धा व्यर्थ जाण्यापासून वाचेल. प्रत्येक सेकंद अमूल्य समजून विश्वकल्याणासाठी जड आणि चैतन्य घटकांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या कार्यामध्ये सफल करत राहाल.

बोधवाक्य:-
आता योद्धा बनण्याऐवजी निरंतर योगी बना.

हे अव्यक्त इशारे - ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा.

जसे दुःखी आत्म्यांच्या मनामध्ये हा आवाज उमटू लागला आहे की, ‘आता विनाश झाला पाहिजे’; तसेच तुम्हा विश्वकल्याणकारी आत्म्यांच्या मनामध्ये हा संकल्प उत्पन्न व्हावा की, ‘आता लवकरच सर्वांचे कल्याण होऊ दे’; तेव्हाच समाप्ती होईल. विनाशकारी कार्य करणाऱ्यांना कल्याणकारी आत्म्यांच्या संकल्पाचा इशारा हवा आहे; त्यामुळे आपल्या एव्हररेडी बनण्याच्या शक्तिशाली संकल्पाने ज्वाला-रूप योगाद्वारे विनाश ज्वाळेला प्रखर करा.