25-09-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, तत्त्वांसहीत सर्व मनुष्य मात्रांना परिवर्तित करणारी युनिव्हर्सिटी केवळ ही एकच आहे, इथूनच सर्वांची सद्गती होते”

प्रश्न:-
बाबांवर निश्चय होताच क्षणी कोणता एक सल्ला ताबडतोब अंमलात आणला पाहिजे?

उत्तर:-
१) जर निश्चय झाला की, बाबा आलेले आहेत, तर बाबांचा सर्वात पहिला सल्ला हा आहे की, या डोळ्यांनी जे काही बघता ते विसरून जा. एका माझ्या मतावर चाला. हा सल्ला ताबडतोब अंमलात आणला पाहिजे. २) जर तुम्ही बेहदच्या बाबांचे बनले आहात तर पतितांसोबत तुमची देवाण-घेवाण होता कामा नये. निश्चयबुद्धी मुलांना कधी कोणत्या बाबतीत संशय येऊ शकत नाही.

ओम शांती।
हे घरा परी घर देखील आहे आणि युनिव्हर्सिटी देखील आहे. यालाच गॉड-फादरली वर्ल्ड युनिव्हर्सिटी (ईश्वरीय विश्वविद्यालय) म्हटले जाते; कारण साऱ्या दुनियेतील मनुष्यमात्रांची सद्गती होते. खरी वर्ल्ड युनिव्हर्सिटी ही आहे. घरा परी घर देखील आहे. मात-पित्याच्या सन्मुख बसले आहात, आणि मग युनिव्हर्सिटी देखील आहे. स्पिरीच्युअल फादर (रुहानी बाबा) बसलेले आहेत. हे रुहानी नॉलेज आहे जे रुहानी बाबांकडून मिळते. स्पिरीच्युअल नॉलेज, स्पिरीच्युअल फादरशिवाय इतर कोणीही मनुष्य देऊ शकत नाही. त्यांनाच ज्ञानाचा सागर म्हटले जाते आणि ज्ञानाद्वारेच सद्गती होते; म्हणून ज्ञान-सागर, सर्वांचे सद्गती दाता एक बाबाच आहेत. बाबांद्वारे सर्व विश्वातील मनुष्यच तर काय, परंतु प्रत्येक गोष्ट, ५ तत्वे देखील सतोप्रधान बनतात. सर्वांची सद्गती होते. या गोष्टी नीट समजून घ्यायच्या आहेत. आता सर्वांची सद्गती होणार आहे. जुनी दुनिया आणि दुनियेमध्ये राहणारे सर्व परिवर्तित होतील. जे काही इथे बघता ते सर्व परिवर्तित होऊन नवीन बनणार आहे. गायले देखील जाते - ‘यहाँ है झूठी माया, झूठी काया…’ हा झूठ-खंड बनतो. भारत सच-खंड होता, आता झूठ-खंड बनला आहे. रचयिता आणि रचनेच्या बाबतीत जे मनुष्य सांगतात ते सर्व खोटेच सांगतील. आता तुम्ही बाबांकडून जाणता - भगवानुवाच. भगवान एक बाबाच आहेत ना. ते आहेत निराकार, खरे तर सर्व आत्मे निराकार आहेत, मग इथे साकारी रूप घेतात. तिथे आकार नाहीये. आत्मे मूलवतन अथवा ब्रह्म महतत्त्वामध्ये निवास करतात. ते ब्रह्म महतत्त्व आहे, आम्हा आत्म्यांचे घर. हे आकाश तत्त्व आहे, जिथे साकारी पार्ट चालतो. जगाचा इतिहास-भूगोल रिपीट होतो, याचा अर्थ देखील समजत नाहीत, म्हणतात - रिपीट होतो. गोल्डन एज्ड, सिल्वर... त्यानंतर मग पुढे काय? मग गोल्डन एज्ड जरूर येईल. संगमयुग एकच असते. सतयुग-त्रेता अथवा त्रेता आणि द्वापर यांचा संगम म्हटला जात नाही, ते चुकीचे होते. बाबा म्हणतात - मी कल्प-कल्प, कल्पाच्या संगमयुगामध्ये येतो. मला बोलवतात देखील तेव्हाच जेव्हा पतित बनतात. म्हणतात तुम्ही पावन बनविण्यासाठी या. पावन असतातच मुळी सतयुगामध्ये. आता आहे संगम, याला कल्याणकारी संगमयुग म्हटले जाते. आत्मा आणि परमात्म्याच्या मिलनाचा संगम, याला कुंभ देखील म्हटले जाते. ते मग नद्यांचा संगम दाखवतात. दोन नद्या तर आहेत, तिसरी मग गुप्त नदी म्हणतात. हे देखील खोटे आहे. गुप्त नदी कोणती असू शकते का? सायन्सवाले देखील मानणार नाहीत की कोणती गुप्त नदी असू शकते. बाण मारला, गंगा उत्पन्न झाली, हे सर्व खोटे आहे. गायले गेले आहे - ‘ज्ञान, भक्ती आणि वैराग्य’. हे शब्द पकडले आहेत परंतु अर्थ समजत नाहीत. पहिले आहे ज्ञान-दिवस सुख, मग आहे भक्ती-रात्र दुःख. ब्रह्माचा दिवस, ब्रह्माची रात्र. आता रात्र एकाचीच तर असू शकत नाही, भरपूरजण असतील ना. दिवस असतो अर्ध्याकल्पाचा, मग रात्र देखील अर्ध्याकल्पाची असते. नंतर असते साऱ्या जुन्या दुनियेपासून वैराग्य.

बाबा म्हणतात - देहा सहीत जे काही तुम्ही या डोळ्यांनी बघत आहात ते ज्ञानाद्वारे विसरायचे आहे. धंदा इत्यादी सर्व करायचा आहे. मुला-बाळांना सांभाळायचे आहे. परंतु बुद्धीचा योग एकाशीच लावायचा आहे. अर्धेकल्प तुम्ही रावणाच्या मतानुसार चालता. आता बाबांचे बनले आहात तर जे काही कराल ते बाबांच्या मतानुसार करा. इतका काळ तुमची देवाण-घेवाण पतितांशी चालत आलेली आहे, त्याचा परिणाम काय झाला आहे. दिवसेंदिवस पतितच बनत आला आहात कारण भक्ती-मार्ग आहेच मुळी उतरत्या कलेचा मार्ग. सतोप्रधान, सतो, रजो, तमो मध्ये यावे लागते. जरूर उतरायचेच आहे. यापासून कोणीही सोडवू शकत नाही. लक्ष्मी-नारायणाचे देखील ८४ जन्म सांगितले आहेत ना. इंग्रजीतील शब्द खूप सुंदर आहेत. गोल्डन एज्ड, सिल्वर एज्ड… अशी अशुद्धता पडत जाते. यावेळी येऊन आयर्न एज्ड बनले आहेत. गोल्डन एज्डमध्ये नवीन दुनिया होती, नवा भारत होता. या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. कालचीच गोष्ट आहे. शास्त्रांमध्ये लाखो वर्षे लिहून ठेवले आहे. आता बाबा म्हणतात - ‘तुमची शास्त्रे बरोबर आहेत, की मी बरोबर आहे?’ बाबांना म्हटले जाते - वर्ल्ड ऑलमाइटी ऑथॉरिटी. जे वेद-शास्त्रांचा पुष्कळ अभ्यास करतात त्यांना ऑथॉरिटी म्हटले जाते. बाबा म्हणतात - हे सर्व भक्तिमार्गाचे ऑथॉरिटी आहेत. ज्ञानासाठी तर माझे गायन करतात - तुम्ही ज्ञानाचे सागर आहात, आम्ही नाही. सर्व मनुष्य, भक्तीच्या सागरामध्ये बुडालेले आहेत. सतयुगामध्ये कोणीही विकारामध्ये जात नाहीत. कलियुगामध्ये तर मनुष्य आदि-मध्य-अंत दुःखी होत असतात. बाबांनी कल्पापूर्वी देखील हे सांगितले होते, आता पुन्हा सांगत आहेत. मुले समजतात - कल्पापूर्वी देखील बेहदच्या बाबांकडून वारसा घेतला होता, आता पुन्हा शिकून तो वारसा परत घेत आहोत. वेळ खूप कमी आहे. हे तर सर्व विनाश होईल, म्हणून बेहदच्या बाबांकडून पूर्ण वारसा घेतला पाहिजे. ते पिता, टीचर, गुरु देखील आहेत. सुप्रीम फादर, सुप्रीम टीचर देखील आहेत. जगाचा इतिहास-भूगोल कसा रिपीट होतो, ते संपूर्ण नॉलेज देतात. हे इतर कोणीही समजावून सांगू शकणार नाही. आता मुले समजतात - ५ हजार वर्षांपूर्वीप्रमाणे, हे तेच गीतेचे भगवान आहेत, श्रीकृष्ण नाही. मनुष्याला भगवान म्हटले जात नाही. भगवान तर आहेतच पुनर्जन्मरहीत. याला दिव्य-जन्म म्हणतात. नाहीतर मी निराकार बोलणार कसा? मला तर येऊन सर्वांना पावन बनवायचे आहे, तर जरूर युक्ती सांगावी लागेल. तुम्ही जाणता आपण आत्मे अमर आहोत. रावण राज्यामध्ये तुम्ही सर्व देह-अभिमानी बनला आहात. सतयुगामध्ये देही-अभिमानी असतात. बाकी रचयिता परमात्मा आणि त्यांच्या रचनेला तिथे (सतयुगामध्ये) कोणीही जाणत नाहीत. जर तिथे देखील माहीत झाले की आम्हाला पुन्हा खाली घसरायचे आहे (पतित बनायचेच आहे), मग तर राजाईचा आनंदच राहणार नाही. म्हणून बाबा म्हणतात - हे नॉलेज तिथे प्राय:लोप होते, एकदा का तुमची सद्गती झाली की मग ज्ञानाची गरजच उरत नाही. ज्ञानाची गरजच मुळी दुर्गतीमध्ये असते. यावेळी सर्व दुर्गतीमध्ये आहेत, सर्व काम-चितेवर बसून जळून खाक झाले आहेत. बाबा म्हणतात - ‘माझ्या मुलांनो, जे आत्मे येऊन शरीराद्वारे पार्ट बजावतात, ते काम-चितेवर बसून तमोप्रधान बनले आहेत. बोलावतात देखिल की, ‘आम्ही पतित बनलेलो आहोत’. पतित बनतातच मुळी काम-चितेमुळे. क्रोध अथवा लोभामुळे पतित बनत नाहीत. साधू-संत इत्यादी पावन आहेत, देवता पावन आहेत, तर पतित मनुष्य त्यांच्यासमोर जाऊन डोके टेकवतात. गातात देखील - ‘तुम्ही निर्विकारी, आम्ही विकारी आहोत’. निर्विकारी दुनिया, विकारी दुनिया असे गायले जाते ना. भारतच निर्विकारी दुनिया होता, आता विकारी आहे. भारतासोबत पूर्ण विश्वच पतित आहे. निर्विकारी दुनियेमध्ये आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी एकच धर्म होता, पवित्रता होती तर पीस, प्रॉस्पेरिटी (शांती आणि समृद्धी) तिन्ही होते. पहिली आहे - प्युरिटी (पवित्रता). आता काही पवित्रता नाहीये त्यामुळे पीस, प्रॉस्पेरिटी देखील राहिलेली नाही.

ज्ञानाचा सागर, सुखाचा सागर, प्रेमाचा सागर एक बाबाच आहेत. तुम्हाला देखील असे सुंदर बनवतात. या लक्ष्मी-नारायणाच्या राजधानीमध्ये सर्व सुंदर आहेत. मनुष्य मात्र, पशू इत्यादि सर्व सुंदर आहेत. वाघ-बकरी एकत्र पाणी पितात. हा एक दृष्टांत आहे. तिथे अशी घाण करणारी गोष्ट असत नाही. इथे रोगराई, मच्छर इत्यादी खूप आहेत. तिथे अशा गोष्टी असत नाहीत. श्रीमंत लोकांच्याकडे फर्निचर देखील फर्स्टक्लास असते. गरिबांकडे फर्निचर देखील साधारण. भारत आता गरीब आहे, किती घाण झालेली आहे. सतयुगामध्ये किती स्वच्छता असते. सोन्याचे महाल इत्यादी किती फर्स्ट क्लास असतील. वैकुंठामधल्या गायी देखील बघा किती फर्स्टक्लास असतात. श्रीकृष्णासोबत किती सुंदर गायी दाखवतात. कृष्णपुरी मध्ये गायी तर असतील ना. तिथे किती फर्स्टक्लास वस्तू असतात. स्वर्ग तर आहे मग काय! या जुन्या घाणेरड्या दुनियेमध्ये तर खूप घाण आहे. हे सर्व या ज्ञान-यज्ञामध्ये स्वाहा होईल. कसले-कसले बॉम्ब्स बनवत राहतात. बॉम्ब फेकल्यावर आग निघते. आजकाल तर असे जिवाणू देखील टाकतात, असा विनाश करतात की बेहदमध्ये (प्रचंड प्रमाणात) मनुष्य नष्ट होतील. हॉस्पिटल्स इत्यादी तर काहीही राहणार नाहीत, जिथे उपचार इत्यादी करू शकतील. बाबा म्हणतात - ‘मुलांनो कोणता त्रास होऊ नये याच्यासाठी - नैसर्गिक आपत्ती, मुसळधार पाऊस यांचा उल्लेख केला जातो. मुलांना विनाशाचा साक्षात्कार देखील घडला आहे. बुद्धी देखील म्हणते विनाश तर जरूर होणार आहे. कोणी म्हणेल - आम्हाला विनाशाचा साक्षात्कार होईल तेव्हा आम्ही मानू; ठीक आहे, नका मानू, तुमची मर्जी. कोणी म्हणतील - आम्हाला आत्म्याचा साक्षात्कार होईल तेव्हा आम्ही मानू. अच्छा, आत्मा तर बिंदू आहे. बघितला तर काय झाले! त्याच्यामुळे सद्गती होईल काय? म्हणतात - परमात्मा अखंड ज्योती स्वरूप, हजारो सूर्यांपेक्षाही तेजोमय आहे. परंतु असे नाहीये. गीतेमध्ये लिहिलेले आहे - अर्जुनाने म्हटले - ‘बास करा, मी सहन करू शकत नाही’. अशी काही गोष्ट नाहीये. पित्याला मुले बघतील आणि म्हणतील, ‘आम्ही सहन करू शकत नाही’ असे काहीही नाहीये. जशी आत्मा आहे तसेच परमपिता परमात्मा बाबा आहेत. फक्त ते ज्ञानाचा सागर आहेत. तुमच्यामध्ये देखील ज्ञान आहे. बाबाच येऊन शिकवतात आणि बाकी कोणती गोष्टच नाही, जे-जे ज्या भावनेने आठवण करतात, ती भावना मी पूर्ण करतो. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. बाकी भगवान कोणाला भेटू शकत नाही. मीरा साक्षात्कारामध्ये किती आनंदीत होत असे. दुसऱ्या जन्मामध्ये देखील भक्तीण बनली असेल. वैकुंठात तर जाऊ शकत नाही. आता तुम्ही मुले वैकुंठा मध्ये जाण्याची तयारी करत आहात. जाणता की, आम्ही वैकुंठ, कृष्णपुरीचे मालक बनत आहोत. इथे तर सर्व नरकाचे मालक आहेत. इतिहास-भूगोल रिपीट होईल ना.

तुम्ही मुले जाणता - आपण आपले राज्य-भाग्य पुन्हा घेत आहोत. हे आहे - राजयोगाचे बळ. बाहुबळाची युद्धे तर अनेक वेळा, अनेक जन्म चालली आहेत. योगबलाने तुमची चढती कला होते. जाणता की खरोखर, स्वर्गाची राजधानी स्थापन होत आहे. ज्यांनी कल्पापूर्वी पुरुषार्थ केला असेल तसाच करतील. तुम्ही हार्टफेल (निराश) होता कामा नये. जे पक्के निश्चय-बुद्धी आहेत, त्यांना कधीही संशय येऊ शकत नाही. संशय-बुद्धी देखील होतात जरूर. बाबांनी म्हटले आहे - आश्चर्यवत् सुनन्ती, कथन्ती, भागन्ती… अहो माया, तू यांच्यावर विजय प्राप्त करतेस. माया खूप बलवान आहे. चांगल्या-चांगल्या फर्स्ट क्लास सेवा करणाऱ्यांना, सेंटर चालवणाऱ्यांना देखील माया थप्पड मारते. लिहितात - बाबा, लग्न करून तोंड काळे केले. काम-कटारी पुढे मी हार खाल्ली. आता तर बाबा तुमच्यासमोर येण्यालायक राहिलो नाही. मग लिहितात - बाबा, समक्ष येऊ. बाबा लिहितात - ‘तोंड काळे केलेस, आता इथे येऊ शकत नाहीस. इथे येऊन काय करणार? तरी देखील तिथे राहून पुरुषार्थ कर’. एकदा पडला तो पडला. असे नाही की राजाई पद प्राप्त करू शकतील. म्हटले जाते ना - ‘चढे तो चाखे वैकुण्ठ रस, गिरे तो एकदम चण्डाल…’ हाडन् हाड तुटून जाते. पाचव्या मजल्यावरून पडतात; मग काहीजण खरे लिहितात. कोणी तर सांगतच नाहीत. इंद्रप्रस्थच्या पऱ्यांचे देखील उदाहरण आहे ना. ही सर्व आहे ज्ञानाची गोष्ट. या सभेमध्ये कोणत्याही पतिताला बसण्याचा हुकूम नाही. परंतु काही परिस्थितीमध्ये बसवावे लागते. पतीतच तर येतील ना. आता तर बघा किती द्रौपदी बोलावतात. म्हणतात - ‘बाबा, आम्हाला विवस्त्र होण्यापासून वाचवा’. बंधनात असणारींचा देखील पार्ट चालतो. कामेशु, क्रोधेशु असतात ना. खूप कलह होतात. बाबांकडे सर्व समाचार येतात. बेहदचे बाबा म्हणतात - ‘मुलांनो, यांच्यावर विजय प्राप्त करा. आता पवित्र रहा, माझी आठवण करा, तर गॅरंटी आहे की विश्वाचे मालक बनाल. वर्तमानपत्रांमध्ये देखील स्वतः टाकतात की कोणी तरी प्रेरक आहे जो आमच्याकडून हे बॉम्ब्स इत्यादी बनवून घेत आहे. याच्यामुळे आपल्याच कुळाचा नाश होईल. परंतु काय करणार, ड्रामामध्ये लिहिलेले आहे, दिवसें-दिवस बनवत जातात. वेळ खूप तर नाहीये ना. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) सतयुगी सुंदर राज्यामध्ये येण्याकरिता खूप-खूप सुंदर (प्रेमळ) बनायचे आहे. राज्यपदासाठी पावन जरूर बनायचे आहे. पहिली आहे पवित्रता; त्यामुळे काम महाशत्रूवर विजय मिळवायचा आहे.

२) या जुन्या दुनियेमधून बेहदचे वैरागी बनण्यासाठी या डोळ्यांनी देहा सहीत जे काही दिसते, ते बघून देखील बघायचे नाही. प्रत्येक पावलाला बाबांकडून सल्ला घेऊन त्याप्रमाणे चालायचे आहे.

वरदान:-
संपूर्ण वृक्षाचे नॉलेज स्मृतीमध्ये ठेवून तपस्या करणारे सच्चे तपस्वी आणि सेवाधारी भव

भक्तिमार्गामध्ये दाखवतात की तपस्वी, वृक्षाखाली बसून तपस्या करतात. याच्यामागे देखील एक रहस्य आहे. तुम्हा मुलांचा निवास या सृष्टी रुपी कल्पवृक्षाच्या मुळाशी आहे. वृक्षाच्या खाली बसल्यामुळे संपूर्ण वृक्षाचे नॉलेज बुद्धीमध्ये आपोआप राहते. तर संपूर्ण वृक्षाचे नॉलेज स्मृतीमध्ये ठेवून साक्षी होऊन या वृक्षाला बघा; तर हा अनुभव नशा आणि आनंद देईल आणि याच्यामुळे बॅटरी चार्ज होईल. मग सेवा करताना देखील तपस्या, सोबत एकत्र राहील.

बोधवाक्य:-
शरीराचे आजारपण ही काही मोठी गोष्ट नाहीये, परंतु मन कधी आजारी पडू नये.

हे अव्यक्त इशारे - आता आपल्या ‘दाता’ स्वरूपाला प्रत्यक्ष करा.

दात्याची मुले नेहमी सर्व-संपत्तीवान असतात (सर्व बाबतीत धनवान असतात). तुमच्यामध्ये कधीही भक्तपणाचे अथवा भिकारीपणाचे संस्कार इमर्ज होऊ नयेत. असा संकल्प सुद्धा येऊ नये की, ‘बाबांनी मला काही मदत करावी, आशीर्वाद द्यावा’. बाबा, मला सहयोग पाहिजे, शक्ती पाहिजे आहे. हा ‘पाहिजे’ शब्द दाता, विधाता, वरदाता मुलांना शोभा देत नाही. दात्याची मुले सर्व शक्तींनी संपन्न असतात. हीच संपन्न स्थिती, संपूर्ण स्थितीला समीप आणते.