23-07-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, तुम्हाला बाबांसारखे खरा-खरा पैगंबर अथवा मेसेंजर बनायचे आहे, सर्वांना घरी जाण्याचा मेसेज द्यायचा आहे”

प्रश्न:-
आजकाल लोकांची बुद्धी पूर्ण दिवस कोणत्या दिशेने भटकत असते?

उत्तर:-
फॅशनच्या दिशेने. लोकांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारची फॅशन करतात. ही फॅशन चित्रांवरूनच शिकले आहेत. समजतात पार्वती देखील अशी फॅशन करायची, केश रचना इत्यादी करायची. बाबा म्हणतात - तुम्हा मुलांना या पतित दुनियेमध्ये फॅशन करायची नाहीये. तुम्हाला तर मी अशा दुनियेमध्ये घेऊन चाललो आहे जिथे नैसर्गिक सौंदर्य असते. फॅशन करण्याची गरज नाही.

गीत:-
तुम्हीं हो माता पिता…

ओम शांती।
मुलांनी गाणे ऐकले. जेव्हा महिमा गातात तेव्हा बुद्धी वरती निघून जाते. हे आत्माच बाबांना उद्देशून म्हणते, तेच खिवैया (नावाडी) आहेत, पतित-पावन आहेत अथवा खरे-खरे मेसेंजर आहेत. बाबा येऊन आत्म्यांना मेसेज देतात आणि ज्यांना मेसेंजर अथवा पैगंबर म्हणतात, ते कोणी लहान किंवा कोणी मोठे असतात. वास्तविक ते मेसेज अथवा पैगाम देत नाहीत. ही तर खोटी महिमा केली आहे. मुले समजतात की, त्या एकाव्यतिरिक्त या मनुष्य सृष्टीवर इतर कोणाचीही महिमा नाहीये. सर्वात जास्त महिमा या लक्ष्मी-नारायणाची आहे कारण हे आहेत नवीन दुनियेचे मालक. हे देखील भारतवासीच जाणतात. दुनियेतील लोक फक्त एवढेच जाणतात की भारत प्राचीन देश आहे. भारतातच गॉड-गॉडेजचे (देवी-देवतांचे) राज्य होते. श्रीकृष्णाला देखील ‘गॉड’ म्हणतात. भारतवासी यांना भगवान-भगवती म्हणतात. परंतु हे कोणालाच ठाऊक नाहीये की हे भगवान-भगवती सतयुगामध्ये राज्य करतात. भगवंताने गॉड-गॉडेजचे (देवी-देवतांचे) राज्य स्थापन केले. बुद्धी देखील म्हणते - आम्ही भगवंताची संतान आहोत तर आम्ही देखील भगवान-भगवती असायला हवे. सर्व एकाचीच मुले आहेत ना. परंतु भगवान-भगवती म्हणू शकत नाही. त्यांना म्हणतात - देवी-देवता. या सर्व गोष्टी बाबा बसून समजावून सांगतात. भारतवासी म्हणतील की आम्ही भारतवासी अगोदर नवीन दुनियेमध्ये होतो. नवीन दुनिया तर सर्वांना हवी आहे. बापूजींना देखील नवीन दुनिया, नवीन रामराज्य हवे होते. परंतु रामराज्याचा अजिबात अर्थच समजत नाहीत. आजकाल लोकांना स्वतःचा अहंकार किती आहे. कलियुगामध्ये आहेत - पत्थर-बुद्धी, सतयुगामध्ये आहेत पारस-बुद्धी. परंतु हे कोणालाच समजत नाही. भारतच सतयुगामध्ये पारस-बुद्धी होता. आता कलियुगामध्ये भारत पत्थर-बुद्धी आहे. मनुष्य तर यालाच स्वर्ग समजतात. म्हणतील स्वर्गामध्ये विमाने होती, मोठ-मोठे महाल होते, ते तर सर्व आता आहेत. विज्ञानाने किती प्रगती केली आहे, किती सुख आहे. फॅशन इत्यादी किती आहे. संपूर्ण दिवस बुद्धी फॅशनच्याच मागे लागलेली असते. कृत्रिमरीत्या सुंदर दिसण्यासाठी केश रचना इत्यादी कशी करत असतात! किती खर्च करतात. ही सर्व फॅशन निघाली आहे चित्रांमधून. समजतात की आम्ही पार्वती सारखी केश रचना इत्यादी करतो. हे सर्व आकर्षित करण्यासाठीच करत असतात. पूर्वी पारशी लोकांच्या स्त्रिया चेहऱ्यावर काळी जाळी घालत असत जेणेकरून कोणी पाहून आशिक होऊ नये. याला म्हटले जाते पतित दुनिया.

गातात - ‘तुम्ही हो माता पिता तुम्हीं हो…’ परंतु हे कोणाला म्हटले पाहिजे? मात-पिता कोण आहेत? हे सुद्धा जाणत नाहीत. मात-पित्याने जरूर वारसा दिला असेल. बाबांनी तुम्हा मुलांना सुखाचा वारसा दिला होता. म्हणतात देखील - ‘बाबा, आम्ही तर तुमच्याशिवाय इतर कोणाकडूनही ऐकणार नाही’. आता तुम्ही जाणता शिवबाबांची महिमा गायली जाते. ब्रह्माची आत्मा देखील स्वतः म्हणते - आम्हीच सो पावन होतो, आता पतित बनलो आहोत. ब्रह्माची मुले देखील असेच म्हणतील, आम्ही ब्रह्माकुमार-कुमारी सो देवी-देवता होतो, मग ८४ जन्मांच्या अखेरीला आता पतित बनलो आहोत. जे नंबर वन पावन, तेच नंबर वन पतित. जसा पिता तशीच मुले. हे स्वतः देखील म्हणतात, शिवबाबा देखील म्हणतात की, ‘मी यांच्या (ब्रह्मा बाबांच्या) अनेक जन्मांच्या अंतिम जन्मामध्ये येतो, जे पहिल्या नंबरमध्ये पूज्य लक्ष्मी-नारायणाच्या घराण्यामध्ये होते’. आता आहे संगम, तुम्ही कलियुगामध्ये होता, आता संगमयुगी बनले आहात. बाबा संगमावरच येतात, ड्रामा अनुसार मुलांची देखील वृद्धी होत जाते. आता मुलांना ज्ञान तर मिळाले आहे. आम्हीच सो देवता होतो, नंतर मग क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनलो आहोत. संपूर्ण चक्राला चांगल्या रीतीने तुम्हीच जाणता. हे तर खूप सोपे आहे, आपण ८४ जन्म घेतले. कित्येकांच्या बुद्धीमध्ये हे सुद्धा बसत नाही. विद्यार्थ्यांमध्ये नंबरवार तर असतातच. अगदी सुरुवातीपासून सुरुवात करतात फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास; मुली स्वतः देखील म्हणतात - आमची थर्डक्लास बुद्धी आहे. आम्ही कोणाला हे ज्ञान समजावून सांगू शकत नाही. इच्छा तर खूप असते परंतु बोलू शकत नाही, बाबा काय करू? हा झाला आपल्या कर्मांचा हिशोब. आता बाबा म्हणतात - मी तुम्हाला कर्म-अकर्म-विकर्माच्या गतीचे ज्ञान ऐकवतो. कर्म करायचे आहे, हे तर तुम्ही मुले जाणता. थर्ड क्लास बुद्धी असलेले या गोष्टी समजू शकणार नाहीत. हे आहेच रावण राज्य, परंतु हे कोणालाच माहीत नाही. रावण राज्यामध्ये मनुष्य तर विकर्मच करणार, तर मग खालीच कोसळणार (पतनच होणार). गुरू केलाच जातो दुःखी दुनियेमध्ये. सद्गतीसाठीच तर गुरू करतात की, मुक्तीमध्ये घेऊन जावे. ते आहे निर्वाणधाम - वाणी पासून दूर असलेले स्थान, मनुष्य स्वतःला वानप्रस्थी म्हणतात. ते तर केवळ सांगण्यापुरते आहे. वानप्रस्थींची देखील सभा असते. सर्व काही संपत्ती इत्यादी मुलांच्या स्वाधीन करून गुरूकडे जाऊन बसतात. खाणे-पिणे इत्यादी तर जरूर मुलेच देतील. परंतु ‘वानप्रस्थ’ याचा अर्थ कोणीही समजत नाही. कोणाच्याही बुद्धीमध्ये हे येत नाही की आपल्याला निर्वाणधाममध्ये जायचे आहे. आपल्या घरी जायचे आहे. ते त्याला घर समजत नाहीत. ते तर समजतात - ज्योतीमध्ये ज्योत विलीन होणार. निर्वाणधाम तर राहण्याचे स्थान आहे. पूर्वी साठी नंतर वानप्रस्थ स्वीकारत असत, हा जणू काही नियम होता. अजूनही असे करतात. आता तुम्ही समजावून सांगू शकता की वाणी पासून दूर तर कोणीही जाऊ शकत नाही. यासाठी तर बाबांनाच बोलावतात की हे पतित-पावन बाबा या, आम्हाला पावन बनवून घरी घेऊन जा. मुक्तीधाम हे आत्म्यांचे घर आहे. तुम्हा मुलांना सतयुगाबद्दल देखील सांगितले आहे - तिथे कोण राहतात! कशी वृद्धी होते! लोकसंख्येविषयी देखील कोणालाच माहिती नाहीये. रामराज्यामध्ये लोकसंख्या किती असेल! मुले इत्यादी कसा जन्म घेतील! काहीच समजत नाहीत. असा कोणताही विद्वान, आचार्य, पंडित नाही, जो या ड्रामाच्या चक्राला समजावून सांगू शकेल. ८४ लाखांचे चक्र असूच कसे शकते! किती चुकीच्या गोष्टी आहेत. सुताचा पूर्णपणे गुंता झालेला आहे. बाबा समजावून सांगतात आता तुम्ही जाणता बाबांनी कर्म-अकर्म-विकर्माचे सर्व रहस्य समजावून सांगितले आहे. सतयुगामध्ये तुमचे कर्म, अकर्म होऊन जाते. तिथे कोणते वाईट कर्म होतच नाही, म्हणून कर्म, अकर्म होऊन जाते. इथे मनुष्य जे पण कर्म करतात ते विकर्म बनते.

आता तुम्ही मुले जाणता - आम्हा लहान-थोर सर्वांची, साऱ्या दुनियेची वानप्रस्थ अवस्था आहे. सगळेच वाणी पासून दूर जाणार आहेत. म्हणतात - ‘हे पतित-पावन या, येऊन आम्हाला पतिता पासून पावन बनवा’. परंतु जोपर्यंत पावन नवीन दुनिया येत नाही, इथे पतित दुनियेमध्ये पावन तर कोणी राहू शकणार नाही. ही जी काही पतित दुनिया आहे, ती सर्व नष्ट होणार आहे. तुम्ही जाणता आपल्याला पुन्हा नवीन दुनियेमध्ये जायचे आहे. कसे जाणार? हे सर्व नॉलेज आहे. हे आहे - नवीन ज्ञान, नवीन दुनिया, अमरलोक अथवा पावन दुनियेकरिता. तुम्ही आता संगमावर बसला आहात. हे देखील जाणता इतर जे काही मनुष्य आहेत, ब्राह्मण नाहीत, ते कलियुगामध्ये आहेत. आपण सर्व संगमावर आहोत. सतयुगामध्ये जात आहोत, खरोखर हे संगमयुग आहे. तो तर आहेच स्वर्ग. त्याला संगम म्हटले जात नाही. संगम आहे आता. हे संगमयुग सर्वात छोटे आहे. याला लीप युग म्हटले जाते, ज्यामध्ये मनुष्य पाप-आत्म्यापासून धर्म-आत्मा बनतात म्हणून याला ‘धर्माऊ युग’ म्हटले जाते. कलियुगामध्ये सर्व मनुष्य अधर्मी आहेत. तिथे तर सर्व धर्मात्मा असतात. भक्तिमार्गाचा किती मोठा प्रभाव आहे. इतक्या सुंदर दगडाच्या मुर्त्या बनवतात, ज्या पाहताच मन आनंदी व्हावे. ती आहे पाषाण-पूजा (मूर्ती पूजा). शिवाच्या मंदिरामध्ये किती दूर-दूर पर्यंत पूजा करण्यासाठी जातात. ‘शिव’चे चित्र (शिवलिंग) तर घरातही ठेवू शकतात. मग इतके दूर-दूर भटकण्याची गरजच काय. हे ज्ञान आता बुद्धीत आले आहे. आता तुमचे डोळे उघडले आहेत, बुद्धीची कपाटे उघडली आहेत. बाबांनी नॉलेज दिले आहे. परमपिता परमात्मा या मनुष्य सृष्टीचे बीजरूप, ज्ञानाचे सागर, नॉलेजफुल आहेत. आत्मा देखील ते ज्ञान धारण करते. आत्माच प्रेसिडेंट इत्यादी बनते. मनुष्य तर देह-अभिमानी असल्याकारणाने देहाचीच महिमा करत राहतात. आता तुम्ही समजता आत्माच सर्व काही करते. तुम्ही आत्मे ८४ जन्मांचे चक्र फिरून पूर्णपणे दुर्गतीला प्राप्त झाले आहात. आता आम्ही आत्म्यांनी बाबांना ओळखले आहे. बाबांकडून वारसा घेत आहोत. आत्म्याला शरीर तर जरूर धारण करावे लागेल. शरीराशिवाय आत्मे कसे बोलणार! कसे ऐकणार! बाबा म्हणतात - ‘मी निराकार आहे. मी देखील शरीराचा आधार घेतो’. तुम्ही जाणता शिवबाबा या ब्रह्मा तनाद्वारे आम्हाला ऐकवत आहेत. या गोष्टी तुम्ही ब्रह्माकुमार-कुमारीच समजावून सांगता. तुम्हाला आता ज्ञान मिळाले आहे. ब्रह्मा द्वारे आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना होत आहे. तेच बाबा राजयोग शिकवत आहेत, यात गोंधळून जाण्याचा प्रश्नच येत नाही. शिवबाबा आम्हाला समजावून सांगतात आणि मग आम्ही इतरांना समजावून सांगतो. आम्हाला देखील शिकवणारे शिवबाबाच आहेत. आता तुम्ही म्हणाल आम्ही पतितापासून पावन बनत आहोत. बाबा समजावून सांगत आहेत ही आहेच पतित दुनिया, रावणाचे राज्य आहे ना. रावण, सर्वांना पाप-आत्मा बनवतो. हे इतर कोणीही जाणत नाही. भले रावणाचा पुतळा जाळतात परंतु काहीच समजत नाहीत. ‘सीतेला रावण घेऊन गेला, असे केले…’ अशा कितीतरी कथा लिहून ठेवल्या आहेत. जेव्हा सत्संगामध्ये बसून ऐकतात तेव्हा अश्रू ढाळतात. त्या सर्व आहेत दंतकथा. बाबा आपल्याला विकर्माजीत बनविण्याकरिता हे ज्ञान समजावून सांगत आहेत. म्हणतात - ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा. इतर कुठेही बुद्धी गुंतवू नका. शिवबाबांनी आपल्याला स्वतःचा परिचय दिला आहे. पतित-पावन बाबा येऊन स्वतःचा परिचय देतात. आता तुम्ही समजता की किती गोड बाबा आहेत जे आम्हाला स्वर्गाचा मालक बनवत आहेत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) कर्म-अकर्म आणि विकर्माच्या गतिला जाणून श्रेष्ठ कर्म करायची आहेत. ज्ञान दान करून धर्मात्मा बनायचे आहे.

२) ही वानप्रस्थ अवस्था आहे - या अंतिम क्षणांमध्ये पावन बनून पावन दुनियेमध्ये जायचे आहे. सर्वांना पावन बनण्याचा मेसेज द्यायचा आहे.

वरदान:-
पास विथ ऑनर बनण्याकरिता सर्वांद्वारे संतुष्टतेचा पासपोर्ट प्राप्त करणारे संतुष्टमणी भव

जी मुले आपल्या स्वतःप्रति, आपल्या पुरुषार्थाप्रति अथवा सेवेप्रति, ब्राह्मण परिवाराच्या संपर्काप्रति सदैव संतुष्ट राहतात त्यांनाच ‘संतुष्टमणी’ म्हटले जाते. सर्व आत्म्यांच्या संपर्कामध्ये स्वतःला संतुष्ट ठेवणे अथवा सर्वांना संतुष्ट करणे - यामध्ये जे विजयी बनतात तेच विजयीमाळेमध्ये येतात. पास विथ ऑनर बनण्यासाठी सर्वांद्वारे संतुष्टतेचा पासपोर्ट मिळाला पाहिजे. हा पासपोर्ट घेण्यासाठी फक्त सहन करण्याची शक्ती आणि सामावून घेण्याची शक्ती धारण करा.

बोधवाक्य:-
दयाळू बनून सेवेद्वारे, निराश आणि थकलेल्या आत्म्यांना आधार द्या.

हे अव्यक्त इशारे - ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा.

पॉवरफुल (शक्तिशाली) आठवण करण्यासाठी सच्च्या मनाचे प्रेम हवे. सच्च्या मनाचे, सेकंदामध्ये बिंदू बनून बिंदू स्वरूप बाबांची आठवण करू शकतात. सच्च्या मनाची मुले सच्च्या साहेबला (शिवबाबांना) संतुष्ट करत असल्याकारणाने, बाबांचे विशेष आशीर्वाद प्राप्त करतात, ज्यामुळे सहजच एका संकल्पामध्ये स्थित होऊन ज्वाला रूपाची आठवण करण्याचा अनुभव करू शकतात, पॉवरफुल व्हायब्रेशन्स पसरवू शकतात. सत्याच्या शक्तीमुळे बुद्धी देखील वेळेला युक्तियुक्त, यथार्थ कार्य करवून घेते, कोणतेही उल्टे कार्य होऊ शकत नाही.