15-05-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आपला स्वभाव बाप समान इझी बनवा, तुम्हाला कशाचीही घमेंड असता कामा नये, ज्ञानयुक्त बुद्धी असावी, अभिमान नसावा”

प्रश्न:-
सेवा करत असताना देखील बरीच मुले लहान मुलापेक्षाही बालिश आहेत - ते कसे?

उत्तर:-
काही मुले सेवा करत राहतात, दुसऱ्यांना ज्ञान ऐकवत राहतात परंतु बाबांची आठवण करत नाहीत. म्हणतात - बाबा, आठवण विसरायला होते. तर बाबा त्यांना लहान मुलापेक्षाही बालिश म्हणतात कारण मुले कधीही पित्याला विसरत नाहीत, तुम्हाला जे बाबा प्रिन्स-प्रिन्सेस बनवतात, त्यांना तुम्ही विसरून का जाता? जर विसराल तर मग वारसा कसा मिळणार. तुम्हाला हाताने काम करत असताना देखील बाबांची आठवण करायची आहे.

ओम शांती।
या शिक्षणाचे एम ऑब्जेक्ट तर मुलांच्या समोर आहे. मुले हे देखील जाणतात की बाबा साधारण तनामध्ये आहेत, ते देखील वृद्ध शरीर आहे. तिथे (स्वर्गामध्ये) तर भले वृद्ध होतात तरी देखील आनंद असतो की, आपण बाळ बनणार. तर हे (ब्रह्मा बाबा) देखील जाणतात, यांना ही खुशी आहे की मी हे बनणार आहे. एखाद्या बाळासारखे वर्तन होते. मुलांप्रमाणे इझी (हलके) राहतात. घमेंड इत्यादी काहीच नाही. ज्ञानी बुद्धी आहे. जशी यांची आहे तशी तुम्हा मुलांची झाली पाहिजे. बाबा आम्हाला शिकविण्यासाठी आले आहेत, आम्ही हे बनणार. तर तुम्हा मुलांना आतून तो आनंद झाला पाहिजे ना - आपण हे शरीर सोडून जाऊन हे बनणार. राजयोग शिकत आहोत. छोटी मुले अथवा मोठे सगळे शरीर सोडतील. सर्वांसाठी एकच शिक्षण आहे. हे (ब्रह्मा बाबा) देखील म्हणतात - मी राजयोग शिकत आहे. मग मी जाऊन प्रिन्स बनणार. तुम्ही देखील म्हणता आम्ही प्रिन्स-प्रिन्सेस बनणार. तुम्ही शिकत आहात प्रिन्स-प्रिन्सेस बनण्यासाठी. अंत मति सो गति होईल. बुद्धीमध्ये हा निश्चय आहे आम्ही बेगर पासून प्रिन्स बनणारे आहोत. ही बेगर दुनियाच नष्ट होणार आहे. मुलांना खूप आनंद झाला पाहिजे. बाबा मुलांना देखील आप समान बनवतात. शिवबाबा म्हणतात - मला काही प्रिन्स-प्रिन्सेस बनायचे नाहीये. हे बाबा (ब्रह्मा बाबा) म्हणतात - मला तर बनायचे आहे ना. आम्ही शिकत आहोत, हे बनण्यासाठी. राजयोग आहे ना. मुले देखील म्हणतात - आम्ही प्रिन्स-प्रिन्सेस बनणार. बाबा म्हणतात - अगदी बरोबर आहे. तुमच्या मुखामध्ये गुलाब. ही परीक्षा आहे प्रिन्स-प्रिन्सेस बनण्याची. ज्ञान तर खूप सोपे आहे. बाबांची आठवण करायची आहे आणि भविष्य वारशाची आठवण करायची आहे. ही आठवण करण्यासाठीच मेहनत आहे. या आठवणीमध्ये रहाल तर मग अंत मति सो गति होईल. संन्यासी लोक उदाहरण देतात, कोणी म्हणाले तू म्हैस आहेस… तर खरोखरच समजू लागतात. त्या सर्व आहेत फालतू गोष्टी. इथे तर धर्माची गोष्ट आहे. तर बाबा मुलांना समजावून सांगत आहेत ज्ञान तर खूप सोपे आहे, परंतु आठवणीमध्ये मेहनत आहे. बाबा बरेचदा म्हणतात - तुम्ही तर बालिश आहात. तर मुलांच्या तक्रारी येतात, ‘आम्ही बालिश आहोत?’ बाबा म्हणतात - ‘हो, बालिश आहात. भले ज्ञान तर खूप चांगले आहे, प्रदर्शनीमध्ये सेवा खूप चांगली करता, रात्रं-दिवस सेवेमध्ये तत्पर असता तरीही बालिश म्हणतो’. बाबा म्हणतात - हे (ब्रह्मा) देखील बालिश आहेत. हे बाबा म्हणतात तुम्ही माझ्यापेक्षाही मोठे आहात, यांच्यावर तर अनेक जबाबदाऱ्या आहेत. ‘जिनके माथे मामला…’ सर्व प्रकारची काळजी असते. किती समाचार बाबांकडे येतात म्हणून पुन्हा सकाळी बसून आठवण करण्याचा प्रयत्न करतात. वारसा तर त्यांच्याकडूनच घ्यायचा आहे. तर बाबांची आठवण करायची आहे. सर्व मुलांना रोज समजावतो. गोड मुलांनो, तुम्ही आठवणीच्या यात्रेमध्ये खूप कमजोर आहात. ज्ञानामध्ये तर भले चांगले आहात परंतु प्रत्येकाने आपल्या मनाला विचारा - मी बाबांच्या आठवणींमध्ये किती राहतो? अच्छा, दिवसा खूप काम इत्यादीमध्ये बिझी असता, तसे तर काम करताना सुद्धा आठवणीमध्ये राहू शकता. म्हण देखील आहे - ‘हथ कार डे दिल यार डे…’ (हाताने काम करत असताना बुद्धी तिथे लागलेली असावी) जसे भक्तीमार्गामध्ये भले पूजा करत असतात, बुद्धी अजूनच दुसरीकडे धंदा इत्यादीमध्ये जाते किंवा एखाद्या स्त्रीचा पती विदेशात असेल तर तिची बुद्धी तिथे जाईल, ज्याच्याशी जास्त कनेक्शन आहे. तर भले सेवा चांगली करतात तरीही बाबा बालिश-बुद्धी म्हणतात. बरीच मुले लिहितात - ‘आम्ही बाबांची आठवण विसरून जातो’. अरे, आपल्या वडिलांना तर छोटी मुले देखील विसरत नाहीत तुम्ही तर छोट्या मुलांपेक्षाही बालिश आहात. ज्या बाबांद्वारे तुम्ही प्रिन्स-प्रिन्सेस बनता, ते तुमचे पिता-टीचर-गुरु आहेत, तुम्ही त्यांना विसरून जाता!

जी मुले बाबांना आपला संपूर्ण पोतामेल पाठवतात त्यांनाच बाबा आपला सल्ला देतात. मुलांनी सांगितले पाहिजे की, आपण बाबांची कशी आठवण करतो? केव्हा आठवण करतो? मग बाबा सल्ला देतील. बाबा समजतील यांची ही सर्व्हिस आहे, त्यानुसार त्यांना किती सवड मिळू शकते? गव्हर्मेंटची नोकरी असणाऱ्यांकडे खूप वेळ असतो. काम थोडेसे कमी झाले, मग बाबांची आठवण करत रहा. हिंडता-फिरता देखील बाबांची आठवण रहावी. बाबा टाइम देखील देतात. अच्छा, रात्री नऊ वाजता झोपी जा मग दोन-तीन वाजता उठून आठवण करा. इथे येऊन बसा. परंतु ही बसून आठवण करण्याची सवय देखील बाबा लावत नाहीत, आठवण तर चालता-फिरता सुद्धा करू शकता. इथे तर मुलांना खूप सवड असते. पूर्वी तुम्ही एकांतामध्ये टेकडीवर जाऊन बसत होता. बाबांची आठवण तर जरूर करायची आहे. नाही तर विकर्म विनाश कसे होतील. बाबांची आठवण करू शकत नसाल तर जसे काही लहान मुलांपेक्षाही बालिश आहात. सर्व काही आठवणीवर अवलंबून आहे. पतित-पावन बाबांची आठवण करण्याची मेहनत आहे. नॉलेज तर खूप सोपे आहे. हे देखील जाणता - इथे येऊन समजून देखील तेच घेतील जे कल्पापूर्वी आले असतील. मुलांना डायरेक्शन मिळत राहतात. प्रयत्न हाच करायचा आहे की आपण तमोप्रधानापासून सतोप्रधान कसे बनायचे. बाबांच्या आठवणी शिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. बाबांना सांगू शकता, बाबा आमचा हा व्यवसाय असल्या कारणाने किंवा अशा-अशा प्रकारचे काम असल्यामुळे आम्ही आठवण करू शकत नाही. बाबा ताबडतोब सल्ला देतील - असे नाही, असे करा. तुमचे सर्व काही आठवणीवर अवलंबून आहे. चांगली-चांगली मुले ज्ञान तर खूप चांगले देतात, कुणाला खुश करतात परंतु योग नाही आहे. बाबांची आठवण करायची आहे. हे समजत असताना देखील विसरतात, यामध्येच मेहनत आहे. एकदा का सवय पडली की मग विमानात किंवा ट्रेनमध्ये बसलेले असताना देखील तुम्ही आठवणीमध्ये मग्न रहाल. आतून आनंद होईल की आपण बाबांकडून भविष्य प्रिन्स-प्रिन्सेस बनत आहोत. पहाटे उठून अशा रीतीने बाबांच्या आठवणीमध्ये बसा. मग थकून जाता. ठीक आहे, आठवणीमध्ये झोपून जा. बाबा युक्त्या सांगतात. चालता-फिरताना आठवण करू शकत नसाल तर बाबा म्हणतील ठीक आहे रात्री नेष्ठामध्ये बसा तेव्हा कुठे तुमचे जमा होईल. परंतु असे जबरदस्तीने एका जागी बसणे हा तर हठयोग होतो. तुमचा तर आहे सहज मार्ग. जेवताना बाबांची आठवण करा. आपण बाबांद्वारे विश्वाचा मालक बनत आहोत. स्वतःशीच बोलत रहा, या शिक्षणाने मी हा बनतो. अभ्यासाकडे पूर्ण लक्ष द्यायचे आहे. तुमचे सब्जेक्टच थोडे आहेत. बाबा किती थोडक्यात समजावून सांगतात, कोणतीही गोष्ट समजली नाही तर बाबांना विचारा. स्वतःला आत्मा समजायचे आहे, हे शरीर तर ५ भूतांचे (पंचमहाभूतांचे) आहे. मी शरीर आहे, असे म्हणणे म्हणजे जणू स्वतःला भूत समजणे आहे. ही आहेच आसुरी दुनिया, ती आहे दैवी दुनिया. इथे सर्व देह-अभिमानी आहेत. स्वतःच्या आत्म्याला कोणीही जाणत नाहीत. चूक आणि बरोबर तर असते ना. ‘आपण आत्मा अविनाशी आहोत’, असे समजणे हे बरोबर आहे. स्वतःला विनाशी शरीर समजणे चुकीचे आहे. देहाचा खूप अहंकार आहे. आता बाबा म्हणतात - देहाला विसरा, आत्म-अभिमानी बना. यामध्ये आहे मेहनत. ८४ जन्म घेता, आता घरी जायचे आहे. तुम्हालाच सोपे वाटते, तुमचे ८४ जन्म आहेत. सूर्यवंशी देवता धर्मवाल्यांचे ८४ जन्म आहेत, करेक्ट करून लिहिले पाहिजे. मुले अभ्यास करत राहतात, करेक्शन्स होत राहतात. त्या (लौकिक) शिक्षणामध्ये देखील नंबरवार असतात ना. कमी शिकले तर पगार सुद्धा कमी मिळेल. आता तुम्ही मुले बाबांकडे आला आहात खरी-खरी नरापासून नारायण बनण्याची अमरकथा ऐकण्यासाठी. हा मृत्यूलोक आता नष्ट होणार आहे. आपल्याला अमरलोक मध्ये जायचे आहे. आता तुम्हा मुलांना ही चिंता लागून राहिली पाहिजे की आपण तमोप्रधानापासून सतोप्रधान, पतितापासून पावन बनायचे आहे. पतित-पावन बाबा सर्व मुलांना एकच युक्ती सांगतात - फक्त म्हणतात - बाबांची आठवण करा, चार्ट ठेवा तर तुम्हाला खूप आनंद होईल. आता तुम्हाला ज्ञान मिळाले आहे, दुनिया तर घोर अंधारामध्ये आहे. तुम्हाला आता प्रकाश मिळाला आहे. तुम्ही त्रिनेत्री, त्रिकालदर्शी बनत आहात. असे देखील पुष्कळ मनुष्य आहेत जे म्हणतात की, ज्ञान तर जिकडे-तिकडे मिळतच राहते, ही काही नवीन गोष्ट नाहीये. अरे, हे ज्ञान तर कोणालाच मिळत नाही. आणि जरी तिथे ज्ञान मिळाले तरी देखील तुम्ही करत तर काहीच नाही. नरापासून नारायण बनण्याचा कोणी पुरुषार्थ करता? अजिबात नाही. तर बाबा मुलांना म्हणतात - पहाटेची वेळ खूप चांगली आहे. खूप मजा येते, शांत होतो, वायुमंडळ चांगले असते. सर्वात खराब वायुमंडळ असते - १० पासून १२ वाजेपर्यंत म्हणून पहाटेची वेळ खूप चांगली आहे. रात्री लवकर झोपी जा आणि मग दोन-तीन वाजता उठा. आरामात बसा. बाबांसोबत बोला. दुनियेच्या इतिहास-भूगोलाची आठवण करा. शिवबाबा म्हणतात - रचता आणि रचनेचे ज्ञान माझ्यामध्ये आहे ना. मी तुम्हाला टीचर बनवून शिकवतो. तुम्ही आत्मा बाबांची आठवण करत रहा. भारताचा प्राचीन योग प्रसिद्ध आहे. योग कोणासोबत? ते देखील लिहायचे आहे. आत्म्याचा परमात्म्या सोबत योग अर्थात आठवण आहे. तुम्ही मुले आता जाणता आपण ऑलराऊंडर आहोत, पूर्ण ८४ जन्म घेतो. इथे ब्राह्मण कुळाचेच येतील. आपण ब्राह्मण आहोत. आता आपण देवता बनणार आहोत. सरस्वती मुलगी सुद्धा आहे ना. वृद्ध सुद्धा आहे, खूप आनंद होतो, आता मी शरीर सोडून मग जाऊन राजाच्या घरामध्ये जन्म घेणार. मी शिकत आहे. आणि मग तोंडामध्ये सोन्याचा चमचा असेल. तुम्हा सर्वांचे हे एम ऑब्जेक्ट आहे. आनंद का होऊ नये. लोकांनी भले काहीही म्हणू दे. परंतु तुमचा आनंद का नाहीसा होतो. बाबांची आठवणच केली नाहीत तर तुम्ही नरापासून नारायण कसे बनणार. श्रेष्ठ बनले पाहिजे ना. असा पुरुषार्थ करून दाखवा, गोंधळून का जाता? मनामध्ये निराश का होता की सर्वजण थोडेच राजा बनतील! हा विचार आला तर फेल झाला. शाळेमध्ये बॅरिस्टरी, इंजिनिअरिंग इत्यादी शिकतात ना. तेव्हा असे म्हणतात का की, सर्वजण थोडेच बॅरिस्टर बनतील. अभ्यास केला नाहीत तर नापास व्हाल. १६,१०८ ची पूर्ण माळा आहे. सर्वप्रथम कोण येतील? जितका जे पुरुषार्थ करतील. एकमेकांपेक्षा जास्त वेगाने पुरुषार्थ तर करता ना. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे - आता आपल्याला हे जुने शरीर सोडून घरी जायचे आहे. याची देखील आठवण राहिली तरीही पुरुषार्थ जास्त वेगाने होईल. तुम्हा मुलांच्या हे लक्षात राहिले पाहिजे की सर्वांचे मुक्ती, जीवन-मुक्तिदाता आहेतच एक बाबा. आज दुनियेमध्ये इतके करोडो मनुष्य आहेत. तुम्ही ९ लाख असणार, तेही ‘सुमारे’ म्हटले जाते. सतयुगामध्ये आणखी किती असणार. राज्यामध्ये थोडे तरी मनुष्य पाहिजेत ना. ही राजाई स्थापन होत आहे. बुद्धी म्हणते सतयुगामध्ये खूप छोटे झाड असते, ब्युटीफूल. नावच आहे स्वर्ग, पॅराडाईज. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये सारे चक्र फिरत राहते. हे जरी सदैव फिरत राहिले तरी देखील चांगले.

हा खोकला इत्यादी जो होतो हा कर्म भोग आहे, हे जुने चप्पल (शरीर) आहे. नवीन काही इथे मिळणार नाहीये. मी काही पुनर्जन्म तर घेत नाही. ना कोणत्या गर्भामध्ये जात. मी तर साधारण तनामध्ये प्रवेश करतो. वानप्रस्थ अवस्था आहे, आता वाणीपासून परे शांतीधामला जायचे आहे. जसे रात्री नंतर दिवस, दिवसा नंतर रात्र जरूर होणार आहे, तसेच जुनी दुनिया जरूर विनाश होणार आहे. हे संगमयुग जरूर संपून नंतर मग सतयुग येईल. मुलांनी आठवणीच्या यात्रेवर खूप लक्ष द्यायचे आहे, जे आता खूप कमी आहे, म्हणून बाबा बालिश म्हणतात. बालिशपणा दाखवतात. म्हणतात - ‘बाबांची आठवण करू शकत नाही, तर बालिश म्हणणार ना’. तू लहान बाळ आहेस, आपल्या बाबांना विसरतोस? अतिशय गोड बाबा, टीचर, गुरु अर्ध्याकल्पाचे सर्वात प्रिय बाबा, त्यांना तुम्ही विसरता! अर्धाकल्प दुःखामध्ये तुम्ही त्यांची आठवण करत आला आहात, ‘हे भगवान!’ आत्मा शरीराद्वारे म्हणते ना. आता मी आलो आहे, चांगल्या रीतीने आठवण करा. खूप जणांना रस्ता दाखवा. पुढे चालून खूप वृद्धी होत राहील. धर्माची वृद्धी तर होते ना. अरविंद घोष यांचे उदाहरण आहे. आज त्यांची किती सेंटर्स आहेत. आता तुम्ही जाणता तो सर्व आहे भक्तीमार्ग. आता तुम्हाला ज्ञान मिळते. पुरुषोत्तम बनण्याचे हे नॉलेज आहे. तुम्ही मनुष्यापासून देवता बनता. बाबा येऊन सर्व मूत पलीती कपड्यांना (पतित आत्म्यांना) साफ करतात. त्यांचीच महिमा आहे. मुख्य आहे आठवण. नॉलेज तर खूप सोपे आहे. मुरली वाचून ऐकवा. आठवण करत रहा. आठवण करता-करता आत्मा पवित्र होईल. पेट्रोल भरत जाईल. आणि हे पळाले. शिवबाबांची वरात म्हणा, मुले म्हणा. बाबा म्हणतात मी आलो आहे; तुम्हाला काम-चितेवर उतरवून आता योग-चितेवर बसवतो. योगाने हेल्थ, ज्ञानाने वेल्थ मिळते. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) एम ऑब्जेक्टला समोर ठेवून आनंदात रहायचे आहे. कधीही निराश व्हायचे नाही - हा विचार कधीही येऊ नये की, सर्वजण थोडेच राजा बनतील. पुरुषार्थ करून उच्च पद मिळवायचे आहे.

२) मोस्ट बिलेवेड (सर्वात प्रिय) बाबांची खूप प्रेमाने आठवण करायची आहे, यामध्ये बालिश बनायचे नाही. आठवणीसाठी पहाटेची वेळ चांगली आहे. आरामात शांतीमध्ये बसून आठवण करा.

वरदान:-
यज्ञ सेवेद्वारे सर्व प्राप्तींचा प्रसाद प्राप्त करणारे ऑलराऊंड सेवाधारी भव संगमयुगावर ऑल राऊंड सेवेचे चान्स मिळणे - ही देखील ड्रामामध्ये एक लिफ्ट आहे, जे प्रेमाने यज्ञाची ऑलराऊंड सेवा करतात त्यांना सर्व प्राप्तींचा प्रसाद स्वतः प्राप्त होतो. ते निर्विघ्न राहतात. एकदा सेवा केली आणि हजार वेळा सेवेचे फळ प्राप्त झाले. नेहमी स्थूल आणि सूक्ष्म सेवेचा लंगर चालू असावा (सेवा करण्याचे काम चालू असावे). कोणालाही संतुष्ट करणे - ही सर्वात मोठी सेवा आहे. पाहुणचार करणे - हे सर्वात मोठे भाग्य आहे.

बोधवाक्य:-
ाच्या स्थितीमध्ये स्थित रहा म्हणजे अनेक प्रकारचे अभिमान आपोआप नाहीसे होतील.


अव्यक्त इशारे - रूहानी रॉयल्टी आणि प्युरीटीची पर्सनॅलिटी धारण करा:- जसे दुनियेतील रॉयल आत्मे कधीही छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये, छोट्या वस्तूंमध्ये आपली बुद्धी किंवा वेळ घालवत नाहीत, दिसत असताना देखील बघत नाहीत, ऐकू येत असताना ऐकत नाहीत, तसे तुम्ही रुहानी रॉयल आत्मे कोणत्याही आत्म्याच्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये, जे रॉयल नाही त्यामध्ये आपली बुद्धी किंवा वेळ घालवू शकत नाही. रुहानी रॉयल आत्म्यांच्या मुखातून कधीही व्यर्थ किंवा साधारण बोल सुद्धा निघू शकत नाहीत.