16-08-26    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   16.03.2011  ओम शान्ति   मधुबन


“मनसा द्वारे प्रकृतीला सतोगुणी बनविण्याची सेवा करा, शुभ भावना, शुभकामना ठेवून संस्कार मिलनाची रास करा”


आज होलीएस्ट बाबा आपल्या मुलांसोबत होळी साजरी करण्यासाठी आले आहेत. तुम्ही देखील सर्वजण होळी साजरी करण्यासाठी आला आहात. चोहो बाजूची दूर बसलेली मुले देखील दूर बसून देखील होळी साजरी करण्यासाठी बसली आहेत. तुम्ही सर्वजण कोणत्या रंगाने होळी खेळण्यासाठी आला आहात! जाणता, सर्वात श्रेष्ठ रंग आहे परमात्म संगतीचा रंग. हा रंग सदैव श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनविणारा आहे. जसे बाबा सर्वश्रेष्ठ आहेत, तसा हा परमात्म संग सर्वश्रेष्ठ बनविणारा आहे. प्रत्येक मुलाच्या मस्तकामध्ये चमकणारा भाग्याचा तारा पाहत आहेत. हा भाग्याचा तारा संपूर्ण कल्पामध्ये तुम्हा भाग्यवान मुलांव्यतिरिक्त इतर कोणीही प्राप्त करू शकत नाही. श्रेष्ठ भाग्य हे आहे की, तुम्ही मुलेच डबल पवित्र अर्थात होली बनता. तसे धर्मात्मे देखील आहेत परंतु ते शरीराने पवित्र बनत नाहीत. तुम्हा ब्राह्मण आत्म्यांची भविष्यामध्ये आत्मा देखील पवित्र बनते आणि शरीर देखील पवित्र बनते. याची निशाणी डबल पवित्र म्हणूनच तर डबल ताज प्राप्त होतो. संपूर्ण कल्पामध्ये तुम्ही संगमयुगावर बाबांच्या संगतीच्या रंगाने डबल पवित्र, डबल ताजधारी बनता. संगमयुगाचा परमात्म संग डबल पवित्र बनवतो. तर तुम्ही होली बाबांसोबत राहिल्याने, बाबांना कंबाइंड बनविल्याने डबल पवित्र बनता. सदैव मनामध्ये बाबांचा संग राहतो, हा संग किती श्रेष्ठ आहे जो इतका श्रेष्ठ बनवतो. लोक तर स्थूल रंगाने होळी साजरी करतात; परंतु तुम्ही बाबांच्या संगाच्या रंगाने ‘होली’ (पवित्र) बनता. ते देखील डबल होली. तर तुमची होळी दुनियेपेक्षा न्यारी परमात्म्याची प्यारी आहे. तर नशा राहतो ना की, आमची होळी ही प्रभू संगतीच्या रंगामुळे अर्धा कल्प अशी पवित्र बनवते की आतापर्यंत देखील तुमची चित्रे (मुर्त्या) नियमाप्रमाणे पूजली जातात; इतर कोणाचीही चित्रे अशी प्रेमाने पूजली जात नाहीत. तुम्ही स्वतः आपल्या चित्रांना बघत आहात. इतरांचीही पूजा केली जाते परंतु इतका वेळ आणि अशी विधिपूर्वक पूजा केली जात नाही. तुम्ही सदैव उमंग आणि उत्साहामध्ये राहता. राहता ना! उमंग-उत्साहामध्ये राहता का? हात वर करा. राहता, कधी-कधी की नेहमी? जे म्हणतात - आम्ही नेहमी उमंग-उत्साहामध्ये राहतो देखील आणि इतरांमध्येही उमंग-उत्साह भरतो, त्यांनी हात वर करा. कधी-कधी नाही, सदैव. ‘सदैव’ शब्दाला अंडरलाईन करता ना! परंतु तुमचे यादगार, जी काही तुमची स्थिती राहिली आहे त्याचे यादगार तुमचे भक्त उत्सवाच्या रूपामध्ये साजरे करतात. तुम्ही प्रभूच्या संगतीचा रंग लावला तर ते (दुनियावाले) देखील रंग लावतात परंतु बॉडीकॉन्शस (देह-अभिमानी) आहेत ना म्हणून ते स्थूल रंग लावतात. ज्या रंगात खर्चही खूप आणि नंतर रिझल्ट देखील काही चांगला, काही खराब, असे साजरे करतात. परंतु तुमच्या उत्साहाची यादगार (आठवण) म्हणून उत्सव जरूर साजरा केला आहे. तुम्ही परमात्म्याचे बनण्यासाठी अगोदर आपले जुने संस्कार जाळता आणि नंतर प्रभूच्या संगतीचा रंग लागल्याने सदैव साजरे करत राहता. ते देखील अगोदर जाळतात मग साजरे करतात; परंतु तुमचे साजरे करणे आणि त्यांच्या साजरे करण्यामध्ये रात्रं-दिवसाचा फरक आहे. ते बॉडीकॉन्शस (देह-अभिमानी) आणि तुम्ही आत्म-अभिमानी. ते देहभानामध्ये आहेत आणि तुम्ही आत्मिक भानामध्ये आहात.

तुम्हाला बापदादांचे डायरेक्शन आहे - होली अर्थात बीती सो बीती (झाले ते झाले). ते देखील म्हणतात - ‘हो ली’ (होऊन गेले) परंतु अर्थाला प्रॅक्टिकलमध्ये आणू शकत नाहीत. तुम्ही सर्व जण ‘हो ली’ अर्थात बीती सो बीती करता ना! करता ना! की कधी-कधी करता? कारण होऊन गेलेल्या गोष्टीची आठवण केल्याने व्यर्थ संकल्प खूप चालतात. वेळ सुद्धा वाया जातो. जे बऱ्याच काळापासूनचे संस्कार आहेत ते इच्छा नसतानाही जेव्हा कृतीमध्ये येतात तेव्हा या संगमयुगाचे एक-एक मिनिट जे एका जन्मामध्ये २१ जन्मांचे प्रारब्ध बनवते, तो एक-एक संकल्प, एक-एक मिनिट किती किंमती आहे. केवळ एक सेकंदच गेलेला नाहीये परंतु अनेक जन्मांच्या प्रारब्धामध्ये फरक पडतो. बापदादांनी यापूर्वी देखील सांगितले आहे की, संगमकाळातील वेळ आणि संकल्प कधीही व्यर्थ घालवू नका. जर सदैव प्रभू रंगामध्ये रंगलेले असाल अर्थात बाबांना निरंतर साथी बनवून राहत असाल तर संगमयुगाचा एक-एक संकल्प आणि वेळ अर्थात प्रत्येक मिनिटाला सफल करू शकता. तर स्वतःला चेक करा की एक-एक मिनिट, एक-एक संकल्प सफल होत आहे का? की व्यर्थ देखील जात आहे? कारण हे केवळ एका मिनिटापुरते मर्यादित नाहीये, परंतु २१ जन्मांचे कनेक्शन प्रत्येक मिनिटाशी आणि प्रत्येक संकल्पाशी आहे. इतकी याची व्हॅल्यू आहे. तर आपल्या मनामध्ये विचार करा की इतकी व्हॅल्यू नेहमीच राहते! या संगमच्या समयासाठी म्हटले गेले आहे - “आत्ता नाही तर कधीच नाही.” इतकी व्हॅल्यू सदैव स्मृतीमध्ये राहावी. तर तुम्ही सर्वांनी आज होळी साजरी केली अर्थात सदैव बाबांच्या संगाचा रंग लावला. तर संपूर्ण दिवसभर चेक केले का की बाबांचा रंग लागलेला राहिला? परमात्म संगतीमध्ये राहिलो की इतरही कुठे वेळ अथवा संकल्प गेला? चेक केले? मान हालवा, हात नाही, असे करा.

बापदादा नेहमीच हा इशारा देत आहेत की, आपल्या मनाच्या शुभ सतोगुणी संकल्पाद्वारे प्रकृतीला देखील सतोगुणी बनवत राहा. तर ती मनसा सेवा लक्षात राहते का? कारण आता प्रकृती मोठ्या रूपामध्ये आपले कार्य करणार आहे. ही तर छोटीशी गोष्ट आहे परंतु प्रकृतीला मनुष्य आत्मे त्रास देत आहेत तर ती देखील त्रास द्यायला सुरूवात करते; म्हणून बाबा म्हणतात - जसे मायाजीत बनण्यावर अटेंशन ठेवता. ठेवता ना! मायेशी वायदा आहे, तुझे काम आहे येणे आणि आमचे काम आहे विजय प्राप्त करणे. केला आहे ना हा वायदा सर्वांनी? केला आहे? मायाजीत बनायचे आहे ना! तसेच प्रकृतीजीत देखील बनायचे आहे कारण तुम्हाला राज्य करायचे आहे ना. तुमचे राज्य येत आहे ना! नशा आहे ना! लोक तर बिचारे विचार करतात काय होईल, घाबरतात. परंतु तुम्हाला माहीत आहे तर आता संगमयुग अमृतवेला चालू आहे. तर अमृतवेलेच्या नंतर काय येते? सकाळ. त्या सकाळ मध्येच आपले राज्य यायचे आहे. आहे ना नशा! आमचे राज्य आहे की केवळ महारथींसाठी राज्य आहे? तुम्हा सर्वांचे राज्य आहे. तुम्हाला चिंता नाहीये की, ‘आता काय होईल’! चांगल्यात चांगले होईल. तर तुमच्या राज्यामध्ये प्रकृती देखील सतोप्रधान असणार आहे. तर प्रकृतीला तमोगुणी पासून सतोगुणी कोण बनवणार? की प्रकृती कशीही असली तरी चालेल? तुमच्या राज्यामध्ये तुम्हाला असे चालेल का? चालेल? हो म्हणा अथवा नाही म्हणा. नाही चालणार? तर मग प्रकृतीला सतोगुणी कोण बनवणार? तुम्हीच बनवणार ना! म्हणून आता अचानकचे पहिले दृश्य, छोटे आहे हे, सुरू झाले आहे. अजून तर मोठी-मोठी दृश्ये समोर येणार आहेत आणि अचानकच येणार आहेत. जो विचारही केला नसेल तेच होणार आहे.

बापदादांनी तर बऱ्याच काळापासून अचानकचा पाठ शिकवला आहे. परंतु आता प्रत्यक्ष रूपामध्ये पाहून आता तुम्ही आपले काम सुरू करा. घाबरू नका. गोष्ट सांगतात ना - चारही बाजूंना आग लागली परंतु परमात्म्याची मुले सेफ राहिली. तर आता देखील मुले तर सेफ आहेत ना! पेपर तर येणारच आहेत परंतु तुमचे डबल काम आहे. एक तर निर्भय होऊन सामना करा, दुसरे आपले भक्त आणि आपल्या दुःखी भाऊ-बहिणींची सेवा देखील कोण करणार? तुम्ही प्रभूच्या संगतीमध्ये रंगलेले आहात, तर जे परमात्म्याच्या संगाच्या रंगामध्ये प्राप्त केले आहे ते आपल्या भाऊ-बहिणींना, भक्तांना अतिशय प्रेमाने, अंतःकरणापासून वाटा. दुःखाच्या वेळी कोणाची आठवण येते? त्यांना परमात्म्या विषयी समजत असो अथवा नसो, परंतु तरीही नाईलाजाने का होईना ‘ओ बाबा’, ‘ओ परमात्मा’ असे म्हणतील जरूर. तर तुम्हा परमात्म मुलांना आता दुःखी लोकांचा आधार बनायचे आहे. शुभ भावना, शुभकामना द्वारे, तुम्हाला बाबांकडून प्राप्त झालेल्या किरणांद्वारे त्यांचा आधार बना. तरीही तुमचाच परिवार आहे ना! तर परिवारामध्ये एकमेकांना सहयोग देतात ना! तर नावच आहे सह-योग, श्रेष्ठ-योग. आधार देण्याचे तेच साधन आहे. संदेश देखील पाठवला होता की वेळ फिक्स करा. असे नाही की होऊन जाईल, जसे ट्रॅफिक कंट्रोल, अमृतवेला यासाठी वेळा निश्चित केल्या आहेत त्यामुळे करता ना. तसेच आपल्या कार्यानुसार ही मनसा सेवा देखील समया नुसार अत्यंत आवश्यक आहे. तर वेळ काढा, दयाळू बना. कल्याणकारी बना. तुमचा स्वमान काय आहे? ‘विश्व कल्याणकारी’. तर दया येते ना? की होऊन जाईल? याबाबतीत निष्काळजी बनू नका कारण ज्यांना तुम्ही सकाश द्याल तेच तुमचे भक्त बनतील; त्यामुळे काय करायचे आहे? आहे अटेंशन? आहे का? जे समजतात आमचे अटेंशन आहे आणि वाढेल त्यांनी हात वर करा. खाली-वर करत आहेत. इथे टी.व्ही. मध्ये दिसून येत आहे. जर इतक्या सर्वांनी आपल्या स्वमानाला प्रॅक्टिकलमध्ये आणले, तर आत्मे आजही संगमावर तुमची हृदयापासून गाणी गातील - वाह परमात्म मुलांनो वाह! आम्हाला आधार दिला. आताचा आधार, अर्धा कल्प तुमची गाणी गात राहतील. तुम्ही त्यांचे पूर्वज बनाल. पूर्वज आहात. झाडामध्ये ब्राह्मण कुठे बसले आहेत! खाली बसले आहेत ना! तर पूर्वज आहात ना! भक्तांचा आवाज ऐकू येतो आहे का? थोडे स्वतःला सावध करा, दुःखी असणाऱ्यांचा आधार बनायचेच आहे, तेव्हा आवाज ऐकू येईल.

तर सर्वांनी होळी तर साजरी केली, तुमची तर संपूर्ण संगमयुगच होळी आहे. परमात्म्याच्या संगतीच्या रंगातच राहता. यादगार (आठवण) एक-दोन दिवस साजरी करतात, परंतु तुम्ही तर संपूर्ण संगम प्रभूच्या संगतीमध्ये राहणारे आहात. नशा आहे ना! लोक बिचारे मागत राहतात - ‘हे प्रभू, हे करून द्या, ते करून द्या…’ परंतु तुम्हाला २१ जन्मांची गॅरंटी मिळालेली आहे; तुम्हाला स्वप्नातही कधीच दुःखाचे कोणते दृश्य दिसणार नाही. संकल्पामध्ये सुद्धा दुःखाचा तरंग उठणार नाही. तर प्रत्येकाला जर कायमचे राज्य घ्यायचे असेल तर आता आपला परिवार, सतयुगातील साथी आणि रॉयल प्रजा, साधारण प्रजा, सर्व आता बनवू शकता. २१ जन्मांची गॅरंटी आहे. थोडीशी सेवा करा, वेळ काढा कारण तुमच्याकडे संकल्प शक्ती तर आहेच. फक्त जे बाबांकडून मिळाले आहे ते आपल्या भाऊ-बहिणींनाही द्या.

बापदादांनी यापूर्वी देखील सांगितले होते की, नेहमी हे चेक करा की मला ब्राह्मण परिवारामध्ये संस्कार मिलनाची रास करता येते का? बापदादांनी सांगितली होती ती रास तुम्ही कधी करणार त्याची डेट देखील फिक्स करा. फिक्स होऊ शकते का? होऊ शकते? पहिली लाइन सांगा. हात वर करा. होऊ शकते? पांडव देखील हात वर करा. पांडवांशिवाय गति नाही. अच्छा. तर आता लास्ट टर्न आहे, एक टर्न राहिलेला आहे. त्यामध्ये प्रत्येकाने आपल्यासाठी कोणता दृढ संकल्प करायचा आहे, तो फिक्स करून लिहा. किती वेळ लागेल, जेणेकरून ब्राह्मण परिवारामध्ये कुठेही कधीही संस्कार आपले काम करणार नाहीत. भले मग माझा संस्कार असो, किंवा दुसऱ्याचा संस्कार सुद्धा, माझ्यावर प्रभाव टाकू नये. यासाठी डेट फिक्स होऊ शकते? होऊ शकते? हात वर करा. अच्छा, सर्वांचा फोटो काढला! कारण जसा हा अचानक सीन पाहिला ना. (जपानमध्ये भूकंप आणि सुनामी आली आहे ज्यामध्ये पुष्कळ नुकसान झाले आहे); असे सर्व अचानकच होणार आहे म्हणून बापदादा तयारी तर पाहतील ना! जेव्हा दुसऱ्यांना शुभ भावना शुभकामना देता, बापदादांनी पाहिले आहे की, हा इतरांची सेवा करण्याचा प्रोग्राम देखील बनवला होता. तर प्रत्येक आत्म्याप्रती सदैव शुभ भावना आणि शुभकामना ठेवा, नंबरवार तर असणारच आहेत. तुमच्या यादगाराच्या माळेमध्ये सर्व जण एक नंबर आहेत का? नंबरवार आहेत परंतु माळेमध्ये तर ओवलेले आहेत ना! नंबर का मिळाला? भिन्न-भिन्न संस्कार आहेत परंतु आपल्याला संस्कार बघण्याऐवजी शुभ भावना, शुभकामना ठेवायची आहे. शेवटी ब्राह्मण परिवार आहे ना! कसाही असो, परिवार तर माझा आहे ना! जसे ‘माझे बाबा’ म्हणता, तसेच ‘माझा परिवार’ देखील आहे. तर चांगले आहे, मेजॉरिटींनी हात वर केला आहे. तर सर्वांचा उमंग-उत्साह आहे म्हणूनच तर हात वर केला आहे ना! तर एकमेकांचे सहयोगी बनून शुभ भावना, शुभकामनेची दृष्टी, वृत्ती, स्मृती ठेवल्याने ही रास होणे काही मोठी गोष्ट नाहीये. यामध्ये जो खूप चांगला नंबर घेईल, ठरलेल्या तारखेला प्रॅक्टिकल करून दाखवेल त्याला ‘न्यारा आणि प्यारा’ इनाम मिळेल. इनाम आत्ता सांगणार नाही परंतु बापदादा इनाम देतील. का? कारण सेवा करण्यासाठी वेळ काढावा लागेल ना! तर ही संस्कारांमुळे होणारी कुरबुर वेळ वाया घालवते; त्यामुळे आता तुम्हाला वेळेची आवश्यकता आहे. ठीक आहे ना!

हे सर्व मधुबन वाले आहेत ना! (पुढे बसणाऱ्यांकडे पाहून बाबा म्हणाले) पसंत आहे ना! कारण मधुबन वासी विशेष आहेत. बापदादांचे देखील मधुबन निवासींप्रति मनापासून प्रेम आहे. आणि मधुबनवाल्यांचे देखील आहे. बाबा असे देखील म्हणतात की, बाबांवर प्रेम आहे आणि राहील. ते कधीही पुसले जाऊ शकत नाही. या बाबतीत अमर आहे. तेव्हाच तर ‘मधुबनवासी’ बनला आहात ना! मधुबनवासी कुठेही जातात तर कोणत्या रिगार्डने पाहतात? मधुबनचा आहे, मधुबनचा आहे. त्यामुळे आता हे अटेंशन ठेवा लास्ट टर्नच्या अगोदर पूर्ण मधुबनमध्ये एखादे स्थान ठरवा जिथे आपली चिट्ठी टाकाल. परंतु लास्ट टर्नच्या अगोदर.

सर्वांनी होळी साजरी केली? तुमच्यासाठी तर रोजच होळी आहे. आत्ता देखील ही तर बाह्यरीत्या थोडीशी साजरी करावी लागते. नाहीतर तुम्ही कुठे साजरी करायला जाणार, इथेच तर साजरी करणार ना. परंतु हा झाला रीती-रिवाज. तर सर्व चोहो बाजूंच्या बापदादांच्या अति स्नेही, अति प्रिय, लाडक्या, सिकीलध्या, स्वमान-धारी, प्रत्येक मुलाला बापदादा पद्मपटीने प्रेमपूर्वक आठवण देखील देत आहेत आणि अंतःकरणापासून प्रेम सुद्धा देत आहेत. बापदादा पाहत आहेत चोहो बाजूला सर्व ऐकून, पाहून हर्षित होत आहेत.

अच्छा, आज पहिल्यांदा कोण आले आहेत? उठा. हे सर्व पहिल्यांदाच आले आहेत. अच्छा, पहिल्यांदा मधुबन निवासी बनण्याचे भाग्य प्राप्त झाले आहे. तुमचे सर्व भाऊ-बहिणी आणि बापदादा देखील तुम्हा सर्वांना पहिल्यांदा येण्याची मुबारक देत आहेत. आता बापदादा पाहतील कारण चान्स आहे की थोड्या उशिराने आला आहेत परंतु जे हवे ते आत्ता देखील ‘लास्ट सो फास्ट’ जाऊन फर्स्ट नंबर घेऊन फर्स्ट डिव्हिजनमध्ये येऊ शकता. तर जे पण आज आले आहेत त्या सर्व मुलांना बापदादांचे हे वरदान आहे. फक्त बाबांची जी महावाक्ये आहेत त्या प्रमाणे त्या श्रीमतावर चालत राहाल तर श्रीमत तुम्हाला श्रेष्ठ डिव्हिजनमध्ये आणू शकते, आणेल. इतक्या साऱ्या परिवारा द्वारे तुम्हा सर्वांना, वरदान तर बाबांचे असतेच, परंतु ही शुभ भावना, शुभकामना आहे की तुम्ही जितके पुढे जाऊ इच्छिता तितके पुढे जाऊ शकता. सर्वजण तुम्हाला मनापासून आशीर्वाद देतील. जिथे पण क्लासमध्ये येता तिथे तुम्हाला आशीर्वाद मिळत राहतील आणि ते आशीर्वाद तुम्हाला तीव्र पुरुषार्थी बनवून पुढे नेतील, हा विश्वास ठेवा. अच्छा. आता बापदादा सर्वांना खूप छान सुंदर गुडनाईट करत आहेत. अच्छा.

वरदान:-
प्रत्येक संकल्प आणि कर्मामध्ये सिद्धी अर्थात सफलता प्राप्त करणारे संपूर्ण मूर्त भव

संकल्पांची सिद्धी तेव्हा प्राप्त होईल जेव्हा समर्थ संकल्पांची रचना कराल. जे अधिक संकल्पांची रचना करतात ते त्यांची पालना करू शकत नाहीत, म्हणूनच जितकी रचना जास्त तितकी ती रचना शक्तीहीन असते. तर अगोदर व्यर्थ रचना बंद करा तेव्हाच सफलता प्राप्त होईल आणि कर्मांमध्ये सफलता प्राप्त करण्याची युक्ती आहे - कर्म करण्यापूर्वी आदि-मध्य आणि अंत जाणून मग कर्म करा. यामुळेच संपूर्ण मूर्त बनाल.

सुविचार:-
वेळेवर दुःख आणि धोक्यापासून बचाव करून सफल होणाराच ज्ञानी (बुद्धिमान) आहे.

हे अव्यक्त इशारे - अपवित्रतेच्या बीजाला सुद्धा नष्ट करून संपूर्ण स्वच्छ (पवित्र) बना.

तुम्हा होली-हंस मुलांचा आहार देखील शुद्ध, व्यवहार देखील शुद्ध, अशुद्धतेचे नामोनिशाण सुद्धा नसावे; कारण शुद्ध दुनियेमध्ये जात आहात जिथे अपवित्रता अथवा अशुद्धतेचे नामोनिशाण सुद्धा नाहीये. जेव्हा असे होली-हंस बनता तेव्हाच तुम्ही भविष्यामध्ये ‘हिज होलीनेस’ म्हणून संबोधले जाता.

विशेष सूचना:- महिन्याच्या तिसऱ्या रविवारचा योग - अभ्यास -

आज महिन्याचा तिसरा रविवार आहे, सर्व भाऊ-बहिणींनी संघटित रूपामध्ये एकत्र येऊन संध्याकाळी ६.३० ते ७.३० वाजेपर्यंत आपल्या ‘परम पवित्र’ स्वरूपामध्ये स्थित होऊन, पवित्रतेची दिव्य किरणे पसरवत सर्व आत्म्यांना “पवित्र बना-योगी बना” या शुभ प्रेरणा सकाश रूपामध्ये देण्याची सेवा करावी.