08-08-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, शांत राहण्याचा स्वभाव खूप चांगला आहे, शांत स्वभाव असणारे खूप गोड वाटतात. व्यर्थ बोलण्यापेक्षा न बोलणे चांगले आहे”

प्रश्न:-
कोणत्या मुलांवर सर्व जण प्रेम करतात? स्वतःला सुरक्षित ठेवण्याचे साधन कोणते आहे?

उत्तर:-
जी मुले सर्वांची खूप आवडीने आणि प्रेमाने सेवा करतात, त्यांच्यावर सर्व जण प्रेम करतात. तुम्हाला कधीही सेवेचा अहंकार येता कामा नये. बाबांकडून ज्ञानाची कस्तुरी जी मिळाली आहे, ती इतरांनाही द्यायची आहे, सर्वांना शिवबाबांची आठवण करून द्यायची आहे. या आठवणीच्या यात्रेद्वारेच तुम्ही अत्यंत सुरक्षित राहाल. जितके आठवणीमध्ये राहाल, तितका आनंद मिळेल आणि मॅनर्स देखील सुधारत जातील.

ओम शांती।
रुहानी बाबा बसून रुहानी मुलांना समजावून सांगत आहेत. शिकवण देऊन किती हुशार बनवतात. शिक्षण देखील सोपे आहे ना. ते आहे स्थूल शिक्षण आणि हे आहे सूक्ष्म शिक्षण. तुम्ही मुले जाणता की, हे शिक्षण बाबांशिवाय इतर कोणीही शिकवू शकत नाही. बाबा आलेच आहेत पवित्र बनविण्याकरिता आणि शिकविण्याकरिता. एम-ऑब्जेक्ट समोर उभा आहे, तर अशा बाबांची आठवण करून आनंदाने रोमांचीत झाले पाहिजे. मुले हे देखील जाणतात की, दिवसेंदिवस आपल्याला शांतीमध्येच जायचे आहे. शांती तर सर्वांना खूप आवडते. मोठ्या व्यक्ती जास्त बोलत नाहीत आणि मोठ्या आवाजात देखील बोलत नाहीत. तुम्ही खूप-खूप मोठी माणसे बनत आहात, खरेतर तुम्हाला ‘माणसे’ म्हणता येणार नाही, तुम्ही तर ‘देवता’ बनत आहात. देवतांचे बोलणे फार थोडे असते. तुम्हाला देखील जर देवता बनायचे आहे, तर टॉकी मधून बदलून सायलेन्स मध्ये राहण्याचा अभ्यास करा. शांत राहणाऱ्या विषयी समजतील की, यांचे स्वतःवर अटेन्शन आहे. जेव्हा की तुम्हाला शांतीधाममध्ये जायचे आहे, तर मग खूप हळू आवाजात बोलायचे आहे. हळू आवाजात बोलता-बोलता शांतीधाम मध्ये निघून जायचे आहे. जितके तुम्ही शांतीमध्ये राहता, तितकी शांती पसरवता. तुम्ही खूप शांतीमध्ये राहिले पाहिजे. मोठ्या आवाजात बोलणे चांगले वाटत नाही. क्रोध देखील चांगला नाही. मुलांमध्ये कोणतेही विकार राहता कामा नये. पाहायचे आहे - मी कोणाशी भांडत-तंटा तर करत नाही ना! बाबांनी समजावून सांगितले आहे - ‘हियर नो ईविल, टॉक नो ईविल…’ ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाहीत, त्या वाईट गोष्टीं पासून तुम्ही किनारा केला पाहिजे (दूर राहिले पाहिजे), म्हणजे मग दोघांचेही तोंड बंद राहील. प्रत्येक गोष्टीमध्ये दैवी गुण धारण करायचे आहेत. कोणी मोठ्या आवाजात बोलत असेल, तर त्यांना बोला - ‘शांत रहा, आवाज करू नका’. तुम्ही जाणता, आपण शांती प्रस्थापित करत आहोत. सतयुगामध्ये शांती असते ना. मूलवतन मध्ये तर आहेच मुळी शांती. शरीरच नाहीये, तर मग बोलणार कसे? बाबा मुलांना श्रीमत तर खूप चांगले देतात. समजावून सांगतात - ‘गोड मुलांनो, आता तुम्हाला आपल्या घरी जायचे आहे. टॉकी मधून मूव्ही मध्ये यायचे आहे तेथून मग सायलेन्स मध्ये निघून जायचे आहे (साकार दुनियेतून सूक्ष्मवतनमध्ये यायचे आहे तिथून मग शांतीधाम मध्ये निघून जायचे आहे). जो कोणी भेटेल, त्याला हाच संदेश द्यायचा आहे. जितके तुम्ही सायलेन्समध्ये राहाल, तितके लोक समजतील की, हे कोणत्या तरी धुंदीमध्ये आहेत. शांत राहण्याचा स्वभाव खूप चांगला आहे. असे लोक खूप गोड वाटतात. व्यर्थ बोलण्यापेक्षा न बोलणे चांगले आहे.

तुम्ही खरे-खरे पैगंबर आहात. तुमची सर्वांवर कृपा असली पाहिजे. कृपा करणारी मुले अतिशय शांत राहून बाबांच्या आठवणीमध्ये राहतील. फक्त हा संदेश द्यायचा आहे की, बेहदच्या बाबांची आठवण करा तर बेहदची सुख आणि शांती मिळेल. लौकिक पित्याजवळ खूप धन असेल तर जास्त वारसा मिळेल ना. बेहदच्या पित्याकडे तर विश्वाची बादशाही आहे, जी विश्वाची बादशाही दर ५ हजार वर्षानंतर तुम्हाला मिळते.

तुम्हा मुलांनी सर्वांची अतिशय आवडीने सेवा करायची आहे. प्रत्येकाने सेवेच्या लायक बनायचे आहे. जे इतरांची प्रेमाने सेवा करतात, त्यांच्यावर सर्व जण प्रेम करतात. कधीही सेवेचा अहंकार येता कामा नये. तुम्हाला बाबांकडून ज्ञानाची कस्तुरी मिळाली आहे, ती इतरांना द्यायची आहे. एकमेकांना आठवण करून देत राहा की, ‘शिवबाबांची आठवण आहे’? याने आनंद देखील होतो. आठवण करून देणाऱ्याचे आभार मानले पाहिजेत. आठवणीच्या यात्रेद्वारे तुम्ही मुले अत्यंत सुरक्षित राहाल. जितके आठवणीमध्ये राहाल, तितका आनंद देखील राहील आणि मॅनर्स देखील सुधारत जातील. तुम्हाला आपला स्वभाव जरूर सुधारायचा आहे. प्रत्येकाने आपल्या मनाला विचारावे की, माझा स्वभाव अतिशय गोड आहे का?

मी कधी कोणाला नाराज तर करत नाही ना? असे वातावरण कधीही बनू नये की, ज्यामुळे कोणी नाराज होईल. असा प्रयत्न करायचा आहे, कारण तुम्ही मुले खूप उच्च अशा सेवेवर आहात. तुम्हाला या संपूर्ण रंगमंचाला प्रकाश द्यायचा (बळ द्यायचे) आहे. तुम्ही धरती वरील चैतन्य सितारे आहात. म्हटले देखील जाते - नक्षत्र देवता... आता ते सितारे काही देवता नाहीत. तुम्ही तर त्यांच्या पेक्षाही महान आणि बलवान आहात, कारण तुम्ही संपूर्ण विश्वाला प्रकाशित करता. तुम्हीच देवता बनणारे आहात. जसे वर आकाशामध्ये लखलखणारे तारे आहेत, एखादा तारा खूप तेजस्वी असतो आणि एखादा मंद असतो. कोणी चंद्राच्या जवळ असतो. तुम्ही मुले देखील योगबलाद्वारे संपूर्ण पवित्र बनता, तेव्हा तेजस्वी बनता. आता तुम्हा मुलांना अविनाशी ज्ञान रत्नांची लॉटरी मिळत आहे, तर किती आनंदात राहिले पाहिजे! आतल्याआत आनंदाने नाचत राहा. तुमचा हा जन्म हिऱ्या समान गायला जातो. तुम्ही ब्राह्मणच नॉलेजफुल बनता, त्यामुळे तुम्हाला नॉलेजचाच आनंद असतो. या देवतांपेक्षाही तुम्ही श्रेष्ठ आहात. म्हणून तुमचा चेहरा सदैव आनंदाने पुलकित असावा. बाबा मुलांना आशीर्वाद देतात - ‘गोड मुलांनो, ‘सदा शांत भव!’ ‘चिरंजीवी भव!’ अर्थात उदंड आयुष्य जगा. बाबांकडून आशीर्वाद तर मिळतो तरी देखील प्रत्येकाने स्वतः पुरुषार्थ करायचा आहे की, आपण ‘चिरंजीवी’ (दीर्घायुषी) कसे बनावे. बाबांची आठवण केल्याने तुम्ही चिरंजीवी बनत आहात. हा आशीर्वाद बाबा देतात. ब्राह्मण लोक देखील म्हणतात - ‘आयुष्मान भव’. बाबा देखील म्हणतात - ‘मुलांनो, सदैव जिवंत रहा’. अर्धा कल्प तुम्हाला काळ खाणार नाही. सतयुगामध्ये मरण्याचे नावच नसते. इथे तर मनुष्य मृत्यूला घाबरतात ना. तुम्ही तर पुरुषार्थ करत आहात मरण्याकरिता. तुम्ही जाणता - बाबांची आठवण करता-करता आपण हे शरीर सोडून आपल्या शिवबाबांकडे जाणार आणि मग स्वर्गवासी बनणार.

आता तुम्ही मोस्ट बिलवेड (अतिप्रिय) बाबांची मुले बनला आहात, तर तुम्हाला देखील बाबां सारखे खूप-खूप गोड आणि अतिशय प्रेमळ बनायचे आहे. बाबा पत्रांमध्ये देखील लिहितात - ‘गोड-गोड लाडक्या सिकीलध्या मुलांनो…’ बाबा खूप गोड आहेत ना. प्रॅक्टिकलमध्ये अनुभव करता की, बाबा किती गोड आणि किती प्रेमळ आहेत. आपल्याला देखील तसेच बनवतात. हे देखील तुम्ही जाणता की, आपण किती गोड आणि किती प्रेमळ होतो. आपणच पूज्य पासून मग पुजारी बनलो तर स्वतःचीच पूजा करत राहिलो. या देखील अतिशय वंडरफुल गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत.

तुम्ही मुले जाणता की, आमची अर्ध्या कल्पाची सर्व दुःखे दूर करणारे बाबा आता आलेले आहेत. म्हणतात - हर-हर महादेव. आता ते महादेव तर नाहीत. दुःख तर बाबाच दूर करतील. दुःख दूर करून सुख देणारे बाबा आहेत. अर्धा कल्प तुम्ही खूप दुःख पाहिले आहे. ५ विकारांचा आजार खूप वाढला आहे. या आजाराने खूप दुःखी केले आहे, म्हणून बाबा म्हणतात - ‘गोड मुलांनो, हे जे कर्मांचे खाते आहे, ते आता ठीक करा’. व्यापारी लोक देखील १२ महिन्यांचा हिशेब ठेवतात ना.

बाबा समजावून सांगत आहेत - मुलांनो, आता संपूर्ण सृष्टीवर पहा, किती घाण आहे. हा आहेच नरक, म्हणून बाबांना नरकाला स्वर्ग बनविण्यासाठी यावे लागते. बाबा अत्यंत प्रेमाने येतात, जाणतात की, मला मुलांच्या सेवेमध्ये यायचे आहे. मी कल्प-कल्प तुम्हा मुलांच्या सेवेसाठी उपस्थित होतो. जेव्हा स्वतः बाबा येतात, तेव्हा मुले समजतात की, बाबा आपल्या सेवेसाठी उपस्थित झाले आहेत. इथे बसून सर्वांची सेवा होते. संपूर्ण सृष्टीचे कल्याण करणारे दाता तर एकच आहेत ना. बाबा जाणतात की, संपूर्ण दुनियेतील जे काही आत्मे आहेत त्या सर्वांना वारसा देण्यासाठी मीच येतो. बेहदच्या बाबांची नजर दुनियेतील सर्व आत्म्यांकडे जाते. भले इथे बसले आहेत, परंतु त्यांची नजर संपूर्ण विश्वावर आणि संपूर्ण विश्वातील मनुष्य मात्रांवर आहे, कारण संपूर्ण विश्वालाच निहाल करायचे आहे (मालामाल करायचे आहे). ड्रामा प्लॅन अनुसार कल्पापूर्वी प्रमाणे संपूर्ण विश्वातील आत्मे निहाल होणार आहेत. बाबा सर्व मुलांची आठवण करतात, नजर तर जाते ना. संगमयुगावरच बाबा मुलांच्या सेवेसाठी उपस्थित होतात, त्यांच्या तुलनेमध्ये इतर कोणीही अशी सेवा करू शकत नाही. त्यांची आहे बेहदची सेवा. तुम्ही मुले देखील बाबांचा शो तेव्हाच करू शकाल, जेव्हा त्यांच्यासारखी सेवा कराल. सेवा करणाऱ्यांना फळ देखील खूप मोठे मिळते. मुलांना नशा देखील चढतो की, आम्ही श्रीमतावर संपूर्ण विश्वातील मनुष्यांना सुखी करतो.

बाबा म्हणतात - गोड मुलांनो, आता ज्ञान रत्नांनी आपली भरपूर झोळी भरा, जेवढी भरायची आहे तेवढी भरा. आपला वेळ बरबाद करू नका. बाबांच्या आठवणीमध्ये वेळेला सफल करा. जे चांगल्या रीतीने धारणा करतात, ते मग इतरांची देखील चांगली सेवा जरूर करतील. ते वेळ बरबाद करणार नाहीत. मुलांनी पुरुषार्थ करून अंतर्मुखी बनायचे आहे. अंतर-आत्मा आहे ना. हा निश्चय करायचा आहे की बाबा, आम्हा आत्म्यांना समजावून सांगत आहेत. सोल-कॉन्शस होऊन राहणे हेच खरे-खरे अंतर्मुखी बनणे आहे. अंतर्मुखी अर्थात आतमध्ये जी आत्मा आहे, तिला सर्व काही बाबांकडूनच ऐकायचे आहे. बाबा प्रेमाने सतत समजावून सांगत असतात. मात-पिता आणि जे काही चांगले अनन्य मोठे भाऊ-बहिणी आहेत, जे चांगली सेवा करतात, त्यांच्या कडून शिकत जा. आतून हा निश्चय करा की, मला फालतू वेळ घालवायचा नाहीये. शरीर निर्वाह देखील करायचा आहे, आपल्या रचनेची (कुटुंबाची) देखील देखभाल करायची आहे, फक्त मोह ठेवायचा नाही. मोह ठेवल्याने नुकसान होईल. मोह एका बाबांमध्ये ठेवा. इथे तुम्ही बाबांच्या सन्मुख आहात. आत्मे आणि परमात्मा सन्मुख आहेत, कारण इथे स्वयं बाबा आत्म्यांना शिकवत आहेत. तिथे (सेंटर्सवर) आत्मे, आत्म्यांना शिकवतात.

या सर्व गोष्टींचे तुम्हा मुलांच्या मनामध्ये मंथन चालले पाहिजे. स्टुडंटच्या बुद्धीमध्ये दिवसभर अभ्यास राहतो ना. तुमच्या बुद्धीमध्ये देखील हा सर्व अभ्यास आहे. हे आहे रुहानी शिक्षण. जे हुशार स्टुडंट असतात ते नेहमी एकांतामध्ये जाऊन अभ्यास करतात. स्टुडंट एकमेकांना भेटतात, तेव्हा अभ्यासाविषयीच चर्चा करतात. या बेहदच्या शिक्षणामध्ये तर तुम्ही अजूनच आनंदाने मग्न झाले पाहिजे.

तुम्ही मुले आता बाबांची मदतगार बनता. आठवणीमध्ये राहणे हेच मदत करणे, कारण आठवणीची यात्रा अर्थात शांतीची यात्रा. म्हणून म्हटले जाते - प्रत्येकाने आपल्या घराला स्वर्ग बनवा. प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये अल्फ आणि बे आहे (बाबा आणि बादशाही आहे). अल्फची आठवण करा, तर बादशाही मिळेल. अजून काहीच करायचे नाहीये. फक्त स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा, तर राजाई तुमचीच आहे. तुम्ही मुले सर्वांना हाच संदेश देत राहा की, बाबांची आठवण करा, तर स्वर्गाची राजाई मिळेल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) बाबांच्या आठवणीमध्ये आपला वेळ सफल करायचा आहे. हा अमूल्य वेळ कुठेही बरबाद करायचा नाही. पुरुषार्थ करून अंतर्मुखी अर्थात सोल-कॉन्शस होऊन राहायचे आहे.

२) आता आपण देवतां पेक्षाही श्रेष्ठ ब्राह्मण आहोत, आता बाबांकडून अविनाशी ज्ञान रत्नांची लॉटरी मिळाली आहे, नॉलेजफुल बनलो आहोत, तर चेहरा सदैव आनंदाने पुलकित राहावा. मनामध्ये आनंदाने उड्या मारत राहा.

वरदान:-
मनसा महादानाद्वारे प्रत्येक संकल्पाची सिद्धी प्राप्त करणारे मास्टर सर्वशक्तिमान भव

जी मुले मनसाद्वारे शक्तींचे दान करतात, त्यांना ‘मास्टर सर्वशक्तिमान’चे वरदान प्राप्त होते, कारण मनसाद्वारे शक्तींचे दान केल्याने संकल्पामध्ये इतकी शक्ती जमा होते की, प्रत्येक संकल्पाची सिद्धी प्राप्त होते. ते आपल्या संकल्पांना जिथे पाहिजे तिथे एका सेकंदामध्ये स्थिर करू शकतात, संकल्प त्यांच्या वशमध्ये असतात. ते आपल्या संकल्पांवर विजयी असल्याकारणाने चंचल संकल्प असणाऱ्याला देखील थोड्या वेळासाठी अचल अथवा शांत बनवू शकतात.

बोधवाक्य:-
निरंतर एका बाबांच्या संगतीमध्ये राहा, म्हणजे मग संग दोषापासून वाचाल.

हे अव्यक्त इशारे - अपवित्रतेच्या बीजाला सुद्धा नष्ट करून संपूर्ण स्वच्छ (पवित्र) बना.

कोणतेही विकर्म अथवा व्यर्थ कर्म जर वारंवार होत असेल, तर त्याचे कारण आहे - तुम्ही साथीदाराला सदैव सोबत ठेवत नाही अथवा सोबतीचा अनुभव करत नाही. ज्याप्रमाणे शक्ती एका सेकंदाच्या दृष्टीने असुरांचा संहार करतात, तसे कंबाइंड रूपाच्या स्मृती द्वारे आपल्या आसुरी संस्कारांचा अथवा अपवित्र संकल्पांचा एका सेकंदामध्ये संहार करा.