06-04-25    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   15.12.2004  ओम शान्ति   मधुबन


“बाप दादांची विशेष आशा - प्रत्येक मुलाने आशीर्वाद द्यावेत आणि आशीर्वाद घ्यावेत”


आज बापदादा आपल्या चारही बाजूंच्या निश्चिंत बादशहांच्या सभेला बघत आहेत. ही राज-सभा साऱ्या कल्पामध्ये यावेळीच असते. रूहानी फखूरमध्ये (आत्मिक नशेमध्ये) राहता म्हणून निश्चिंत बादशहा आहात. पहाटे उठता तरी देखील निश्चिंत, चालता-फिरता, कर्म करताना देखील निश्चिंत आणि झोपता ते देखील निश्चिंत झोपेमध्ये झोपता. असा अनुभव करता ना! निश्चिंत आहात? बनले आहात का बनत आहात? बनला आहात ना! निश्चिंत आणि बादशहा आहात, स्वराज्य अधिकारी या कर्मेंद्रियांवर राज्य करणारे निश्चिंत बादशहा आहात अर्थात स्वराज्य अधिकारी आहात. तर अशी सभा तुम्हा मुलांचीच आहे. कोणती चिंता आहे? आहे कोणती चिंता? कारण तुम्ही आपल्या सर्व चिंता बाबांना दिल्या आहेत. तर ओझे उतरले ना. चिंता संपल्या आणि निश्चिंत बादशहा बनून अमूल्य जीवन अनुभव करत आहात. सर्वांच्या डोक्यावर पवित्रतेच्या लाईटचा ताज स्वतःच चमकत आहे. निश्चिंत असलेल्यावर लाईटचा ताज आहे, जर कोणती चिंता करता, जर कोणते ओझे स्वतःवर घेता तर माहिती आहे का डोक्यावर काय येते? ओझ्याच्या टोपल्या डोक्यावर जातात. तर विचार करा ताज आणि टोपल्या दोघांनाही डोळ्यासमोर आणा, काय चांगले वाटते? टोपली चांगली वाटते का लाईटचा ताज चांगला वाटतो? बोला, टीचर्स काय चांगले वाटते? ताज चांगला वाटतो ना! सर्व कर्मेंद्रियांवर राज्य करणारे बादशहा आहात. पवित्रता लाईटचे ताजधारी बनविते म्हणून तुमचे यादगार जड चित्रांमध्ये डबल ताज दाखवला आहे. द्वापरपासून बादशहा तर खूप बनले आहेत, राजे देखील भरपूर बनले आहेत परंतु डबल ताजधारी कोणीच बनलेले नाहीत. निश्चिंत बादशहा स्वराज्य अधिकारी देखील कोणीही बनलेला नाही कारण पवित्रतेची शक्ती मायाजीत, कर्मेंद्रीयजीत विजयी बनविते. निश्चिंत बादशहाची निशाणी आहे - सदैव स्वतः देखील संतुष्ट आणि इतरांना देखील संतुष्ट करणारे. कधीही कोणतीही अप्राप्तीच नसते ज्यामुळे असंतुष्ट होतील. जिथे अप्राप्ती आहे तिथे असंतुष्टता आहे. जिथे प्राप्ती आहे तिथे संतुष्टता आहे. असे बनले आहात का? चेक करा - सदा सर्व प्राप्ती स्वरूप, संतुष्ट आहे? गायन देखील आहे - ‘अप्राप्त नाही कोणतीही वस्तू देवतांच्या खजिन्यामध्ये’, असे नाही परंतु ‘अप्राप्त नाही कोणतीही वस्तू ब्राह्मणांच्या खजिन्यामध्ये’. संतुष्टता जीवनाचा श्रेष्ठ शृंगार आहे, श्रेष्ठ व्हॅल्यू आहे. तर संतुष्ट आत्मे आहात ना.

बापदादा अशा निश्चिंत बादशहा मुलांना पाहून खुश होतात. वाह माझे निश्चिंत बादशहा वाह! वाह! वाह आहात ना! हात वर करा जे निश्चिंत आहेत. निश्चिंत! चिंता वाटत नाही? केव्हातरी वाटते? नाही? चांगले आहे. निश्चिंत बनण्याची विधी खूप सोपी आहे, अवघड नाहीये. फक्त एका शब्दाच्या मात्रेचा थोडासा फरक आहे. तो शब्द आहे - ‘माझे’ ला ‘तुझे’ मध्ये परिवर्तन करा. ‘माझे’ नाही ‘तुझे’, तर हिंदी भाषेमध्ये ‘मेरा’ देखील लिहा आणि ‘तेरा’ देखील लिहिले तर काय फरक असतो, ‘मे’ आणि ‘ते’ चा. परंतु फरक इतका होतो. तर तुम्ही सर्व ‘माझे-माझे’ करणारे आहात का ‘तुझे-तुझे’ करणारे आहात? ‘माझे’ला ‘तुझे’मध्ये परिवर्तन केले? केले नसेल तर करा. ‘माझे-माझे’ अर्थात दास बनणारा, उदास बनणारा. मायेचे दास बनतात ना मग उदास तर होणारच ना! उदासी अर्थात मायेच्या दासी बनणारे. तर तुम्ही मायाजीत आहात, मायेचे दास नाही. तर उदासी येते का? कधी-कधी टेस्ट करता, कारण ६३ जन्म उदास राहण्याचा अभ्यास आहे ना! तर कधी-कधी ते इमर्ज होते म्हणून बापदादांनी काय म्हटले? प्रत्येक मुलगा निश्चिंत बादशहा आहे. जर आता देखील कुठे कोपऱ्यामध्ये कोणती चिंता ठेवलेली असेल तर ती द्या. स्वतःजवळ ओझे का ठेवता? ओझे ठेवून घेण्याची सवय पडली आहे? जेव्हा बाबा सांगत आहेत की, ओझे मला द्या, तुम्ही लाईट व्हा, डबल लाईट. डबल लाईट चांगले का ओझे चांगले? तर चांगल्या रीतीने चेक करा. अमृतवेलेला जेव्हा उठाल तेव्हा चेक करायचे आहे की विशेष वर्तमान समयी सबकॉन्शिअस मध्ये (अंतर्मनामध्ये) सुद्धा कोणते ओझे तर नाही आहे ना? सबकॉन्शिअसच काय परंतु स्वप्नात देखील ओझ्याचा अनुभव होऊ नये. पसंत तर डबल लाईट आहे ना! तर विशेष हा होमवर्क देत आहे, अमृतवेलेला चेक करा. चेक तर करता येते ना, परंतु चेक करण्यासोबतच, केवळ चेक नाही करायचे चेंज सुद्धा करायचे आहे. ‘माझे’ला ‘तुझे’मध्ये चेंज करा. माझे, तुझे. तर चेक करा आणि चेंज करा कारण बापदादा वारंवार सांगत आहेत - समयाला आणि स्वतःला दोघांनाही बघा. समयाची गती देखील बघा आणि स्वतःची गती देखील बघा. मग असे म्हणू नका की, आम्हाला तर माहितच नव्हते, वेळ इतका पटकन निघून गेला. बरीच मुले असे समजतात की, आता थोडासा सैल पुरुषार्थ जरी असला तरीही शेवटी आम्ही वेगाने पूर्ण करू. परंतु खूप काळाचा अभ्यास अंताला सहयोगी बनवेल. बादशहा बनून तर बघा. बनले आहेत परंतु काही बनले आहेत, काही नाही बनले. चालत आहोत, करत आहोत, संपन्न होऊन जाऊ... आता चालायचे नाहीये, करायचे नाही, उडायचे आहे. आता उडण्याची गती पाहिजे. पंख तर मिळाले आहेत ना! उमंग-उत्साह आणि हिंमतीचे पंख सर्वांना मिळाले आहेत आणि बाबांचे वरदान देखील आहे, लक्षात आहे वरदान? हिंमतीचे एक पाऊल तुमचे आणि हजार पावले मदत बाबांची, कारण बाबांचे मुलांवर हृदयापासून प्रेम आहे. तर लाडक्या मुलांची मेहनत बाबा पाहू शकत नाहीत. प्रेमामध्ये रहा तर मेहनत समाप्त होईल. मेहनत बरी वाटते का? थकला तर आहात. ६३ जन्म भटकत-भटकत मेहनत करून थकून गेले आहात आणि बाबांनी आपल्या प्रेमाने भटकण्याच्या ऐवजी तीन तख्ताचा मालक बनवले. तीन तख्त जाणता ना? केवळ जाणतच नाही परंतु तख्त निवासी आहात. अकालतख्त निवासी देखील आहात, बापदादांच्या दिल तख्तनशीन सुद्धा आहात आणि भविष्य विश्व राज्याच्या तख्तनशीन सुद्धा आहात. तर बापदादा सर्व मुलांना तख्तनशीन असल्याचे पहात आहेत. असे परमात्मा दिलतख्त साऱ्या कल्पामध्ये अनुभव करू शकणार नाही. पांडव काय समजता? बादशहा आहात? हात वर करत आहेत. तख्त सोडायचे नाही. देह-भानामध्ये आलात अर्थात मातीमध्ये आलात. हा देह माती आहे. तख्तनशीन बना तर बादशहा बनाल.

बापदादा सर्व मुलांचा पुरुषार्थाचा चार्ट चेक करतात. चारही सब्जेक्टमध्ये कोण-कोण कुठपर्यंत पोहोचला आहे? तर बापदादांनी प्रत्येक मुलाचा चार्ट चेक केला की बाबादादांनी जे काही खजिने दिले आहेत ते सर्व खजिने कितपत जमा केले आहेत? तर जमेचे खाते चेक केले कारण खजिने बाबांनी सर्वांना एक सारखे, एकसमान दिले आहेत, कोणाला कमी, कोणाला जास्त दिलेले नाहीत. खजिने जमा होण्याची निशाणी काय आहे? खजिन्याविषयी तर माहिती आहे ना, सर्वात मोठा खजिना आहे श्रेष्ठ संकल्पाचा खजिना. संकल्प देखील खजिना आहे, तर वर्तमान समय देखील खूप मोठा खजिना आहे कारण वर्तमान समय जे काही प्राप्त करु इच्छिता, जे वरदान घेऊ इच्छिता, जितके स्वतःला श्रेष्ठ बनवू इच्छिता, तितके आता बनवू शकता. आत्ता नाही तर कधीच नाही. जसे संकल्पाच्या खजिन्याला व्यर्थ गमावणे अर्थात स्वतःच्या प्राप्तींना गमावणे आहे. असेच वेळेच्या एका सेकंदाला जरी व्यर्थ गमावलेत, सफल केला नाहीत तर खूप काही गमावलेत. त्यासोबत ज्ञानाचा खजिना, गुणांचा खजिना, शक्तींचा खजिना आणि प्रत्येक आत्मा आणि परमात्म्याद्वारे आशीर्वादांचा खजिना. पुरुषार्थामध्ये सर्वात सोपे आहे “आशीर्वाद द्या आणि आशीर्वाद घ्या”. सुख द्या आणि सुख घ्या, ना दुःख द्यायचे ना दुःख घ्यायचे. असे नाही की, दुःख दिले नाहीत परंतु घेतले तरी देखील दुःखी व्हाल ना! तर आशीर्वाद द्या, सुख द्या आणि सुख घ्या. आशीर्वाद द्यायला येतात ना? येतात? घ्यायला सुद्धा येतात? ज्याला आशीर्वाद घेणे आणि देणे येते त्यांनी हात वर करा. अच्छा-सर्वांना येते? अच्छा, डबल फॉरेनर्सना सुद्धा येते ना? मुबारक आहे, द्यायला येते, घ्यायला सुद्धा येते तर मुबारक आहे. सर्वांना मुबारक आहे, जर देताही येते आणि घेताही येते मग आणखी काय पाहिजे! आशीर्वाद घेत चला आशीर्वाद देत चला, संपन्न व्हाल. कोणी शाप दिले तर काय कराल? घ्याल? कोणी तुम्हाला शाप दिला तर तुम्ही काय कराल? घ्याल? जर समजा शाप घेतलात तर तुमच्यामध्ये स्वच्छता राहिली का? शाप तर खराब गोष्ट आहे ना! तुम्ही घेतली, स्वतःमध्ये स्वीकार केली तर तुमचे अंतर्मन स्वच्छ तर राहिले नाही ना! जर थोडा देखील डिफेक्ट (दोष) राहिला तर परफेक्ट बनू शकत नाही. जर खराब वस्तू कोणी दिली तर तुम्ही घ्याल का! एखादे खूप सुंदर फळ आहे परंतु तुम्हाला खराब झालेले फळ दिले, फळ तर चांगले आहे मग घ्याल का? नाही घेणार ना की म्हणणार चांगले तर आहे, चला दिले आहे तर घेऊया. कधीही कोणी शाप दिला तर तुम्ही मनामध्ये धारण करू नका. समजते ना की हा शाप आहे परंतु शाप मनामध्ये धारण करू नका, नाही तर डिफेक्ट होईल. तर आता हे वर्ष, आता जुन्या सालातील फार थोडे दिवस बाकी आहेत परंतु आपल्या मनामध्ये दृढ संकल्प करा, अजूनही कोणाचा शाप मनामध्ये असेल तर काढून टाका आणि उद्यापासून आशीर्वाद देणार आणि आशीर्वाद घेणार. मंजूर आहे? पसंत आहे? पसंत आहे का करायचेच आहे? पसंत आहे परंतु जे समजतात करायचेच आहे; काहीही होवो परंतु करायचेच आहे त्यांनी हात वर करा. करायचेच आहे.

आज जे स्नेही सहयोगी आले आहेत त्यांनी हात वर करा. तर जे स्नेही सहयोगी आले आहेत, बापदादा त्यांना मुबारक देत आहेत कारण सहयोगी तर आहात, स्नेही देखील आहात; आज आणखी एक पाऊल उचलून बाबांच्या घरी किंवा आपल्या घरी आला आहात, तर आपल्या घरी येण्यासाठी मुबारक असो. अच्छा, जे स्नेही सहयोगी आहेत ते देखील समजतात का की आशीर्वाद देणार आणि घेणार? समजता? हिंमत ठेवता? जे स्नेही सहयोगी हिंमत ठेवतात, मदत मिळेल, उंच हात वर करा. अच्छा. मग तर तुम्ही देखील संपन्न व्हाल, मुबारक असो. अच्छा, जे गॉडली स्टुडंट रेग्युलर आहेत, भले ब्राह्मण जीवनामध्ये बापदादांना भेटण्यासाठी पहिल्यांदाच आले आहेत परंतु स्वतःला ब्राह्मण समजतात, रेग्युलर स्टूडंट समजतात, ते जर समजत असतील की करायचेच आहे, त्यांनी हात वर करा. आशीर्वाद देणार, आशीर्वाद घेणार? करणार? टीचर्स हात उठवत आहे? हे केबिनवाले हात उठवत नाही आहेत. हे असे समजतात की, आम्ही तर देतोच. आता करायचेच आहे. काहीही होवो, हिंमत ठेवा. दृढ संकल्प ठेवा. जर समजा कधी शापाचा प्रभाव पडला जरी ना तरीही दहा पटीने जास्त आशीर्वाद देऊन त्याला नष्ट करा. एका शापाच्या प्रभावाला दहा पटीने आशीर्वाद देऊन हलके करा म्हणजे हिंमत येईल. नुकसान तर आपलेच होते ना, दुसरा तर शाप देऊन निघून गेला परंतु ज्याने शापाला सामावून घेतले, दु:खी कोण होते? घेणारा की देणारा? देणारा सुद्धा होतो परंतु घेणारा जास्त होतो. देणारा तर निष्काळजी असतो ना.

आज बापदादा आपल्या मनातील विशेष आशा ऐकवत आहेत. बाबांच्या सर्व मुलांप्रती, प्रत्येक मुलाप्रती, भले देशामध्ये किंवा विदेशामध्ये आहेत, किंवा सहयोगी आहेत कारण सहयोगींना देखील परिचय मिळाला आहे ना. तर जेव्हा परिचय मिळाला आहे तर परिचयाद्वारे प्राप्ती तर केली पाहिजे ना. तर बापदादांची हीच आशा आहे की, प्रत्येक मुलगा आशीर्वाद देत रहावा. आशीर्वादांचा खजिना जितका जमा करू शकाल तितका करत जा कारण यावेळी जितके आशीर्वाद गोळा कराल, जमा कराल तितकेच जेव्हा तुम्ही पूज्य बनाल तेव्हा आत्म्यांना आशीर्वाद देऊ शकाल. तुम्हाला आशीर्वाद फक्त आत्ताच द्यायचे नाहीयेत, द्वापरपासून भक्तांना देखील आशीर्वाद द्यायचे आहेत. तर इतका आशीर्वादांचा स्टॉक जमा करायचा आहे. राजा बच्चे आहात ना! बापदादा प्रत्येक मुलाला राजा बच्चा म्हणूनच बघतात. कमी नाही. अच्छा.

बापदादांची आशा अंडरलाईन केलीत? ज्यांनी केली त्यांनी हात वर करा, केलात. अच्छा. बापदादांनी ६ महिन्यांचा होमवर्क सुद्धा दिला आहे, लक्षात आहे? टीचर्सच्या लक्षात आहे? परंतु हा दृढ संकल्पाचा रिझल्ट एका महिन्याचा बघतील कारण नवीन वर्ष तर लवकरच सुरू होणार आहे. ६ महिन्याचा होमवर्क आपला आहे, हा एक महिना दृढ संकल्पाचा रिझल्ट बघणार. ठीक आहे ना? टीचर्स एक महिना ठीक आहे? पांडव ठीक आहे? अच्छा - जे पहिल्यांदा मधुबनमध्ये पोहोचले आहेत, त्यांनी हात वर करा. खूप छान. बघा, बापदादांना नेहमी नवीन मुले खूप आवडतात. परंतु नवीन मुले जसा वृक्ष असतो ना, त्याला जी छोटी-छोटी पाने येतात ती पक्ष्यांना खूप आवडतात, तशी जी नवीन-नवीन मुले आहेत तर ती मायेला देखील नवीन मुले खूप आवडतात त्यामुळे प्रत्येकजण जे नवीन आहेत, त्यांनी दररोज आपल्या नवीनतेला चेक करा की, आज मी माझ्यामध्ये कोणती नवीनता आणली? कोणता विशेष गुण, कोणती शक्ती आपल्यामध्ये विशेष धारण केली? तर चेक करत रहाल, स्वतःला परिपक्व करत रहाल तर सेफ रहाल. अमर रहाल. तर अमर रहा, अमर पद मिळवायचेच आहे. अच्छा!

चोहो बाजूंच्या निश्चिंत बादशहांना, सदा रुहानी फखुरमध्ये (आत्मिक नशेमध्ये) राहणाऱ्या श्रेष्ठ आत्म्यांना, सदा प्राप्त झालेल्या खजिन्यांना जमेच्या खात्यामध्ये वाढविणाऱ्या तीव्र पुरुषार्थी आत्म्यांना, सदैव एकाच वेळी तिन्ही प्रकारची सेवा करणाऱ्या श्रेष्ठ सेवाधारी मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण, पदम-पदम-पदम गुणा प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

वरदान:-
सर्व शक्तींना ऑर्डर प्रमाणे आपले सहयोगी बनविणारे प्रकृतीजीत भव

सर्वात मोठ्यात-मोठी दासी प्रकृती आहे. जी मुले प्रकृतीजीत बनण्याचे वरदान प्राप्त करतात त्यांच्या ऑर्डर प्रमाणे सर्व शक्ती आणि प्रकृती रूपी दासी कार्य करते अर्थात वेळेवर सहयोग देते. परंतु जर प्रकृतीजीत बनण्याऐवजी अलबेलेपणाच्या झोपेमध्ये आणि अल्पकालीन प्राप्तीच्या नशेमध्ये तसेच व्यर्थ संकल्पांच्या नाचामध्ये मश्गुल होऊन आपला वेळ गमावता त्यामुळे शक्ती ऑर्डरवर कार्य करू शकत नाहीत म्हणून चेक करा की आधी मुख्य संकल्प शक्ती, निर्णय शक्ती, आणि संस्काराची शक्ती तिन्ही ऑर्डरमध्ये आहेत?

सुविचार:-
बापदादांचे गुण गात रहा तर स्वतः देखील गुणमूर्त बनाल.

अव्यक्त इशारे - “कंबाइंड रुपाच्या स्मृतीद्वारे सदा विजयी बना” कंबाइंड सेवेशिवाय सफलता असंभव आहे. असे नाही की जावे सेवा करण्यासाठी आणि परत यावे तर म्हणाल माया आली, मूड ऑफ झाला, डिस्टर्ब झाले त्यामुळे अंडरलाईन करा - सेवेमध्ये सफलता किंवा सेवेमध्ये वृद्धीचे साधन आहे ‘स्व’ची सेवा आणि सर्वांची कंबाइंड सेवा.