28-07-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, तुमचे बिघडलेले भाग्य सुधारणारे अर्थात नशीब घडविणारे एक बाबा आहेत, जे तुम्हाला नॉलेज देऊन भाग्यवान बनवतात”

प्रश्न:-
तुम्हा मुलांच्या या रूहानी भट्टीचा कोणता एक नियम आहे?

उत्तर:-
रूहानी भट्टीमध्ये अर्थात आठवणीच्या यात्रेमध्ये बसणाऱ्यांनी आपले विचार कधीही इकडे-तिकडे भटकू द्यायचे नाहीत, केवळ एका बाबांचीच आठवण करायची आहे. जर बुद्धी इकडे-तिकडे भटकत असेल तर डुलक्या काढत रहाल, जांभया येतील, त्यामुळे वातावरण खराब होते. आपलेच नुकसान करतात.

गीत:-
दिल का सहारा टूट न जाये…

ओम शांती।
गोड-गोड रूहानी मुलांनी गाण्याचे दोन शब्द ऐकले. मुलांना सावध केले जात आहे. तुम्हा ब्राह्मणांव्यतिरिक्त या वेळी जे कोणी आहेत त्या सर्वांचे नशीब बिघडलेले आहे. तुमचे बिघडलेले भाग्य आता सुधारत आहे. बाबांना म्हटलेच जाते नशीब घडविणारे. तुम्ही जाणता शिवबाबा किती गोड आहेत. ‘बाबा’ शब्द खूप गोड आहे. बाबांकडून सर्व आत्म्यांना वारसा मिळतो. लौकिक पित्याकडून मुलांना वारसा मिळतो, मुलींना मिळत नाही. इथे मुलगा असो अथवा मुलगी सर्वजण वारशाचे हक्कदार आहेत. बाबा आत्म्यांना शिकवतात अर्थात आपल्या मुलांना शिकवतात. आत्मा समजते की आपण सर्व ब्रदर्स (भाऊ-भाऊ) आहोत. बरोबर ब्रदरहुड (बंधुभाव) म्हटले जाते ना. एका भगवंताची मुले आहेत मग इतके भांडण-तंटे का करतात? सर्वजण आपसामध्ये भांडतच राहतात. अनेक धर्म, अनेक मते आहेत आणि मुख्य गोष्ट तर रावण राज्यामध्ये भांडणेच चालू असतात कारण विकारांची प्रवेशता आहे. काम विकारावरून देखील किती भांडण-तंटे होतात. अनेक राजांनी यासाठी युद्धे सुद्धा केली आहेत. काम-विकारासाठी खूप संघर्ष करतात. किती आनंदी होतात. कोणावर मन जडले तर मारूनही टाकतात. काम महाशत्रू आहे. क्रोध करणाऱ्याला तर क्रोधीच म्हणणार. लोभ असणाऱ्याला लोभी म्हणणार. परंतु जे कामी आहेत त्यांची अनेक नावे ठेवली आहेत म्हणून म्हटले जाते - ‘अमृत छोड़ विष काहे को खाए’. शास्त्रांमध्ये ‘अमृत’ नाव लिहिले आहे. दाखवतात की, सागरमंथन केले तेव्हा त्यातून अमृत निघाले. तो कलश मग लक्ष्मीला दिला. कितीतरी कथा प्रचलित आहेत. यामध्ये देखील मोठ्यात मोठी गोष्ट आहे - सर्वव्यापीची, गीतेचा भगवान कोण? आणि पतित-पावन कोण? प्रदर्शनीमध्ये मुख्यत्वे याच चित्रांवर समजावून सांगितले जाते. पतित-पावन, ज्ञानाचा सागर आणि त्यांच्यामधून निघालेल्या ज्ञानगंगा आहेत की पाण्याच्या नद्या आहेत की सागर आहे? किती चांगल्या-चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात. बाबा बसून समजावून सांगत आहेत - ‘गोड-गोड मुलांनो, तुम्हाला पावन कोणी बनवले? बिघडलेले भाग्य सुधारणारा कोण आहे? ते पतित-पावन कधी येतात? हा खेळ कसा बनलेला आहे? कोणीही जाणत नाही. बाबांना म्हटलेच जाते नॉलेजफुल, ब्लिसफुल, पीसफुल. गायले देखील जाते - ‘बिघडलेले भाग्य सुधारणारा एकच’. हे तर समजून येते - बरोबर रावण आमचे भाग्य बिघडवतो. हा खेळ आहे हार-जीतचा. रावणाला देखील तुम्ही जाणता ज्याला भारतवासी वर्षानुवर्षे जाळत असतात. हा भारताचा शत्रू आहे. भारतातच दरवर्षी जाळतात. त्यांना विचारा की कधीपासून जाळत आला आहात? तर म्हणतील - ‘हे तर अनादि काळापासून चालत आले आहे, जेव्हापासून सृष्टी सुरू होते’. शास्त्रांमध्ये जे वाचले त्याला सत्-सत् करत आले आहेत. मुख्य चूक आहे, ‘ईश्वराला सर्वव्यापी म्हणणे’. बाबा असे म्हणत नाहीत की, ही कोणाची चूक आहे! हे ड्रामामध्ये नोंदलेले आहे. हार-जीतचा खेळ आहे. ‘माया से हारे हार, माया से जीते जीत’ (मायेकडून जे पराभूत होतात ते सर्व काही हरतात, आणि जे मायेवर विजय मिळवतात ते सर्व काही जिंकतात). मायेकडून कसे पराभूत होतात, ते देखील समजावून सांगितले जाते. पूर्ण अर्धा कल्प रावण राज्य चालते. एका सेकंदाचा सुद्धा फरक पडू शकत नाही. राम-राज्याची स्थापना आणि रावण-राज्याचा विनाश. या गोष्टी आपल्या वेळेवर अचूकपणे घडतात. सतयुगामध्ये तर लंका अस्तित्वातच नसते. लंका तर बौद्ध धर्मियांचा खंड (प्रदेश) आहे. सुशिक्षित लोकांच्या बुद्धीमध्ये असते की, लंडन या बाजूला आहे, अमेरिका या बाजूला आहे. शिकल्याने बुद्धीचे कुलूप उघडते, ज्ञानरूपी प्रकाश मिळतो. याला ज्ञानाचा तिसरा नेत्र म्हटले जाते. वृद्ध मातांना बऱ्याच गोष्टी समजू शकणार नाहीत. त्यांनी मुख्य एकच गोष्ट धारण करायची आहे, हीच शेवटी कामी येणार आहे. मनुष्य शास्त्र तर खूप वाचतात. तरीही शेवटी एकच सांगतात की, ‘राम-राम म्हणा’; असे म्हणत नाहीत की, शास्त्र ऐकवा, वेद ऐकवा. अखेरीला म्हणतील रामाची आठवण करा. जे जास्त वेळ ज्या चिंतनामध्ये राहतात, शेवटी देखील त्याचीच आठवण येते. आता विनाश तर सर्वांचाच होणार आहे. तुम्ही जाणता सगळे कोणाची आठवण करतील? कोणी श्रीकृष्णाची, कोणी आपल्या गुरूंची आठवण करतील. कोणी आपल्या देहधारी नातेवाईकांची आठवण करतील. देहाची आठवण केली, खेळ खलास. इथे तुम्हाला एकच गोष्ट समजावून सांगितली जाते की स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करत राहा. चार्ट ठेवा की आपण किती आठवण करतो. जेवढी आठवण कराल, तितके पावन होत जाल. असे नाही की गंगेत स्नान केल्याने पावन बनाल. आत्म्याची गोष्ट आहे ना. आत्माच पतित, आत्माच पावन बनते ना. बाबांनी समजावून सांगितले आहे - आत्मा एक तारा बिंदू आहे. भृकुटीच्या मध्यभागी राहते. म्हणतात - आत्मा स्टार अतिशय सूक्ष्म आहे. तुम्ही मुलेच या गोष्टी समजू शकता. बाबा म्हणतात - मी कल्पाच्या संगमयुगी येतो. त्यांनी मग ‘कल्प’ शब्द सोडून ‘युगे-युगे’ हा शब्द लिहिला आहे. त्यामुळे लोकांनी चुकीचा अर्थ लावला आहे. मी म्हटले आहे की, ‘मी कल्प-कल्प संगमयुगे येतो, घोर अंधार आणि लख्ख प्रकाशाच्या संगमावर. बाकी युगे-युगे येण्याची तर काही गरजच नाही. शिडी उतरतच येतात. जेव्हा पूर्ण ८४ जन्मांची शिडी उतरतात तेव्हा बाबा येतात. हे ज्ञान साऱ्या दुनियेसाठी आहे. संन्यासी लोक तर म्हणतात यांची ही सर्व चित्रे एक कल्पना आहे. परंतु यामध्ये कल्पनेची तर काही गोष्टच नाही. हे सर्वांना समजावून सांगितले जाते, नाहीतर लोकांना समजणार कसे, म्हणून ही चित्रे बनवली गेली आहेत. या प्रदर्शनी देश-विदेशामध्ये पुष्कळ होत राहतील. बाबा म्हणतात - भारतवासी मुले असंख्य आहेत. आहेत तर सर्व मुलेच ना. अनेक धर्मांचे हे झाड आहे. बाबा बसून समजावून सांगत आहेत - हे सर्व काम चितेवर बसून जळून मेले आहेत. सतयुगामध्ये जे सर्वात आधी येतात, तेच मग सर्वात आधी द्वापर पासून काम-अग्नीमध्ये जळतात; म्हणून काळे झाले आहेत. आता सर्वांची सद्गती होणार आहे. तुम्ही निमित्त बनता. तुमच्या मागोमाग सर्वांची सद्गती होणार आहे. बाबा किती सोप्या पद्धतीने समजावून सांगतात. म्हणतात - फक्त बाबांची आठवण करा. आत्म्यानेच दुर्गतीला प्राप्त केले आहे. आत्मा पतित बनल्यामुळे शरीर देखील तसे मिळते. आत्म्याला पावन बनविण्याची अगदी सोपी युक्ती बाबा सांगतात.

त्रिमूर्तीच्या चित्रामध्ये ब्रह्माचे चित्र पाहून मनुष्य खूप गोंधळ माजवतात. म्हणतात - ‘यांना ब्रह्मा का म्हणता? ब्रह्मा तर सूक्ष्मवतन वासी देवता आहे, इथे कुठून आला?’ हे दादा तर प्रसिद्ध होते. वर्तमानपत्रांमध्ये सर्व ठिकाणी आले होते की, ‘एक हिऱ्यांचा व्यापारी म्हणत आहे की, मी श्रीकृष्ण आहे, मला १६१०८ राण्या हव्या आहेत’. मोठा गदारोळ माजला होता, पळवून नेण्याचा. आता एका-एकाशी कोण डोके फोडत बसणार. इतके खंडीभर मनुष्य आहेत. आबूमध्ये देखील कोणी आले तर त्यांना लगेच म्हणतात - ‘अरे, ब्रह्माकुमारींकडे जाता! त्या तर जादू करतात. पती-पत्नीला भाऊ-बहिण बनवतात’. मोठ-मोठ्या गोष्टी सांगून डोके खराब करून टाकतात. बाबा म्हणतात - तुम्ही मला ज्ञानसागर, वर्ल्ड ऑलमाइटी ऑथॉरिटी म्हणता. वर्ल्ड ऑलमाइटी अर्थात सर्वशक्तिमान, सर्व वेद-शास्त्रे इत्यादींना जाणणारे. मोठ्या विद्वानाला देखील ऑथॉरिटी म्हणतात, कारण ते सर्व वेद-शास्त्रे इत्यादींचा गाढा अभ्यास करतात आणि मग बनारसला जाऊन टायटल (उपाधी) घेऊन येतात. महा-महोपाध्याय, श्री श्री १०८ सरस्वती, या सर्व उपाध्या तिथेच मिळतात. जे खूप हुशार असतात, त्यांना मोठी उपाधी मिळते. शास्त्रांमध्ये जनक राजा विषयी लिहिले आहे - त्याने म्हटले की, ‘मला कोणीतरी खरे ब्रह्म-ज्ञान ऐकवा’. आता ब्रह्म-ज्ञान काही नाहीये. सर्व गोष्टी इथल्याच आहेत. कथा मोठी बनवली आहे. शंकर-पार्वतीची देखील कथा लिहिलेली आहे. किती कथा बसून बनवल्या आहेत. शंकराने पार्वतीला कथा ऐकवली, वास्तविक होते - शिव; तर त्यांनी मग शंकर-पार्वतीचे नाव दिले आहे. भागवत इत्यादी या सर्व या वेळच्या गोष्टी आहेत. मग कथेमध्ये सांगतात, त्यांना विचार आला - राजाला जाऊन हे ज्ञान द्यावे. बाबा देखील समजावून सांगतात - तुम्ही राजांना जाऊन हे ज्ञान द्या. तुम्हीच सूर्यवंशी होता मग चंद्रवंशी, वैश्यवंशी, शूद्रवंशी बनला आहात. तुमची राजधानीच नष्ट झाली आहे. आता पुन्हा सूर्यवंशी राजधानी मिळवायची असेल तर पुरुषार्थ करा. राजयोग शिकविणारे बाबा आलेले आहेत. पुन्हा येऊन बेहदचे स्वराज्य घ्या. राजांकडे देखील खूप पत्रे जातात, परंतु ती त्यांना मिळतात थोडीच. त्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी पत्रे पाहतात. कितीतरी पत्रे फेकून देतात. एखाद्या पत्रामध्ये अशी काही महत्त्वाची गोष्ट असेल तर त्यांना दाखवतात. म्हणतात - अष्टावक्रने जनकाला सेकंदामध्ये जीवनमुक्तीचा साक्षात्कार घडवला. ही देखील आताचीच गोष्ट आहे. आता बाबा किती चांगल्या प्रकारे बसून तुम्हाला समजावून सांगतात. ज्यांना समजू शकत नाही, ते इकडे-तिकडे बघत राहतील. बाबा लगेच समजून जातात - यांच्या बुद्धीमध्ये काहीच जात नाहीये. बाबा चोहो बाजूंना पाहतात देखील - सर्वजण चांगल्या प्रकारे ऐकत आहेत. यांची बुद्धी कुठे भटकत राहते. जांभया देत राहतात. ज्ञान बुद्धीमध्ये बसत नसेल (सांगितलेले लक्षात येत नसेल) तर डुलक्या काढत राहतील, यात नुकसान होते. कराचीमध्ये या मुलांची भट्टी होती. कोणाला डुलकी आली की त्याला लगेच बाहेर काढले जात असे. आपलेच सर्व बसायचे. बाहेरचे कोणीच येत नव्हते. सुरुवातीला यांचा खूप मोठा पार्ट चालला आहे. मोठी हिस्ट्री आहे. सुरुवातीला तर मुली खूप ध्यानामध्ये जायच्या. अजूनही लोक म्हणतात की जादू आहे. परमपिता परमात्म्याला जादूगार म्हणतात ना. शिवबाबा पाहतात - यांचे खूप प्रेम आहे, तर पाहताच क्षणी लगेच ध्यानामध्ये जातात. वैकुंठ तर भारतवासियांना खूप प्रिय आहे. कोणाचा मृत्यू झाला तरी देखील म्हणतात वैकुंठवासी झाला, स्वर्गवासी झाला. आता हा तर आहेच नरक. सर्व नरकवासी आहेत, म्हणूनच तर म्हणतात की अमका स्वर्गवासी झाला. परंतु स्वर्गामध्ये तर कोणी जाऊच शकत नाही. आता फक्त हे तुम्हीच जाणता की, आपण स्वर्गवासी होतो, आणि मग ८४ जन्म घेऊन नरकवासी बनलो आहोत. आता पुन्हा बाबा स्वर्गवासी बनवत आहेत. स्वर्गामध्ये आहे - राजधानी. राजधानीमध्ये अनेक पदे आहेत. पुरुषार्थ करून नरापासून नारायण बनायचे आहे. तुम्ही जाणता हे मम्मा-बाबा भविष्यामध्ये लक्ष्मी-नारायण बनतात. आता पुरुषार्थ करत आहेत, म्हणून म्हटले जाते फॉलो मदर-फादर. जसा हे पुरुषार्थ करतात, तसा तुम्ही देखील करा. हे देखील आठवणीमध्ये राहतात, स्वदर्शन चक्रधारी बनतात. तुम्ही बाबांची आठवण करा आणि वारशाची आठवण करा. त्रिकालदर्शी बना. तुम्हाला या संपूर्ण चक्राचे ज्ञान आहे, यामध्ये तत्पर राहा, इतरांना समजावून सांगत राहा. याच सेवेमध्ये व्यस्त राहाल तर दुसरा कोणताही धंदा इत्यादी आठवणार सुद्धा नाही. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) सतयुगामध्ये उच्च पद प्राप्त करण्यासाठी मात-पित्याला पूर्णपणे फॉलो करायचे आहे. त्यांच्यासारखा पुरुषार्थ करायचा आहे. सेवेमध्ये व्यस्त राहायचे आहे. एकाग्रतेने अभ्यास करायचा आहे.

२) आठवणीचा खरा-खरा चार्ट ठेवायचा आहे. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे, देह किंवा देहधाऱ्यांची आठवण करायची नाही.

वरदान:-
आपल्या हाइयेस्ट पोझिशनमध्ये स्थित राहून प्रत्येक संकल्प, बोल आणि कर्म करणारे संपूर्ण निर्विकारी भव

संपूर्ण निर्विकारी अर्थात कोणत्याही विकाराकडे रिंचकमात्र सुद्धा आकर्षित न होणे, कधीही त्यांच्या वशीभूत न होणे. हाइयेस्ट पोझिशन असलेले आत्मे कोणताही साधारण संकल्प सुद्धा करू शकत नाहीत. तर जेव्हा कोणताही संकल्प अथवा कर्म करता, तेव्हा चेक करा की जसे श्रेष्ठ नाव आहे, तसे श्रेष्ठ काम आहे? जर नाव श्रेष्ठ आहे आणि काम कनिष्ठ असेल तर नाव बदनाम करता; त्यामुळे ध्येयानुसार लक्षण धारण करा, तेव्हाच म्हटले जाईल - संपूर्ण निर्विकारी अर्थात होलिएस्ट आत्मा.

बोधवाक्य:-
कर्म करत असताना करन-करावनहार बाबांची स्मृती राहावी तेव्हाच स्व-पुरुषार्थ आणि योग यांचा बॅलन्स ठीक राहील.

हे अव्यक्त इशारे - ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा.

या कलियुगी तमोप्रधान जडजडीभूत वृक्षाची दुर्दशा पाहून ब्रह्मा बाबांना हा संकल्प येतो की, आताच्या आता मुलांच्या तपस्वी रूपाद्वारे, योग-अग्नीद्वारे या जुन्या वृक्षाला भस्म करावे. परंतु याकरिता संघटित रूपामध्ये फुल फोर्सने योग-ज्वाळा प्रज्वलित झाली पाहिजे. तर ब्रह्मा बाबांच्या या संकल्पाला साकार मध्ये आणा.