21-12-25    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   05.03.2008  ओम शान्ति   मधुबन


“संगमाच्या बँकेमध्ये सायलेन्सची शक्ती आणि श्रेष्ठ कर्म जमा करा, शिवमंत्राद्वारे ‘मी-पणा’ला परिवर्तन करा”


आज बापदादा चोहो बाजूंच्या मुलांच्या स्नेहाला बघत आहेत. तुम्ही देखील सगळे स्नेहाच्या विमानाने इथे पोहोचला आहात. हे स्नेहाचे विमान खूप सहज स्नेह्यापाशी पोहोचवते. बापदादा बघत आहेत की आज विशेष सर्व लवलीन आत्मे परमात्म प्रेमाच्या झोपाळ्यामध्ये झोके घेत आहेत. बापदादा देखील चोहो बाजूंच्या मुलांच्या स्नेहामध्ये एकरूप झाले आहेत. हा परमात्म स्नेह बाप समान अशरीरी सहज बनवतो. व्यक्त भावापासून पार अव्यक्त स्थितीमध्ये अव्यक्त स्वरूपामध्ये स्थित करतो. बापदादा देखील प्रत्येक मुलाला समान स्थितीमध्ये पाहून हर्षित होत आहेत.

आजच्या दिवशी सर्व मुले शिवरात्री, शिवजयंती, बाबांचा आणि आपला जन्मदिवस साजरा करण्यासाठी आली आहेत. बाबा आणि दादा दोघेही आपल्या-आपल्या वतन मधून तुम्हा सर्व मुलांचा जन्म दिवस साजरा करण्यासाठी पोहोचले आहेत. साऱ्या कल्पामध्ये हा जन्म दिवस बाबांचा अथवा तुमचा न्यारा आणि अति प्रिय आहे. भक्त लोक देखील या उत्सवाला मोठ्या भावनेने आणि प्रेमाने साजरा करतात. तुम्ही या दिव्य जन्मामध्ये जे श्रेष्ठ अलौकिक कर्म केले आहे, आता देखील करत आहात. ते यादगार रूपामध्ये भले अल्पकाळासाठी थोड्या वेळापुरते साजरे करतात परंतु भक्तांची देखील कमाल आहे. यादगार साजरा करणाऱ्यांची, यादगार बनविणाऱ्यांची देखील बघा किती कमाल आहे. जे कॉपी करण्यामध्ये हुशार दिसत आहेत कारण तुमचेच भक्त आहेत ना. तर तुमच्या श्रेष्ठतेचे फळ त्या यादगार बनविणाऱ्यांना वरदानाच्या रूपामध्ये मिळाले आहे. तुम्ही एका जन्मासाठी एकदाच संपूर्ण पवित्रतेचे व्रत घेता. कॉपी तर केली आहे एका दिवसासाठी पवित्रतेचे व्रत देखील ठेवतात. तुमचा पूर्ण जन्म पवित्र अन्नाचे व्रत आहे आणि ते एका दिवसासाठी ठेवतात. तर बापदादा आज अमृतवेलेला बघत होते की तुम्हा सर्वांचे भक्त देखील काही कमी नाही आहेत. त्यांची देखील विशेषता खूप चांगली राहिली आहे. तर तुम्ही सर्वांनी पूर्ण जन्मासाठी पक्के व्रत मग ते खाण्या-पिण्याचे, किंवा मनाच्या संकल्पाच्या पवित्रतेचे, वचनाचे, कर्माचे, संबंध-संपर्कामध्ये येत असताना कर्माचे, पूर्ण जन्मासाठी पक्के व्रत घेतले आहे? घेतले आहे की थोडे-थोडे घेतले आहे? पवित्रता ब्राह्मण जीवनाचा आधार आहे. पूज्य बनण्याचा आधार आहे. श्रेष्ठ प्राप्तीचा आधार आहे. तर जे काही भाग्यवान आत्मे इथे पोहोचले आहेत ते चेक करा की हा जन्माचा उत्सव पवित्र बनण्याचा चारही प्रकारे, केवळ ब्रह्मचर्याची पवित्रता नाही, परंतु मन-वचन-कर्म, संबंध-संपर्कामध्ये देखील पवित्रता. असे पक्के व्रत घेतले आहे? घेतले आहे? ज्यांनी पक्के घेतले आहे, थोडे-थोडे कच्चे नाही, त्यांनी हात वर करा. पक्के, पक्के? पक्के? किती पक्के? कोणी हलवले तर, हलणार? हलणार? नाही हलणार? कधी-कधी तर माया येते ना, की नाही, मायेला निरोप दिला आहे? का कधी-कधी सूट देता का, येते! चेक करा - तर पक्के व्रत घेतले आहे? कायमचे व्रत घेतले आहे? का कधी-कधीचे? कधी थोडे, कधी खूप, कधी पक्के, कधी कच्चे - असे तर नाही आहात ना! कारण बापदादांवरील प्रेमामध्ये सर्वजण १०० टक्क्यापेक्षा सुद्धा जास्त मानतात. जर बापदादांनी विचारले की बाबांवर किती प्रेम आहे? तर सर्वजण खूप उमंग-उत्साहाने हात वर करतात. प्रेमामध्ये कमीचे परसेंटेज फार थोड्यांचेच असते, मेजॉरिटींचे प्रेम आहे. तर जसे प्रेमामध्ये पास आहात, बापदादा देखील मानतात की मेजॉरिटी प्रेमामध्ये पास आहेत, परंतु पवित्रतेच्या व्रतामध्ये चारही रूपामध्ये मनसा-वाचा-कर्मणा, संबंध-संपर्क चारही रूपांमध्ये संपूर्ण पवित्रतेचे व्रत निभावण्यामध्ये परसेंटेज येते. आता बापदादांना काय हवे आहे? बापदादा हेच इच्छितात की, जी प्रतिज्ञा केली आहे, समान बनण्याची, तर प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यामध्ये बाबांचे रूप दिसावे. प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये बाप समान बोल असावेत, बापदादांचे बोल वरदान रूप बनतात. तर तुम्ही सर्व हे चेक करा, माझ्या चेहऱ्यामध्ये बाबांचे रूप दिसते आहे का? बाबांचे रूप काय आहे? संपन्न, सर्व गोष्टींमध्ये संपन्न. असे प्रत्येक मुलाचे नेत्र, प्रत्येक मुलाचा मुखडा बाप समान आहे? सदैव हसरा चेहरा आहे? की कधी विचारात असलेला, कधी व्यर्थ संकल्पांच्या छायेवाला, कधी उदास, कधी खूप मेहनत करणारा, असा तर चेहरा नाही आहे ना? सदैव गुलाब, कधी गुलाबासारखा उमललेला चेहरा, तर कधी वेगळा असा बनू नये कारण बापदादांनी जन्मतःच हे देखील सांगितले आहे की माया तुमच्या या श्रेष्ठ जीवनाला विरोध करेल. परंतु मायेचे काम आहे येणे, तुम्हा सदैव पवित्रतेचे व्रत घेणाऱ्या आत्म्यांचे काम आहे दुरूनच मायेला पळवून लावणे.

बापदादांनी बघितले आहे बरीच मुले मायेला दुरूनच पळवून लावत नाहीत, माया येते, येऊ देतात अर्थात मायेच्या प्रभावामध्ये येतात. जेव्हा दुरूनच पळवून लावत नाहीत तेव्हा मग मायेला देखील सवय लागते कारण की ती ओळखून जाते की इथे आपल्याला बसायला देतील, बसायला देण्याची निशाणी आहे की, माया येते, विचार करतात की माया आहे, परंतु तरी सुद्धा काय विचार करतात? अजून संपूर्ण थोडाच बनलो आहे, कोणीही संपूर्ण बनलेला नाहीये. आता तर बनत आहोत, बनून जाऊ, गें गें करू लागतात तर मायेला बसण्याची सवय लागते. तर आज जन्मदिवस तर साजरा करत आहात, बाबा देखील आशीर्वाद, मुबारक तर देत आहेत परंतु बाबा प्रत्येक मुलाला, लास्ट नंबरवाल्या मुलाला सुद्धा कोणत्या रूपामध्ये पाहू इच्छितात? लास्ट नंबर देखील बाबांचा लाडका तर आहे ना! तर बाबा लास्ट नंबरवाल्या मुलाला देखील सदैव गुलाबासारखे पाहू इच्छितात, उमललेला. कोमेजलेला नाही. कोमेजण्याचे कारण आहे थोडासा निष्काळजीपणा. होऊन जाईल, बघू, करूच, पोहोचूच... तर ही गें गें ची भाषा खाली पाडते. तर चेक करा - किती काळ लोटला, आता वेळेच्या समीपतेचा आणि अचानक होण्याचा इशारा तर बापदादांनी दिलेलाच आहे, देत आहेत नाही, दिलेलाच आहे. अशा वेळी एव्हररेडी, अलर्ट असणे आवश्यक आहे. अलर्ट रहाण्यासाठी चेक करा - माझे मन आणि बुद्धी सदैव क्लीन आणि क्लियर आहे? क्लीन सुद्धा पाहिजे, क्लियर सुद्धा पाहिजे. यासाठी वेळेवर विजय प्राप्त करण्यासाठी मनामध्ये, बुद्धीमध्ये कॅचिंग पॉवर आणि टचिंग पॉवर दोन्ही खूप आवश्यक आहेत. अशा काही परिस्थिती येणार आहेत जे कुठेही दूर जरी बसलेले असाल परंतु क्लीन आणि क्लियर मन आणि बुद्धी असेल तर बाबांचा इशारा, डायरेक्शन, श्रीमत जी मिळणार आहे, त्याला कॅच करू शकाल. टच होईल - ‘हे करायचे आहे, हे करायचे नाही आहे’ त्यामुळे बापदादांनी अगोदरच सांगितले आहे तर वर्तमान समयी आपल्याकडे सायलेन्सची शक्ती जितकी जमा करू शकता तितकी जमा करा. जेव्हा पाहिजे, जसे पाहिजे तसे मन आणि बुद्धीला कंट्रोल करू शकाल. व्यर्थ संकल्प स्वप्नामध्ये देखील टच करू नयेत, असा माईंड कंट्रोल पाहिजे; म्हणून एक म्हण आहे - ‘मन जीते जगतजीत’. जसे हात स्थूल कर्मेंद्रिय आहे, जिथे पाहिजे, जोपर्यंत पाहिजे तोपर्यंत ऑर्डरप्रमाणे वापरू शकता. असे मन आणि बुद्धीची कंट्रोलिंग पॉवर आत्म्यामध्ये सदैव इमर्ज असावी. असे नाही योगाच्या वेळी अनुभव होतो परंतु कर्माच्या वेळी, कार्य-व्यवहार करते वेळी, नातेसंबंधांमध्ये येते वेळी अनुभव कमी होतो. अचानक पेपर येणार आहेत कारण फायनल रिझल्टच्या अगोदर सुद्धा मधून-मधून पेपर घेतले जातात.

तर या बर्थ डे निमित्त कोणती विशेष गोष्ट कराल? सायलेन्सची शक्ती जितकी जमा करू शकाल, एका सेकंदामध्ये स्वीट सायलेन्सच्या अनुभूतिमध्ये हरवून जा कारण सायन्स आणि सायलेन्स, सायन्स देखील अतिमध्ये जात आहे. तर सायन्सवर सायलेन्सच्या शक्तिचा विजय परिवर्तन घडवून आणेल. सायलेन्सच्या शक्तिद्वारे दूर बसून एखाद्या आत्म्याला सहयोग देखील देऊ शकता, सकाश देखील देऊ शकता. भटकणाऱ्या मनाला शांत करू शकता. ब्रह्मा बाबांना बघितले जेव्हा-जेव्हा कोणी अनन्य बच्चा थोडासा हलचलमध्ये असे अथवा शारीरिक हिशोब चुकता करत असे तर बाबा पहाटे लवकर उठून मुलाला सायलेन्सच्या शक्तिची सकाश देत असत आणि तो अनुभव करत असे. तर शेवटी या सायलेन्सच्या सेवेचा सहयोग द्यावा लागेल. परिस्थिती अनुसार हे नीट लक्षात ठेवा, सायलेन्सची शक्ती अथवा आपल्या श्रेष्ठ कर्मांची शक्ती जमा करण्याची बँक फक्त आत्ता उघडते बाकी इतर कोणत्याही जन्मामध्ये ही जमा करण्याची बँकच नसते. आत्ता जर जमा केले नाहीत तर मग नंतर ही बँकच नसणार तर कुठे जमा कराल! म्हणून जमेच्या शक्तिला जितके गोळा करू इच्छिता तितके करू शकता. तसे लोकं देखील म्हणतात - जे करायचे आहे ते आत्ता करा. जो विचार करायचा आहे तो आत्ता करा. आत्ता जो काही विचार कराल तो विचार, विचार राहील आणि काही वेळानंतर जेव्हा वेळेची सीमा जवळ येईल तेव्हा तो विचार पश्चात्तापाच्या रूपामध्ये बदलेल. असे केले असते, असे करायला हवे होते... तर विचार नाही राहणार, पश्चात्तापामध्ये बदलेल; म्हणून बापदादा अगोदरच इशारा देत आहेत. सायलेन्सची शक्ती, एका सेकंदामध्ये काहीही होवो, सायलेन्समध्ये हरवून जा. परंतु अजून हा पुरुषार्थ करत नाही आहात! जमेचा पुरुषार्थ आत्ता करू शकता.मनोरंजन तर बापदादांचे मुलांवर प्रेम आहे, बापदादा प्रत्येक मुलाला सोबत घेऊन जाऊ इच्छितात. जो वायदा आहे - ‘सोबत राहणार, सोबत येणार…’ तो वायदा निभावण्यासाठी समान असणाराच सोबत येईल. सांगितले होते ना - डबल फॉरेनर्सना हातात हात देऊन चालायला आवडते, तर श्रीमताचा हात हातामध्ये असावा, बाबांचे श्रीमत ते तुमचे मत याला म्हणतात हातामध्ये हात. तर ठीक आहे - आज बर्थ डे चा उत्सव साजरा करण्यासाठी आला आहात ना! बापदादांना देखील आनंद होतो की, ‘माझी मुले’; बाबांना अभिमान आहे की, माझी मुले सदैव उत्साहामध्ये राहून उत्सव साजरा करत राहतात. दररोज उत्सव साजरा करता की विशेष दिना निमित्त? संगमयुगच एक उत्सव आहे. युगच उत्सवाचे आहे. इतर कोणतेही युग संगमयुगा सारखे नाही आहे. तर सर्वांना उमंग-उत्साह आहे ना की आम्हाला समान बनायचेच आहे. आहे? बनायचेच आहे, की बघणार, बनणार, करणार, गें गें करणारे तर नाही आहात ना? जे समजतात बनायचेच आहे, त्यांनी हात वर करा. बनायचेच आहे, त्याग करावा लागेल, तपस्या करावी लागेल. तयार आहात कोणताही त्याग करावा लागेल. सर्वात मोठा त्याग कोणता आहे? त्याग करण्यामध्ये सर्वात मोठ्यात मोठा एक शब्द विघ्न उत्पन्न करतो. त्याग, तपस्या, वैराग्य, बेहदचे वैराग्य, यामध्ये एकच शब्द विघ्न निर्माण करतो, जाणता तर आहात. कोणता एक शब्द आहे? ‘मी’, बॉडी कॉन्शसचा ‘मी’. म्हणून बापदादांनी सांगितले आहे - जसे आत्ता जेव्हापण ‘माझे’ म्हणता तर पहिल्यांदा काय आठवते? ‘माझे बाबा’. ‘माझे बाबा’, येते ना! भले ‘माझे’ शब्दानंतर आणखी काहीही करा परंतु ‘माझे’ म्हटल्यामुळे सवय झाली आहे अगोदर ‘बाबा’ येते. तसेच जेव्हा ‘मी’ म्हणता, तर जसे ‘माझे बाबा’ विसरत नाही, कधी कोणाला ‘माझे’ म्हणाल ना तर ‘बाबा’ शब्द येतोच येतो, अगदी तसेच जेव्हा ‘मी’ म्हणाल तर अगोदर आत्म्याची आठवण यावी. मी कोण? आत्मा. मी आत्मा हे करत आहे. मी आणि माझे, हदचे बदलून बेहदचे व्हावे. असे होऊ शकते? होऊ शकते का? मान तर हलवा. सवय लावा, ‘मी’ म्हटले तर लगेच आत्मा आठवावा. आणि जेव्हा ‘मी-पणा’ येतो तर एक शब्द आठवावा - करावनहार कोण? बाबा करावनहार करत आहेत. करावनहार शब्द कार्य करते वेळी सदैव लक्षात रहावा. मग ‘मी-पणा’ येणार नाही. माझा विचार, माझी ड्युटी, ड्युटीचा सुद्धा खूप नशा असतो. माझी ड्युटी… परंतु देणारा दाता कोण! या ड्युटीज प्रभूची देणगी आहे. प्रभूच्या देणगीला ‘मी’ मानणे, विचार करा चांगले आहे?

बापदादांना आता प्रत्येक स्थानाचा रिझल्ट हवा आहे. हा एक महिना असे नॅचरल नेचर (नैसर्गिक स्वभाव) बनवा कारण की नॅचरल नेचर लवकर बदलत नाही. तर नैसर्गिक स्वभाव बनवा जे सांगितले ना - सदैव तुमच्या चेहऱ्यातून बाबांचे गुण दिसावेत, वर्तना मधून बाबांचे श्रीमत दिसावे. सदैव हसरा चेहरा असावा. सदैव संतुष्ट राहण्याची आणि संतुष्ट करण्याची चाल असावी. प्रत्येक कर्मामध्ये, कर्म आणि योगाचा बॅलन्स असावा. बरीच मुले बापदादांना खूप छान-छान गोष्टी ऐकवतात, सांगू काय म्हणतात ते? म्हणतात - बाबा, तुम्ही समजून घ्या ना माझी ही नेचर आहे (माझा हा स्वभाव आहे), बाकी काही नाही, माझा स्वभावच असा आहे. आता बापदादा काय म्हणणार? माझी नेचर आहे? माझी बोलण्याची पद्धत अशी आहे, बरेचजण असे म्हणतात, चिडलो थोडाच, माझा आवाज थोडा मोठा आहे, थोडे मोठ्याने बोललो, चिडलो थोडाच फक्त मोठ्याने बोललो. बघा, किती गोड-गोड गोष्टी आहेत. बापदादा म्हणतात - ज्याला तुम्ही माझी नेचर म्हणता, हे माझे म्हणणेच चुकीचे आहे. माझी नेचर (माझा स्वभाव) ही रावणाची नेचर आहे की तुमची नेचर आहे? तुमची नेचर अनादि काळ, आदि काळ, पूज्य काळ ही ओरिजिनल नेचर आहे. रावणाच्या वस्तूला माझे-माझे म्हणता ना म्हणून ती जात नाही. परक्याच्या वस्तूला आपले बनवून ठेवले आहे ना, कोणी परक्याची वस्तू आपल्याकडे सांभाळून ठेवेल, लपवून ठेवेल, तर ते चांगले मानले जाते का? तर रावणाचे नेचर, परक्याचे नेचर त्याला माझे का म्हणता? मोठ्या अभिमानाने म्हणता - माझा दोष नाहीये, माझे नेचर आहे. बापदादांना देखील पटवून देण्याचा प्रयत्न करतात. तर आता हा समाप्ती समारोह करणार! कराल? करणार? बघा, मनापासून सांगा, मनापासून करा, जिथे मन असेल ना, तिथे सर्व काही होणार. मनापासून कबूल करा की ही माझी नेचर नाही आहे. ही दुसऱ्याची वस्तू आहे, ती मला ठेवायची नाहीये. तुम्ही तर मरजीवा बनलात ना. तुमचे ब्राह्मण नेचर आहे की जुने नेचर आहे? तर समजले बापदादांना काय हवे आहे? भले मनोरंजन करा, डान्स करा, खेळ खेळा, परंतु… ‘परंतु’ आहे. सर्व काही करत असताना देखील समान बनायचेच आहे. समान बनल्याशिवाय सोबत कसे येणार! कस्टम मध्ये, धर्मराजपुरीमध्ये थांबावे लागेल, सोबत येऊ शकणार नाही. तर आता काय, सांगा दादी, एक महिना रिझल्ट पहायचा! पहायचा का? बोला, पाहूया? एक महिना अटेन्शन ठेवणार? एक महिना जर अटेन्शन ठेवले तर नॅचरल होईल. महिन्यातील एकही दिवस सोडायचा नाही. दादी खूप चांगली जबाबदारी सांभाळतात. सर्वांनी एकत्र येऊन एकमेकांप्रती शुभ भावना, शुभ कामनेचे बाहू पसरा. जसे कोणी पडले ना तर त्याला हात देऊन प्रेमाने उठवतात; तर शुभ भावना आणि शुभ कामनेचा हात, एकमेकांना सहयोग देऊन पुढे नेत रहा. ठीक आहे? फक्त तुम्ही चेक कमी करता, नाही म्हणायला शेवटी चेक करता, झाले ना! अगोदर विचार करा, नंतर करा. अगोदर करायचे नंतर विचार करायचा नाही. करायचेच आहे.

अच्छा. आता बापदादा कोणती ड्रिल करू इच्छितात? एका सेकंदामध्ये शांतीच्या शक्तीचे स्वरूप बना. एकाग्र बुद्धी, एकाग्र मन. संपूर्ण दिवसभरामध्ये अधून-मधून एक सेकंद काढून अभ्यास करा. सायलेन्सचा संकल्प केला आणि स्वरूप झाले. यासाठी वेळेची आवश्यकता नाही. एका सेकंदाचा अभ्यास करा, सायलेन्स. अच्छा.

चोहो बाजूच्या जन्मोत्सव साजरा करणाऱ्या भाग्यवान आत्म्यांना, सदैव उत्साहामध्ये राहणाऱ्या संगमयुगातील उत्सवाला साजरा करणाऱ्या, अशा सर्व उमंग-उत्साहाच्या पंखांनी उडणाऱ्या मुलांना, सदैव मन आणि बुद्धीला एकाग्रतेचे अनुभवी बनविणाऱ्या महावीर मुलांना, सदैव समान बनण्याच्या उमंगाला साकार रूपामध्ये आणणाऱ्या फॉलो फादर करणाऱ्या मुलांना, सदैव एकमेकांचे स्नेही सहयोगी हिंमत देणाऱ्या बाबांकडून मदतीचे वरदान देणाऱ्या वरदानी मुलांना, महादानी मुलांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि पद्म पद्म पद्म पद्मगुणा मुबारक असो, मुबारक असो, मुबारक असो.

वरदान:-
सदैव एकांतामध्ये आणि आठवणीमध्ये व्यस्त राहणारे बेहदचे वानप्रस्थी भव

वर्तमान समयानुसार तुम्ही सर्व वानप्रस्थ अवस्थेच्या समीप आहात. वानप्रस्थी कधी बाहुल्यांचा खेळ करत नाहीत. ते सदैव एकांतामध्ये आणि आठवणीमध्ये राहतात. तुम्ही सर्व बेहदचे वानप्रस्थी सदैव एकाच्या अंतामध्ये अर्थात निरंतर एकांतामध्ये रहा त्याच सोबत एकाचीच आठवण करत स्मृति स्वरूप बना. सर्व मुलांप्रति बापदादांची हीच शुभ आशा आहे की, आता बाबा आणि मुले समान बनावीत. सदैव आठवणीमध्ये एकरूप होऊन रहावीत. समान बनणेच सामावणे आहे (एकरूप होणे आहे) - हीच वानप्रस्थ स्थितीची निशाणी आहे.

सुविचार:-
तुम्ही हिंमतीचे एक पाऊल टाका तर बाबा मदतीची हजार पावले टाकतील.

अव्यक्त इशारे:- आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा.

जसे बाबांसाठी सर्वांच्या मुखातून एकच आवाज निघतो - “माझे बाबा”. तसे तुम्हा प्रत्येक श्रेष्ठ आत्म्याप्रति हीच भावना असावी, जाणीव व्हावी. प्रत्येकामधून माझे-पणाची भासना यावी. प्रत्येकाला वाटावे की, हे माझे शुभचिंतक, सहयोगी, सेवेमधील साथीदार आहेत, याला म्हटले जाते - बाप समान, कर्मातीत स्टेजचे तख्तनशीन.

सूचना:- आज महिन्याचा तिसरा रविवार आहे, सर्व राजयोगी तपस्वी भाऊ-बहिणी सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजेपर्यंत, विशेष योग अभ्यासाच्या वेळी आपल्या लाईट-माइट स्वरूपामध्ये स्थित होऊन, भृकुटीच्या मध्यभागी बापदादांचे आवाहन करत, कंबाइंड स्वरूपाचा अनुभव करा आणि चोहो बाजूंना लाईट-माइटची किरणे पसरविण्याची सेवा करा.