19-04-26    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   15.12.2009  ओम शान्ति   मधुबन


“परिवारासोबत प्रीत निभावण्यासाठी नॉलेजफुल बनून पित्यासमान साक्षीपणाच्या स्थितीमध्ये राहायचे आहे, बाबा, तुम्ही स्वत:, ड्रामा आणि परिवार चौघांमध्येही निश्चयबुद्धी बनून विजयी बनायचे आहे”


आज समर्थ बाबा आपल्या समर्थ मुलांना पाहत आहेत कारण प्रत्येक मूल प्रेमाने पित्यासमान बनण्याचा पुरुषार्थ खूप निष्ठेने करत आहे. बापदादा मुलांना पाहून आनंदीत होत आहेत आणि मनामध्ये मुलांचे गाणे गात आहेत - ‘वाह बच्चे वाह!’ कारण मुले बाबांच्या डोक्यावरील ताज (मुकुट) आहेत. बघा, मुलांची पूजा डबल रूपामध्ये होते, आणि बाबांची पूजा एकाच रूपामध्ये होते. तर मुले बाबांपेक्षाही बाबांद्वारे पुढे जातात म्हणून बाबा मुलांचा पुरुषार्थ पाहून खुश आहेत. नंबरवार तर आहेत परंतु पुरुषार्थाचे लक्ष्य पुढे नेत आहेत.

आज अमृतवेलेला चोहो बाजूंच्या मुलांमध्ये एक गोष्ट जी ज्ञानाचे फाउंडेशन आहे ती पाहिली. फाउंडेशन आहे - निश्चय. म्हटले देखील आहे - ‘निश्चय बुद्धी विजयी’. तर तुम्हा सर्वांचा निश्चय पाहिला, सर्वांचा नंबरवार बाबांवर निश्चय तर आहेच; आणि त्याची निशाणी आहे - सर्वांनी बाबांना ओळखून बाबांचे बनले आहेत आणि बाबांना भेटण्यासाठी इथे देखील आले आहेत. प्रत्येक मुलाचा बाबांवर अतूट निश्चय आहे; परंतु बाबांसोबत इतरही बाबतीत निश्चय पक्का झाला पाहिजे, तो आहे - स्वतःवर निश्चय. सोबतच ड्रामावर निश्चय आणि परिवारावर निश्चय. या चार प्रकारच्या निश्चयामध्ये पक्के होणे अर्थात निश्चयबुद्धी विजयंती बनणे. तर चेक करा की या चार निश्चयामध्ये पक्के आहात का? बाबांच्या बाबतीत तर सर्वजण म्हणतात - ‘माझे बाबा आणि मी बाबांचा’. बाबांना माझे म्हणून बाबांवर पूर्ण अधिकार प्राप्त केला आहे. सदैव बाबांद्वारे अधिकारी बनून सर्व खजिन्यांचे अधिकारी बनले आहात. सोबतच स्वतःवर सुद्धा निश्चय जरुरी आहे, का? जर स्वतःवर निश्चय नसेल तर दिलशिकस्त होता (निराश होता). स्वतःवर निश्चय हाच आहे की, मी बाबांद्वारे स्वमानधारी आहे, स्वराज्य अधिकारी आहे. स्वयं बाबांनी मला किती स्वमान दिले आहेत. प्रत्येक स्वमान जर स्मृतीमध्ये आणला तर किती नशा चढतो! आजकाल कोणालाही एखादे टायटल मिळते (उपाधी मिळते) तर ते देखील आपले मोठे भाग्य समजतात. परंतु तुम्हा मुलांना हा प्रत्येक स्वमान कोणी दिला! स्वयं बापदादांनी प्रत्येक मुलाला स्वमानधारी बनवले आहे. प्रत्येक स्वमानाची आठवण करून आनंदाने उडत असता. तर स्वतःवर देखील कायम निश्चयाचा इतका नशा असावा की मी बाबांद्वारे स्वराज्य अधिकारी, स्वमान अधिकारी, कोटींमध्ये कोणी आत्मा आहे. जसा बाबांवर निश्चय आहे तर त्याच सोबत स्वतःवर देखील निश्चय आवश्यक आहे कारण जर स्वतःवर निश्चय आहे तर जिथे निश्चय आहे तिथे प्रत्येक कर्मामध्ये निश्चयबुद्धी अर्थात स्वमानधारी विजयी आहे. निश्चयाचा अर्थच आहे सफलता. असे नाही की आमचा तर बाबांवर निश्चय आहे; बाबांवर आहे ते तर खूप छान, परंतु बाबांसोबत स्व चा नशा देखील आवश्यक आहे, मी कोण! प्रत्येक स्वमानाला आठवा तर निश्चय आणि नशा तुमच्या चलन आणि चेहऱ्यावरून दिसून येईल. दिसत आहे आणि दिसत राहील. त्याच सोबत तिसरी गोष्ट - ड्रामावर देखील निश्चय खूप आवश्यक आहे, कारण ड्रामामध्ये समस्या देखील येतात आणि सफलता देखील मिळते. जर ड्रामावर पक्का निश्चय असेल तर ड्रामावरील निश्चयामुळे जो निश्चयबुद्धी असतो तो समस्येला समाधान स्वरूपामध्ये बदलून टाकतो कारण निश्चय अर्थात विजय. तर कोणावर विजयी बनतो? परिवर्तन करण्यामध्ये, एका सेकंदामध्ये समस्या परिवर्तित होऊन समाधानाचे रूप बनते. तुम्ही डगमगणार नाही, अचल राहाल कारण ड्रामाच्या ज्ञानामुळे अडोल अचल बनता. हा निश्चय असतो की मीच कल्पापूर्वी देखील समाधान स्वरूप अर्थात सफल आत्मा बनले होते, बनले आहे आणि कल्पानंतरही मीच बनेन. तर हा ड्रामावरील निश्चय तुमचा नशा पक्का करतो, अभिमान वाटतो, नशा राहतो की ‘मीच होते, मीच आहे आणि मीच बनेन’, म्हणूनच या पुरुषार्थी जीवनामध्ये ड्रामाचा निश्चय देखील आवश्यक आहे आणि त्याचसोबत चौथी गोष्ट आहे - परिवारावर निश्चय; कारण बाबांनी आल्याबरोबर परिवार निर्माण केला. तर जसा बाबांवर निश्चय आहे तसा परिवारावर देखील निश्चय आवश्यक आहे कारण परिवार कोणाचा आहे? आणि इतका मोठा परिवार अजून कोणाचा असू शकतो! तर परिवारावर देखील निश्चय अति आवश्यक आहे कारण इतका मोठा परिवार विश्वामध्ये कोणाचा आहे? तर चेक करा की तुमच्या इतका मोठा परिवार विश्वामध्ये कोणाचा आहे का? कोणत्याही डिवाइन फादरचा (धर्मपित्याचा) देखील परिवाराच्या दृष्टीने नाहीये, तिथे फॉलोअर्स आहेत, इथे परिवार आहे. परिवारासोबतच सेवेमध्ये, संबंधामध्ये राहता. असे नाही की आमचे तर फक्त बाबांशीच कनेक्शन आहे, परिवाराशी नसले तर काय झाले. परिवारावरील निश्चय तर तुमचा २१ जन्म चालणार आहे. जाणता ना! परिवाराशीच संबंधामध्ये आल्यामुळे समजते की मी इतक्या मोठ्या परिवारामध्ये सर्वांशी निश्चयबुद्धी होऊन चालत आहे; परिवारामध्ये चालण्यासाठी हे अटेन्शन द्यावे लागते की परिवारामध्ये प्रत्येकाचे संस्कार भिन्न-भिन्न आहेत आणि असणारच. तुमची आठवण माळेच्या रूपामध्ये आहे, माळेमध्ये पहा कुठे पहिला नंबर आणि कुठे १०८ वा नंबर; कारण परिवारामध्ये भिन्न-भिन्न संस्कार आहेत. तर इतक्या मोठ्या परिवारामध्ये चालताना, संस्कारांना समजून घेऊन, एक परिवार, एक बाबा, एक राज्य आहे तर एकमेकांमध्ये एक होऊन चालायचे आहे. परिवारामध्ये जसा मोठा परिवार आहे, तसेच एकमेकांबद्दल मोठे मन, प्रत्येकाबद्दल शुभ भावना, शुभ कामनेच्या स्थितीमध्ये स्थित होऊन चालायचे आहे. कारण परिवारामध्येच संस्कार-स्वभाव येतो. परंतु कोणी जर समजेल की, परिवाराशी काय देणे-घेणे आहे, आमचे बाबांशी तर आहे. परंतु इथे धर्म आणि राज्य या दोन्हीची स्थापना होत आहे, फक्त धर्माची नाहीये, बाकीचे जे काही धर्मपिता आले आहेत त्यांचा फक्त धर्म आहे, राज्य नाहीये, इथे तर तुम्हा सर्वांना राज्य सुद्धा करायचे आहे. तर राज्यामध्ये परिवाराची आवश्यकता असते आणि २१ जन्म विविध रूपाने परिवारासोबतच राहायचे आहे, परिवाराला सोडून कुठेही जाऊ शकत नाही. तर चेक करा असे समजू नका की, बाबा जाणतात आणि मी जाणतो. बाबांशीच काम आहे; परंतु जर या चार निश्चयांपैकी एक जरी निश्चय कमी असेल तरी गडबडून जाल. सेवेतील साथीदार आणि बाबा तर सकाश देणारे आहेत परंतु सोबती कोण आहेत? साकारमध्ये सोबत तर परिवाराची आहे; तर बाबांनी पाहिले आहे की तीन निश्चयांमध्ये बहुतांशी ठीक चालत आहेत परंतु परिवारासोबत साथ निभावणे, संस्कार जुळवणे, प्रत्येकाला कल्याणाच्या भावनेने पाहणे आणि चालणे, यामध्ये कितीतरी मुले यथाशक्ती बनून जातात. परंतु बाबांनी पाहिले आहे की, जे परिवारावरील निश्चयामध्ये नॉलेजफुल होऊन सदैव पित्यासमान साक्षीपणाच्या स्थितीमध्ये राहून संबंधामध्ये येतात, राहतात तेच नंबरवन किंवा नंबरवन डिव्हिजनमध्ये येतात. तर चेक करा भाव-स्वभाव परिवारामध्ये असतो, त्यामुळे छोट्या-छोट्या चुका देखील होतात, विघ्न येतात ती परिवाराच्या संबंधांमध्येच येतात. त्यामुळे सर्वात आवश्यक या परिवाराच्या संबंधामध्ये पास व्हायचे आहे. जर परिवारासोबत चालण्यामध्ये, नाते निभावण्यामध्ये कोणतीही कमतरता राहिली तर ते विघ्न छोटे असो किंवा मोठे असो परंतु हैराण करते. ‘हे का, हे असे कसे’, हे परिवाराच्या कनेक्शनमध्ये येते. तर ‘का’ च्या ऐवजी… ‘का’ करायचे नाही, परंतु आपल्याला मिळून-मिसळून चालायचे आहे, पारिवारिक प्रेम निभावायचे आहे कारण हा बाबांचा परिवार आहे, भगवंताचा परिवार आहे. नेहमीचा साधारण परिवार (लौकिक परिवार) नाहीये. नशा राहिला पाहिजे की - वाह बाबा, वाह ड्रामा, वाह मी आणि वाह परिवार! ठीक आहे? चेक करता का? चौघांमध्येही पास आहात का? चौघांमध्येही? एकामध्ये सुद्धा कमी नाही. चेक करा. आत्ताच्या आत्ता चेक करा कारण विजयी बनण्याचे साधनच हे आहे. परिवारामध्येच संस्कार बाहेर पडतात आणि ते संस्कार जुळवून घेणे, स्वतःचे देखील परिवर्तन करणे आणि परिवाराला देखील इतक्या उच्च दृष्टीने पाहणे. बापदादांनी यापूर्वी देखील सांगितले आहे की, बापदादा शेवटच्या मुलाला देखील अति भाग्यवान समजतात, का? भगवंताला ओळखणे, साधारण रूपामध्ये बाबांना ओळखणे, जे इतके मोठ-मोठे महात्मा देखील ओळखू शकले नाहीत, परंतु बापदादांचा शेवटचा मुलगा देखील ‘माझे बाबा’ म्हणतो. मनापासून ‘माझे बाबा’ म्हणतात. तर बापदादा जसे शेवटच्या मुलाची देखील विशेषता पाहून, जसे इतर मुलांना लाड-प्रेम, प्रेमपूर्वक आठवण देतात तसेच शेवटच्या मुलांनाही देतात. तर चेक करा की तीन गोष्टींमध्ये ठीक आहात की चारही गोष्टींमध्ये ठीक आहात की दोन गोष्टींमध्ये ठीक आहात कि एक गोष्टींमध्ये ठीक आहात? चेक केले? केले चेक? जे समजतात की मी चारही निश्चयांमध्ये - बाबा, मी स्वतः, ड्रामा आणि परिवार - या चारही निश्चयांमध्ये ठीक आहे त्यांनी हात वर करा. ठीक आहात? अच्छा ठीक आहात, पेपर घेऊ? हो, हात वर करा. अच्छा परिवारामध्ये पास आहात? परिवाराच्या संबंधामध्ये येणे, कारण परिवाराला सोडून तर कुठे जाणार नाही, राहायचेच आहे, निभावायचेच आहे. तर यामध्ये पास आहात? कधी असे वाटते का की, ‘हे झाले नसते तर चांगले झाले असते’, ‘हे असे का करतात’, ‘असे का होते’ - हा संकल्प येतो… परिवाराचा भरपूर नशा असणारा, चारही गोष्टींमध्ये निश्चय असणारा कधीही ‘असे का’, ‘तसे का’ हे संकल्पामध्ये सुद्धा करणार नाही. संकल्पामध्ये आले जरी की, ‘असे का होते’, परंतु मला त्या ‘का’ किंवा ‘काय’ ने विचलित करु नये, माझा मूड बदलू नये, याला म्हणतात चारीही गोष्टींमध्ये पास. हात तर वर केला, बापदादांना खुश केले आहे परंतु बापदादांना ही जी परिवाराची गोष्ट आहे त्यामध्ये कधी-कधी काही गोष्टी ऐकाव्या लागतात, पाहाव्या लागतात. एकदम मोठे मन (विशाल हृदय) असावे, सर्वांना शुभ भावना, शुभ कामना देऊन ठीक करायचे आहे, कारण परिवारच एक आहे. एकमत होऊन चालायचे आहे आणि चालवायचे आहे. फक्त चालायचे नाहीये, चालवायचे सुद्धा आहे. म्हणूनच बापदादा या गोष्टीवर लक्ष वेधून घेत आहेत की जे परिवारामध्ये कोणत्याही प्रकारच्या हलचलमध्ये पास होतात, व्यर्थ चालत नाही, त्यांनी इतरांनाही तसे बनवायचे आहे. आत्ता तर तुम्ही आपापल्या सेंटरवर किती जण राहता, चला जास्तीत-जास्त २५-५०, इतके नसतातच परंतु समजा मोठे स्थान आहे, तिथेही ५०-६०, ठीक आहे जास्तीत-जास्त १०० सुद्धा समजा, इतके नाही आहेत परंतु तरीही मानून चाला, तर बापदादांनी सर्व सेंटर्सच्या मुलांना शेवटच्या मुलाला देखील माझा लाडका असे म्हणून चालवले आहे आणि प्रेमाची निशाणी आहे - दररोज बापदादा प्रेमपूर्वक आठवण काय देतात? ‘गोड गोड’, बापदादा जाणतात की काही आंबट देखील आहेत परंतु प्रेमपूर्वक आठवण देताना ‘गोड-आंबट मुलांनो’ असे कधी म्हटले आहे का? त्यांना देखील लाडकेच म्हणतात, ना केवळ म्हणतात परंतु माझा बच्चा आहे, माझ्या भावनेने चालतो, कारण ड्रामामध्ये, माळेमध्ये सर्वच काही एक नंबरचे नाहीत, हा रिझल्ट आहे. संस्कार भिन्न-भिन्न असतात, असणारच, नाहीतर सगळेच राजा बनतील, प्रजा कोण बनणार! राज्य कोणावर करणार? चांगली प्रजा देखील हवी ना, रॉयल प्रजा, राजधानी आहे ना. अशा प्रकारे प्रत्येकाने स्वतःला चेक करा, परिवारामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये संस्कार खराब आहेत, परंतु माझा संस्कार कोणता आहे? जर खराबला पाहून माझा संस्कार देखील खराब झाला, तर मग मी देखील खराब झालो ना. खराब चांगल्याला सुद्धा बदलून टाकतो.

बाबांनी स्थापनेच्या वेळी ३५० ते ४०० जणांना एकत्र सांभाळले आहे, इतका तर सध्या कोणाचाही एकत्र राहणारा परिवार नाहीये. चला, ड्युटी वेगवेगळी आहे परंतु ती ड्युटी आहे आणि परिवारामध्ये ड्युटी आहे. रिवाजी (लौकिक) परिवार, रिवाजी ड्युटी, रिवाजी रीतीने दिनचर्या घालवणे, असे नाहीये, हा न्यारा आणि प्यारा (वेगळा आणि सुंदर) परिवार आहे. यामध्ये डिस्टर्ब होणे, आणि मग बहाणा तर हा देता कि ह्याने केले म्हणून असे झाले. असे केले म्हणून तसे झाले, परंतु बाबांच्या समोर देखील काय अपोझिशन (विरोध) झाला नाही का! भागन्ती देखील झाले ना! हे अपोझिशन नाहीये का! परंतु बाबांनी तरीही सांगितले, कोणी भागन्ती जरी झाले तरीही टोली पाठवा, त्यांना बोलावण्याचा प्रयत्न करा, सेवा करा, आठवण करून द्या. अशा प्रकारे चारही निश्चयांमध्ये पास व्हायचे आहे की तीनमध्ये, की दोनमध्ये? नंबरवन व्हायचे आहे. यासाठी विनाशाची तयारी असून देखील अजून विनाश थांबलेला आहे. प्रकृती देखील बाबांकडे येते, प्रकृती देखील म्हणते की आता खूप ओझे झाले आहे. प्रकृती देखील ओझ्यातून मुक्त होऊ इच्छिते आहे. माया देखील म्हणत आहे की, मी जाणते की माझा पार्ट आता संपणार आहे परंतु ब्राह्मण परिवारामध्ये अशीही मुले आहेत जी छोट्या गोष्टीमध्ये माझे सोबती बनतात. मला बसायला लावतात. तर आपले राज्य आणण्यामध्ये हे चार निश्चय परसेंट मध्ये आहेत म्हणूनच वेळ देखील थांबला आहे. बाकी माया आणि प्रकृती दोन्ही रेडी आहेत. आता सांगा, ऑर्डर करू का? मुले जर एव्हररेडी नसतील तर माया आणि प्रकृतीला ऑर्डर करू का? करू? हात वर करा, तयार आहात? असेच हात वर करू नका. पेपर येईल, पेपर येणारच. एव्हररेडी?

आता बापदादांची प्रत्येक मुलाकडून हीच आशा आहे की ‘कसे’ ला संपवून ‘असे’ करा. ‘कसे करू’, ‘कसे होईल’, हे नको. असे व्हावे. ‘काय करू’ नाही, ‘असे’ करू. ही आशा कधीपर्यंत पूर्ण कराल? किती वेळ हवा? कारण सर्वांना तयार व्हायचे आहे. जर तुम्ही तयार आहात, हात वर केला आहे, तर त्यांचे काम काय आहे? एकमेकांना आप समान बनवणे. अच्छा, बापदादांनी सर्व बातम्यांचा रिझल्ट ऐकला आहे, जे काही चालले आहे, चांगले चालले आहे आणि रिझल्ट देखील चांगल्या उमंग-उत्साहाचा राहिला आहे; म्हणून आता ध्येय ठेवा की, ‘होणारच आहे’, ‘करायचेच आहे’, समाप्तीला जवळ आणा. तुम्ही थोडे डगमगता ना तर मग समाप्ती देखील दूर होत जाते. तुम्हालाच समाप्तीला जवळ आणायचे आहे कारण राज्य करणारे तयार नसतील तर समय तरी काय करणार? म्हणूनच सर्व बहाणे, कारणे, या ‘कारण’ शब्दाला समाप्त करा. निवारण समोर आणा कारण तुम्हा सर्वांचे हेच ध्येय आहे ना की दुःखी असलेल्यांना संदेश देऊन मुक्त करणे. त्यांना मुक्त केल्याशिवाय तुम्ही मुक्तीमध्ये जाऊ शकत नाही. तर यांना मुक्त करा कारण बाबा आले आहेत ना तर संपूर्ण विश्वातील मुलांना वारसा तर देणारच ना. तुम्हाला जीवनमुक्तीचा वारसा देतील परंतु संतान तर सर्वच आहेत ना! त्यांना देखील वारसा तर द्यायचा आहे ना. तर त्यांचा वारसा आहे मुक्ती, तुमचा वारसा आहे जीवनमुक्ती. जोपर्यंत त्यांना मुक्ती देणार नाही तोपर्यंत तुम्ही देखील जाऊ शकत नाही. यासाठी १२ वेळा फरिश्ता रूपाचा आणि १२ वेळा निराकारी स्वरूपामध्ये स्थित होण्याची ड्रिल करा. रात्रीचे आणि दिवसाचे मिळून २४ तास आहेत आणि २४ वेळा ही ड्रिल करायची आहे, झोपण्याच्या वेळी खुशाल झोपा. बापदादा असे म्हणत नाहीत की झोपू नका. झोप घ्या परंतु दिवसाचा हा सराव वाढवा. जेव्हा एखादे फंक्शन करता तेव्हा पूर्ण दिवसभर काम करता ना. जागरण करता ना! तसेच या ड्रिल साठी देखील वेळ काढा. अच्छा.

चोहो बाजूंचे बाबांचे स्नेही, जे स्नेही असतात ते सहयोगी नक्कीच असतात, स्नेहाचे रिटर्न प्रत्यक्ष रूप म्हणजे ते प्रत्येक कार्यामध्ये तन-मन-धन-जन सर्वांमध्ये एकमेकांचे सहयोगी नक्कीच असतील. तर अशी स्नेही आणि सहयोगी मुले, जी सदैव बाबांच्या प्रेमामध्ये लवलीन राहणारी आहेत, प्रेमामध्येच नाहीत, तर लवलीन (प्रेमामध्ये एकरूप) होऊन राहणारे आणि सदैव बाबांच्या सर्व कार्यामध्ये समय-संकल्प लावणारे, कारण संगमयुगामध्ये समय आणि संकल्पाची खूप व्हॅल्यू आहे, एका जन्मामध्ये अनेक जन्मांचे प्रालब्ध बनविणारे, असे तीव्र पुरुषार्थी प्रत्येक गुण, प्रत्येक शक्तीला, प्रत्येक वेळी समयानुसार कार्यामध्ये लावणारे अशा गुण संपन्न, शक्ति संपन्न मुलांना खूप-खूप पद्म-पद्म पटीने प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

वरदान:-
विधात्याच्या सोबतच वरदाता बनून सर्व आत्म्यांमध्ये बळ भरणारे दयाळू भव

जर कोणी आत्मा इच्छुक आहे परंतु हिंमत नसल्यामुळे इच्छा असूनही प्राप्ती करू शकत नसेल तर अशा आत्म्यांसाठी विधाता अर्थात ज्ञान दाता बनण्यासोबतच दयाळू बनून वरदाता बना, त्यांना आपल्या शुभभावनेचे एक्स्ट्रा बळ द्या. परंतु असे वरदानी मूर्त तेव्हाच बनू शकता, जेव्हा तुमचा प्रत्येक संकल्प बाबांप्रति कुर्बान असेल. प्रत्येक वेळी, प्रत्येक संकल्प, प्रत्येक कर्मामध्ये ‘वारी जाऊ’ (समर्पित होणे) चे जे वचन घेतले आहे, त्याचे पालन करा.

सुविचार:-
आपल्या सत्य स्वरूपाची स्मृती असेल तर सत्यतेची शक्ती येईल.

हे अव्यक्त इशारे - महान बनण्याकरिता मधुरतेचा आणि नम्रतेचा गुण धारण करा.

बापदादा आता प्रत्येक मुलाच्या मस्तकावर संपूर्ण पवित्रतेचा चमकणारा मणी पाहू इच्छित आहेत. रूहानियतने (आत्मिकतेने) भरलेले चमकत असणारे नेत्र पाहू इच्छित आहेत, शब्दामध्ये मधुरता, विशेषता, अमूल्य बोल ऐकू इच्छित आहेत आणि कर्मामध्ये संतुष्टता, निर्माणता सदैव पाहू इच्छित आहेत.

विशेष सूचना - महिन्याच्या तिसऱ्या रविवाराचा योग अभ्यास -

आज महिन्याचा तिसरा रविवार आहे, सर्व भाऊ-बहिणींनी संघटित रूपाने एकत्र येऊन सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजेपर्यंत संपूर्ण ग्लोबला सन्मुख इमर्ज करून पवित्रतेची श्रेष्ठ वायब्रेशन्स देण्याची सेवा करावी. चोहोबाजूंच्या चिंता, भय आणि दुःखाच्या वायुमंडळामध्ये आपल्या दयाळू मास्टर दाता स्वरूपाने शांती आणि शक्तीची सकाश पसरवा.