15-01-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुमच्या तोंडून कधीही ‘हे ईश्वर’, ‘हे बाबा’ असे शब्द निघता कामा नयेत, ही तर भक्ती मार्गातील सवय आहे”

प्रश्न:-
तुम्ही मुले पांढरे कपडेच का पसंत करता? हे कोणत्या गोष्टीचे प्रतीक आहे?

उत्तर:-
आता तुम्ही या जुन्या दुनियेमधून जिवंतपणीच मेलेले आहात म्हणून तुम्हाला पांढरे कपडे आवडतात. हे पांढरे कपडे मृत्यूचे प्रतीक आहेत. जेव्हा कोणी मरतो तेव्हा त्याला देखील पांढऱ्या कपड्याने झाकले जाते, तुम्ही मुले देखील आता मरजीवा बनले आहात.

ओम शांती।
रुहानी बाबा बसून मुलांना समजावून सांगतात, ‘रुहानी’ शब्द न म्हणता फक्त ‘बाबा’ म्हटले तरीही ठीक आहे. बाबा बसून मुलांना समजावून सांगतात. सर्वजण स्वतःला भाऊ-भाऊ तर म्हणतातच. तर बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत. सर्वांनाच काही समजावून सांगत नसतील. सर्व जण स्वतःला भाऊ-भाऊ तर म्हणतातच. गीतेमध्ये लिहिलेले आहे - भगवानुवाच. आता भगवानुवाच कोणा प्रती? सर्व मुले तर भगवंताची आहेत. ते पिता आहेत तर भगवंताची मुले सर्व आपसात भाऊ-भाऊ आहेत. भगवंतानेच समजावून सांगितले असेल, राजयोग शिकवला असेल. आता तुमच्या बुद्धीचे कुलूप उघडले आहे. दुनियेमध्ये इतर कोणाचेही असे विचार चालू शकत नाहीत. ज्यांना-ज्यांना संदेश मिळत जाईल ते शाळेमध्ये येत जातील, शिकत जातील. त्यांना वाटेल प्रदर्शनी तर बघितली, आता जाऊन आणखी काही जास्त ऐकावे. सर्वात पहिली मुख्य गोष्ट आहे - ज्ञानाचा सागर, पतित-पावन गीता ज्ञान दाता शिव भगवानुवाच; सर्वप्रथम त्यांना हे माहीत झाले पाहिजे की, यांना शिकविणारा अथवा सांगणारा कोण आहे! ते सुप्रीम सोल ज्ञानाचा सागर निराकार आहेत. ते तर आहेतच ट्रुथ (सत्य) तर सत्यच सांगतील. मग त्यामध्ये अजून कोणता प्रश्न उद्भवू शकत नाही. सर्वप्रथम तर यावर समजावून सांगायचे आहे, आम्हाला परमपिता परमात्मा ब्रह्मा द्वारे राजयोग शिकवत आहेत. हे राज्य पद आहे. ज्यांना निश्चय होईल की जे सर्वांचे पिता आहेत, ते पारलौकिक बाबा बसून समजावून सांगतात, तेच सर्वात मोठी ऑथॉरिटी आहेत तर मग दुसरा कोणता प्रश्न उद्भवू शकत नाही. ते आहेतच पतित-पावन तर जेव्हा ते इथे येतात तर जरूर आपल्या ठरलेल्या वेळेवर येत असतील. तुम्ही बघता देखील - ही तीच महाभारत लढाई आहे. विनाशानंतर मग व्हाइसलेस दुनिया (निर्विकारी दुनिया) होणार आहे. ही आहे विशश दुनिया (विकारी दुनिया). हे मनुष्य जाणत नाहीत की भारतच व्हाइसलेस होता. अजिबातच बुद्धी चालत नाही. गोदरेजचे कुलूप लागले आहे. त्याची चावी एका बाबांकडेच आहे म्हणून त्यांनाच ज्ञान दाता, दिव्य चक्षु विधाता म्हटले जाते. ज्ञानाचा तिसरा नेत्र देतात. हे कोणालाच माहित नाहीये की तुम्हाला शिकवणारे कोण आहेत. दादा (ब्रह्मा बाबा) आहेत असे समजतात तेव्हा टीका करतात. काही ना काही बोलतात - म्हणून सर्वात पहिली हीच गोष्ट समजावून सांगा. यामध्ये लिहिलेले देखील आहे - शिव भगवानुवाच. ते तर आहेतच ट्रुथ.

बाबा समजावून सांगतात - ‘मी पतित-पावन शिव आहे’. मी या शाळीग्रामांना शिकविण्याकरिता परमधाम वरून आलो आहे. बाबा आहेतच नॉलेजफुल. सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य समजावून सांगतात. हे शिक्षण आता तुम्हालाच बेहदच्या बाबांकडून मिळत आहे. तेच सृष्टीचे रचयिता आहेत. पतित सृष्टीला पावन बनविणारे आहेत. बोलावतात देखील - ‘हे पतित-पावन या’, तर सर्वप्रथम त्यांचाच परिचय द्यायचा आहे. त्या परमपिता परमात्म्याशी तुमचे काय नाते आहे? ते आहेतच सत्य. नरापासून नारायण बनण्याचे सत्य नॉलेज देतात. मुले जाणतात बाबा सत्य आहेत, बाबाच सत्य-खंड बनवतात. तुम्ही नरापासून नारायण बनण्यासाठी इथे येता. बॅरिस्टर कडे जातील तर समजतील आम्ही बॅरिस्टर बनण्यासाठी आलो आहोत. आता तुम्हाला निश्चय आहे की आम्हाला स्वयं भगवान शिकवत आहेत. बरेचजण निश्चय करतात देखील परंतु नंतर मग संशय-बुद्धी होतात; तर मग त्यांना सर्वजण म्हणतात की, तुम्ही तर म्हणत होता, भगवान शिकवत आहेत मग भगवंताला सोडून का आला आहात? संशय आल्यामुळेच भागंती होतात. कोणते ना कोणते विकर्म करतात. भगवानुवाच काम महाशत्रू आहे, यावर विजय मिळवल्यानेच तुम्ही जगतजीत बनणार. जे पावन बनतील तेच पावन दुनियेमध्ये जातील. इथे आहेच राजयोगाची गोष्ट. तुम्ही जाऊन तिथे राज्य करणार. बाकीचे जे काही आत्मे आहेत ते आपला हिशोब चुकता करून परत आपल्या घरी निघून जातील. ही महाविनाशाची वेळ आहे. आता ही बुद्धी म्हणते सतयुगाची स्थापना जरूर होणार आहे. पावन दुनिया सतयुगाला म्हटले जाते. बाकी सगळे मुक्तिधाममध्ये निघून जातील. त्यांना मग आपला पार्ट रिपीट करायचा आहे. तुम्ही देखील पावन बनून पावन दुनियेचा मालक बनण्यासाठी आपला पुरुषार्थ करत राहता. सर्व जण स्वतःला मालक तर समजतील ना. प्रजा देखील मालक आहे. आता प्रजा देखील म्हणते ना - आमचा भारत. मोठ्यात मोठी व्यक्ती, संन्यासी इत्यादी देखील म्हणतात - आमचा भारत. तुम्ही समजता यावेळी भारतामध्ये सर्व नरकवासी आहेत. आता आपण स्वर्गवासी बनण्यासाठी हा राजयोग शिकत आहोत. सगळेच काही स्वर्गवासी बनणार नाहीत. हे ज्ञान आता कळले आहे. ते लोक जे ऐकवतात, शास्त्र ऐकवतात, ते आहेत शास्त्रांची ऑथॉरिटी. बाबा म्हणतात - ही भक्ती मार्गाची वेद-शास्त्रे इत्यादी सर्व वाचल्याने शिडी खालीच उतरत जातात. हा सर्व आहे भक्तीमार्ग. बाबा म्हणतात - जेव्हा भक्तीमार्ग पूर्ण होईल तेव्हाच मी येईन. मलाच येऊन सर्व भक्तांना भक्तीचे फळ द्यायचे आहे. मेजॉरिटी तर भक्तांची आहे. सर्व जण बोलावतात ना - ‘ओ गॉडफादर’. भक्तांच्या तोंडून ‘ओ गॉडफादर’, ‘हे भगवान’ असे शब्द जरूर निघतील. आता भक्ती आणि ज्ञानामध्ये फरक तर आहे. तुमच्या तोंडून कधीही ‘हे ईश्वर’, ‘हे भगवान’ हे शब्द निघणार नाहीत. लोकांना तर ही अर्ध्याकल्पा पासून सवय लागली आहे. तुम्ही जाणता ते तर आपले पिता आहेत, तुम्हाला ‘हे बाबा’ असे थोडेच करायचे आहे. बाबांकडून तर तुम्हाला वारसा घ्यायचा आहे. पहिला तर हा निश्चय आहे की, आम्ही बाबांकडून वारसा घेत आहोत. बाबा मुलांना वारसा घेण्याचा अधिकारी बनवतात. हे तर खरे बाबा आहेत ना. बाबा जाणतात - ही माझी मुले आहेत, ज्यांना मी ज्ञान अमृत पाजून, ज्ञान चितेवर बसवून घोर निद्रेतून जागे करून स्वर्गामध्ये घेऊन जातो. बाबांनी समजून सांगितले आहे - आत्मे तिथे शांतीधाम आणि सुखधाम मध्ये राहतात. सुखधामला म्हटले जाते व्हाइसलेस वर्ल्ड (निर्विकारी दुनिया). संपूर्ण निर्विकारी देवता आहेत ना. आणि ते आहे स्वीट होम. तुम्ही जाणले आहे की आमचे घर ते आहे, आपण ॲक्टर्स इथे पार्ट बजावण्यासाठी त्या शांतीधाम वरून येतो. आपण आत्मे इथले रहिवासी नाही आहोत. ते (या दुनियेतील) ॲक्टर्स इथले रहिवासी असतात. फक्त आपल्या घरुन येऊन ड्रेस बदलून पार्ट बजावतात. तुम्ही तर समजता आपले घर शांती-धाम आहे, तिथे आपण आता परत जात आहोत. जेव्हा सर्व ॲक्टर्स स्टेजवर येतात तेव्हा मग बाबा येऊन सर्वांना घेऊन जातील, म्हणून त्यांना लिबरेटर, गाईड देखील म्हटले जाते. दुःख हर्ता, सुख कर्ता आहेत तर इतके सर्व मनुष्य कुठे जातील. विचार करा - पतित-पावनला बोलावतात. कशासाठी? आपल्या मरणासाठी, दुःखाच्या दुनियेमध्ये राहू इच्छित नाहीत, म्हणून म्हणतात - घरी चला. हे सर्व जण मुक्तीलाच मानणारे आहेत. भारताचा प्राचीन राजयोग देखील किती प्रसिद्ध आहे. परदेशामध्ये सुद्धा प्राचीन राजयोग शिकवण्यासाठी जातात. वास्तविक हठयोगी तर राजयोग जाणतही नाहीत. त्यांचा योगच चुकीचा आहे म्हणून तुम्हाला जाऊन खरा राजयोग शिकवायचा आहे. संन्याशांच्या कफनीमध्ये माणसाला पाहून त्यांना किती मान देतात. बौद्ध धर्मामध्ये देखील संन्याशांना, कफनी घातलेली पाहून त्यांना मान देतात. संन्यासी तर नंतर बनतात. बौद्ध धर्मामध्ये देखील सुरुवातीला कोणी संन्यासी असत नाहीत. जेव्हा पाप वाढते तेव्हा संन्यास धर्म स्थापन होतो. सुरुवातीला तर ते आत्मे वरून येतात. त्यांची ठरलेली संख्या तेवढीच येते. सुरुवातीला संन्यास शिकवून काय करतील, संन्यास असतो नंतर. हे देखील इथून कॉपी करतात. ख्रिश्चनांमध्ये देखील असे पुष्कळ आहेत जे संन्याशांचा मान ठेवतात. कफनीचा जो पेहराव आहे, तो हठयोगींचा आहे. तुम्हाला तर घरदार काही सोडायचे नाहीये. ना कोणत्या पांढऱ्या कपड्यांचे बंधन आहे परंतु पांढरे चांगले आहे. तुम्ही भट्टीमध्ये राहिला आहात तर ड्रेस देखील हाच झाला. आजकाल पांढरा कपडा खूप पसंत करतात. व्यक्तीचा मृत्यू झाला तर तेव्हा देखील पांढरी चादर घालतात. तुम्ही देखील आता मरजीवा बनला आहात म्हणून पांढरा ड्रेस चांगला आहे.

तर कोणालाही पहिला बाबांचा परिचय द्यायचा आहे. दोन पिता आहेत, या गोष्टी समजण्यासाठी वेळ लागतो. प्रदर्शनीमध्ये इतके सांगू शकणार नाही. सतयुगामध्ये असतात एक पिता. यावेळी तुम्हाला ३ पिता आहेत कारण प्रजापिता ब्रह्माच्या तनामध्ये स्वयं भगवान येतात, ते देखील सर्वांचे पिता तर आहेत. लौकिक पिता देखील आहेत. अच्छा आता तिन्ही पित्यांमध्ये उच्च वारसा कोणाचा? निराकार बाबा वारसा कसा देतील. ते मग देतात ब्रह्मा द्वारे. या चित्रावर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकता. शिवबाबा निराकार आहेत आणि हे आहेत प्रजापिता ब्रह्मा आदि देव, ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर. बाबा म्हणतात - मज ‘शिव’ला तुम्ही ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर म्हणणार नाही. मी सर्वांचा पिता आहे. हे आहेत प्रजापिता ब्रह्मा. तुम्ही सर्व झालात बहीण-भाऊ. भले पती-पत्नी आहात परंतु बुद्धीने जाणता की आपण भाऊ-बहीण आहोत. बाबांकडून वारसा घेतो. भाऊ-बहीण आपसामध्ये क्रिमिनल एसॉल्ट (विकारांचे आक्रमण) करू शकत नाही. जर दोघांची आपसामध्ये विकारी दृष्टी आकर्षित करत असेल तर मग कोसळतात (पतन होते). बाबांना विसरून जातात. बाबा म्हणतात - तुम्ही माझी मुले बनून मग तोंड काळे करता. बेहदचे बाबा मुलांना बसून समजावून सांगतात. तुम्हाला हा नशा चढलेला आहे. जाणता गृहस्थ व्यवहारामध्ये देखील रहायचे आहे. लौकिक नातेवाईकांना देखील तोंड द्यायचे आहे, तोड निभावायची आहे. लौकिक पित्याला तर तुम्ही पिताच म्हणणार ना. त्यांना तर तुम्ही भाऊ म्हणू शकत नाही. सामान्यपणे पित्याला पिताच म्हणणार. बुद्धीमध्ये असते हे आपले लौकिक पिता आहेत. ज्ञान तर आहे ना. हे ज्ञान खूप विचित्र आहे. आजकाल पत्नी आपल्या पतीला भाई म्हणते सुद्धा परंतु कोणी व्हिजिटर इत्यादी बाहेरच्या व्यक्ती समोर भाई म्हणाल तर ते तर समजतील की यांचे डोके बिघडले आहे. यासाठी चांगली युक्ती पाहिजे. तुमचे आहे गुप्त ज्ञान, गुप्त नाते आहे. यामध्ये खूप युक्तीने चालायचे आहे. परंतु एकमेकांना रिगार्ड देणे खूप चांगले आहे. लौकिक वाल्यांशी देखील तोड निभावायची आहे. बुद्धी वरती गेली पाहिजे. आपण बाबांकडून वारसा घेत आहोत. बाकी काकांना काका, पित्याला पिता म्हणावे लागेल. जे बी. के. बनलेले नाहीत तर त्यांना हे भाऊ-बहीणीचे नाते समजणार नाही. जे ब्रह्माकुमार-कुमारी बनले आहेत तेच या गोष्टींना समजतील. बाहेरचे तर आधी ऐकून चमकतील. यामध्ये समजून घेण्यासाठी खूप चांगली बुद्धी पाहिजे. बाबा तुम्हा मुलांची विशाल-बुद्धी बनवतात. तुम्ही आधी हदच्या बुद्धीमध्ये होतात. आता बुद्धी बेहद मध्ये निघून जाते. आमचे ते बेहदचे बाबा आहेत. हे सर्व आमचेच भाऊ-बहिणी आहेत. बाकी नात्यामध्ये तर सुनेला सून, सासूला सासूच म्हणणार, बहिण थोडीच म्हणणार. येतात तर दोघीही आहेत. घरामध्ये राहत असताना देखील खूप युक्तीने चालावे लागेल. लोक संग्रहाला देखील बघावे लागते. नाहीतर ते लोक म्हणतील हे पतीला भाऊ, सासूला बहिण म्हणतात, हे नक्की काय शिकत आहेत. या ज्ञानाच्या गोष्टी तर तुम्हीच जाणता इतर कोणीही जाणत नाही. म्हणतात ना - ‘तुम्हारी गति मति तुम ही जानो’. आता तुम्ही त्यांची संतान बनला आहात तर तुमची गति मत तुम्हीच जाणा. अतिशय सांभाळून वागावे लागते. कुठे कोणी गोंधळून जाऊ नये. तर प्रदर्शनीमध्ये देखील तुम्हा मुलांनी सर्वप्रथम हेच समजावून सांगायचे आहे की, आम्हाला शिकवणारे स्वयं भगवान आहेत. आता सांगा ते कोण आहेत? निराकार शिव की श्रीकृष्ण. शिवजयंती नंतर मग येते श्रीकृष्ण जयंती कारण बाबा राजयोग शिकवतात. मुलांच्या बुद्धीमध्ये आले ना. जोपर्यंत शिव परमात्मा येत नाहीत, शिव जयंती साजरी करू शकत नाही. जोपर्यंत शिव येऊन कृष्णपुरी स्थापन करत नाहीत तोपर्यंत श्रीकृष्ण जयंती तरी कशी साजरी केली जाईल. श्रीकृष्णाचा जन्म तर साजरा करतात परंतु समजतात थोडेच. श्रीकृष्ण प्रिन्स होता तर जरूर सतयुगामध्ये प्रिन्स असणार ना. देवी-देवतांची राजधानी असेल. फक्त एका श्रीकृष्णाला तर बादशाही मिळाली नसेल. जरूर कृष्णपुरी असणार ना. म्हणतात देखील - कृष्णपुरी आणि ही आहे - कंसपुरी. कंसपुरी नष्ट झाली आणि मग कृष्णपुरीची स्थापना झाली ना. तर स्थापना होते भारतामध्येच आहे. नवीन दुनियेमध्ये थोडेच हे कंस इत्यादी असू शकतात. कंसपुरी म्हटले जाते कलियुगाला. इथे तर बघा किती मनुष्य आहेत. सतयुगामध्ये फार थोडे असतात. देवतांनी काही युद्ध केलेले नाहीये. कृष्णपुरी म्हणा अथवा विष्णुपुरी म्हणा, दैवी संप्रदाय म्हणा; आसुरी संप्रदाय तर इथे आहे. बाकी ना देवतांचे आणि असुरांचे युद्ध झाले आणि ना कौरव-पांडवांचे युद्ध झाले. तुम्ही रावणावर विजय मिळवता. बाबा म्हणतात - या ५ विकारांवर विजय प्राप्त करा तर तुम्ही जगतजीत बनाल, यामध्ये काही भांडायचे नाहीये. भांडण्याचे नाव घेतले तर ती हिंसा झाली. रावणावर विजय प्राप्त करायचा आहे, परंतु नॉनव्हायोलेन्सद्वारे (अहिंसेने). फक्त बाबांची आठवण केल्याने आपली विकर्म विनाश होतात. युद्ध इत्यादीची कोणती गोष्ट नाही. बाबा म्हणतात - तुम्ही तमोप्रधान बनले आहात आता पुन्हा तुम्हाला सतोप्रधान बनायचे आहे. भारताचा प्राचीन राजयोग प्रसिद्ध आहे. बाबा म्हणतात - माझ्याशी बुद्धीचा योग लावा तर तुमची पापे भस्म होतील. बाबा पतित-पावन आहेत तर त्यांच्याशी बुद्धियोग लावायचा आहे तेव्हाच तुम्ही पतितापासून पावन बनाल. आता प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही त्यांच्याशी योग लावत आहात, यामध्ये युद्ध इत्यादीची कोणती गोष्टच नाही. जे चांगल्या रीतीने शिकतील आणि बाबांसोबत योग लावतील तेच बाबांकडून वारसा प्राप्त करतील. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) भावा-भावाच्या दृष्टीचा अभ्यास करत लौकिक बंधनांसोबत तोड निभावायची आहे. अतिशय युक्तीने चालायचे आहे. विकारी दृष्टी अजिबात जाता कामा नये. महाविनाशाच्या वेळी संपूर्ण पावन बनायचे आहे.

२) बाबांकडून पूर्ण वारसा घेण्यासाठी चांगल्या रीतीने अभ्यास करायचा आहे आणि पतित-पावन बाबांसोबत योग लावून पावन बनायचे आहे.

वरदान:-
आपल्या संपूर्णतेच्या आधारावर समयाला समीप आणणारे मास्टर रचयिता भव

समय तुमची रचना आहे, तुम्ही मास्टर रचयिता आहात. रचयिता रचनेच्या आधारावर नसतात. रचयिता रचनेला अधीन करतात त्यामुळे कधीही असा विचार करू नका की समय आम्हाला आपोआप संपूर्ण बनवेल. तुम्हाला संपूर्ण बनून समयाला समीप आणायचे आहे. तसे तर कोणतेही विघ्न जरी आले तरी ते समयानुसार जाईल जरूर परंतु वेळेपूर्वी परिवर्तन शक्तीद्वारे त्याला परिवर्तन करा - तर त्याची प्राप्ती तुम्हाला होईल. समयाच्या आधारावर परिवर्तन केलेत तर त्याची प्राप्ती तुम्हाला होणार नाही.

बोधवाक्य:-
कर्म आणि योगाचा बॅलन्स ठेवणारेच खरे कर्मयोगी आहेत.

अव्यक्त इशारे:- या अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा. जोपर्यंत कर्मेंद्रियांचा आधार आहे तोपर्यंत कर्म तर करायचेच आहे, परंतु कर्म-बंधन नाही, कर्म-संबंध आहे. जीवन-मुक्त अवस्था अर्थात सफलता देखील जास्त आणि कर्माचे ओझे देखील नाही. जे मुक्त आहेत तेच सदा सफलतामूर्त आहेत. जीवन-मुक्त आत्मा सदैव नशेने म्हणेल की, विजय निश्चित आहे, सफलता जन्मसिद्ध अधिकार आहे.